Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 01 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारताची बँक व्यवस्था जगात आदर्श समजली जात असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँक - आरबीआयच्या स्थापनेला आज ९० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं, मुंबईत आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते. एकेकाळी तोट्यात असलेली अर्थव्यवस्था आज नफ्यात असल्याचं सांगत, बँकिंग व्यवस्थेतलं स्थित्यंतर हा अभ्यासाचा विषय असल्याचं ते यावेळी म्हणाले. बँकांचा विकासदर १५ टक्क्यांपर्यत पोहचला असून देशात ५२ कोटी जनधन खाती आहेत तसंच युपीआयला जागतिक मान्यता मिळत असून याद्वारे १२०० कोटींपेक्षा जास्त व्यवहार होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आरबीआयमुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून भारताची प्रगती वेगानं आणि शाश्वत होण्यासाठी आरबीआयला सतत प्रयत्नशील राहावं लागणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. या विशेष प्रसंगी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ९० रुपयांचा स्मारक शिक्का जारी करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊज अव्हेन्यू न्यायालयानं १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास कार्यात सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीनं केजरीवाल यांच्यावर केला आहे. दरम्यान, कथित मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांना २१ मार्चला अटक करण्यात आली होती.
****
आजपासून सुरू होत असलेल्या नव्या आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दरम्यान, नवीन कर धोरणाबाबत समाज माध्यमांवर प्रसारीत होणाऱ्या संदेश हे दिशाभूल करणारे असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तसंच महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांनी आज शक्तीप्रदर्शन करत आपलं नामनिर्देशनपत्र दाखल केलं. यावेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, बाबाजानी दुर्राणी, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती.
****
वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या अकरा उमेदवारांची दुसरी यादी काल रात्री जाहीर केली. त्यामुळं वंचित आघाडीच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या १९ वर पोहचली आहे. उमेदवारांमध्ये हिंगोलीमधून बी. बी. चव्हाण, लातूर - नरसिंहराव उदगीरकर, सोलापूर - राहुल गायकवाड, माढा- रमेश बारसकर, सातारा - मारूती जानकर, धुळे-अब्दुल रहेमान, हातकणंगले - दादासाहेब उर्फ दादागौडा चवगोंडा पाटील, रावेर - संजय ब्राम्हणे, जालना - प्रभाकर बकले, उत्तर मध्य मुंबई - अबुल हसन खान, आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून - काका जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कोल्हापूर आणि नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याआधीच जाहीर केलं होतं.
***
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व लोकसभा मतदार संघातली परिस्थिती आणि एकूण घडामोडींचा आढावा घेण्यासाठी, ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम आकाशवाणी घेऊन येत आहे. आज एक एप्रिलपासून संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेदरम्यान हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित केला जाणार आहे. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्तविभागांच्या सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनेलवरही हा कार्यक्रम ऐकता येणार आहे.
***
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा उद्यापासून सुरु होत आहेत. दोन एप्रिलपासून पदवी अभ्यासक्रमाच्या परिक्षा, १६ एप्रिलपासून सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तर २९ एप्रिलपासून सर्व विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. तसंच तीन मे पासून शिक्षण आणि शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या आणि १३ मे पासून औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालयात एकूण १०५ केंद्रावर या परीक्षा घेण्यात येतील. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी ही माहिती दिली. या परीक्षेचे निकाल ३० दिवसांत जाहीर करण्यासाठी विद्यापीठानं चार संलग्नित महाविद्यालयांमध्ये एकूण १४ मूल्यांकन केंद्र तयार केले आहेत.
****
No comments:
Post a Comment