Friday, 19 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.04.2024रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

१९ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. या टप्प्यात १७ राज्यं आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधल्या १०२ मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या नागपूर, भंडारा - गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली - चिमूर आणि रामटेक या पाच मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा पूर्णांक ९८ टक्के मतदान झालं.

नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीने उमेदवार नितीन गडकरी, तसंच महाविकास आगाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केलं. या मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा पूर्णांक ४१ टक्के मतदान झालं.

भंडारा - गोंदिया मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे, भाजप उमेदवार सुनिल मेंढे आणि बसपा उमेदवार संजय कुंभलकर यांनी मतदान केलं. या मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सात पूर्णांक २२ टक्के मतदान झालं.

गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसाण यांनी मतदान केलं. या मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत आठ पूर्णांक ११ टक्के मतदान झालं.

रामटेक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजु पारवे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी मतदान केलं. या मतदारसंघात नऊ वाजेपर्यंत पाच पूर्णांक २२ टक्के मतदान झालं.

****

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या देशाचं भवितव्य घडवण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे; म्हणूनच सर्वांनी आणि प्रामुख्याने नवमतदारांनी, लोकशाही मतदान करावं असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे. या टप्प्यात ९४ मतदारसंघांमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे.

****

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओनं काल ओडिशाच्या चांदीपूर इथं स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या तंत्रज्ञानामुळे भारताची संरक्षण सिद्धता पुन्हा एकदा प्रस्थापित झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

No comments:

Post a Comment