आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२० एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नांदेड जिल्ह्यात कौठा इथं महायुतीचे नांदेडचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. यानंतर परभणीतही मोदी यांची सभा होणार असून, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं प्रचार सभा घेणार आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. यामध्ये राज्यातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे. २२ एप्रिल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार आहे.
****
काल पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगानं मतदारांचे आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे आभार मानले आहेत. छत्तीसगढच्या बस्तरमधल्या ५६ गावांनी आणि ग्रेट निकोबारच्या शोम्पेन जमातीतल्या नागरीकांनी पहिल्यांदाच मतदान केलं. याशिवाय नवमतदारांनी देखील मोठ्या संख्येनं मतदान प्रक्रियेत उत्साहानं सहभाग घेतला.
****
आयआयटी मुंबईचे नवे संचालक म्हणून ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक शिरिष केदारे यांची नियुक्ती झाली आहे. येत्या ६ मे रोजी ते पदभार स्वीकारतील, असं आयआयटी मुंबईनं समाजमाध्यमावर जाहीर केलं आहे.
****
रामनवनीच्या दिवशी श्री रामजन्मोत्सव झाल्यानंतर कामदा एकादशीला नाशिकधल्या श्री काळाराम मंदीरातून श्री राम आणि गरूड रथ काढण्याची परंपरा आहे. परंपरेप्रमाणे काल सायंकाळी रथोत्सव साजरा करण्यात आला. आधी गरूड रथ आणि त्या मागे असलेला श्री राम रथ ओढण्यास सांयकाळी प्रारंभ झाला आणि मध्यरात्री पर्यंत हा रथ शहरातून मिरवला जात होता.
****
आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे. पुण्यात सॅलिसबरी पार्क परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून पाच मोबाइल संच जप्त करण्यात आले.
****
No comments:
Post a Comment