Friday, 19 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.04.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 19 April 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १९ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. या टप्प्यात १७ राज्यं आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधल्या १०२ मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या नागपूर, भंडारा - गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली - चिमूर आणि रामटेक या पाच मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १९ पूर्णांक १७ टक्के मतदान झालं. सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवारांसह नामवंत व्यक्तींनी मतदान केलं. यामध्ये महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी, महाविकास आघाडीचे विकास ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भंडारा - गोंदिया मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे, भाजप उमेदवार सुनिल मेंढे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे.

सकाळी ११ वाजेपर्यंत नागपूर मतदारसंघात १७ पूर्णांक ५३ टक्के, भंडारा - गोंदिया १९ पूर्णांक ७२ टक्के, चंद्रपूर १९ टक्के, गडचिरोली - चिमूर २४ पूर्णांक ६५ टक्के, तर रामटेक मतदारसंघात १६ पूर्णांक १५ टक्के मतदान झालं.

दरम्यान, नागपूर जिल्हा प्रशासनाद्वारे सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित मतदान केंद्रांची स्थापना विविध ठिकाणी करण्यात आली आहे. रामटेक तालुक्यात कट्टा इथल्या एका मतदान केंद्रावर बांबू तसंच वन आधारित संकल्पना साकारण्यात आली आहे.

तर नागपूर इथल्या सरस्वती विद्यालयातल्या मतदान केंद्रावर विविध वस्त्र उद्योगातल्या हातमागाचं कापड तसंच कलाकृतीच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

गडचिरोली शहरात नव मतदार, दिव्यागं, वृद्ध मतदारांना मतदार रथा मध्ये बसवून वाजत गाजत मिरवणूक काढून मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे. या टप्प्यात ९४ मतदारसंघांमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.

भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित सहा यांनी गुजरात मधल्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला.

****

पंतप्रधान तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची आज सायंकाळी वर्धा जिल्ह्यात तळेगाव इथं प्रचार सभा होणार आहे. महायुतीचे खासदार रामदास तडस तिसऱ्यांदा या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. मोदी यांची उद्या २० एप्रिलला नांदेड आणि परभणी इथं प्रचारसभा होणार आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव इथं रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. तत्पूर्वी त्यांनी धाराशिव इथल्या शमशुद्दीन ख्वाजा दर्ग्यात जाऊन प्रार्थना केली.

****

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या युवा कर्मचाऱ्यांकडे मतदान केंद्राचं संपूर्ण नियंत्रण सोपवण्यात आलं आहे. युवा कर्मचारी नियुक्त असलेली एकंदर ४५० मतदान केंद्रे राज्यभरात असणार आहेत. या युवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया, जबाबदारी आणि खबरदारीचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे एकूण ३६ मतदान केंद्रांचं नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे देण्यात आलं आहे.

****


लातूर लोकसभा मतदारसंघासाचे निवडणूक खर्च निरीक्षक संजीव बॅनर्जी यांनी काल अहमदपूर, निलंगा, उदगीर आणि लातूर विधानसभा क्षेत्रात स्थिर निगराणी पथकांना भेट देवून तिथल्या कामकाजाचा आढावा घेतला. तसंच त्यांनी उदगीर आणि निलंगा इथं निवडणूक खर्च विषयक पथकांची आढावा बैठक घेवून प्रत्येकाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या.

****

अहमदनगर आणि नाशिकच्या जलसंपदा विभागातल्या दोन महिला अभियंत्यांना ६२ हजार रुपये लाच घेताना अहमदनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं. राहुरी तालुक्यातल्या कामासाठी त्यांनी कंत्राटदाराकडून बिलाच्या १८ टक्के इतक्या लाचेची मागणी केली होती, यापैकी पहिला हप्ता स्वीकारताना त्यांना पकडण्यात आलं.

****

उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या ४० फेऱ्या मंजूर केल्या आहेत. नांदेड-पनवेल ही द्वि साप्ताहिक विशेष गाडी २२ एप्रिल ते २७ जून दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड इथून सुटेल, तर परतीच्या प्रवासात ही गाडी दर मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल इथून सुटेल.

****

No comments:

Post a Comment