Sunday, 21 April 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.04.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 21 April 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २१ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर

·      निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात लातूर इथं पाच तर उस्मानाबाद इथं एक अर्ज बाद

·      ुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारांसाठी भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेड तसंच परभणीत प्रचार सभा

·      शिवसंग्रामच्या नेत्या डॉ ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

      आणि

·      मराठवाड्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

****

हायुतीने औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून पैठणचे विद्यमान आमदार तथा रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेनं काल ट्वीटरवर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली. औरंगाबाद इथं आता महायुतीचे संदिपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांच्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

महायुतीनं आतापर्यंत राज्यातल्या ४२ जागांवर तर महाविकास आघाडीने आतापर्यंत ४६ जागांवरचे उमेदवार जाहीर केले आहेत.

****

दरम्यान, औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात काल दिवसभरात चार उमेदवारी अर्ज दाखल झाले. किरण सखाराम बर्डे या अपक्ष उमेदवाराने काल दोन अर्ज दाखल केले तर हर्षवर्धन रायभान जाधव आणि, देविदास रतन कसबे यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. एकूण ११ अर्ज आतापर्यंत दाखल झाले असून, आतापर्यंत ९५ जणांच्या नावे १८५ अर्ज घेण्यात आले आहेत.

****

जालना मतदार संघासाठी काल तिसऱ्या दिवशी एकूण ७ जणांनी १७ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. तर गेल्या तीन दिवसांत ६५ जणांनी १६३ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. दरम्यान, काल कडुबा म्हातारबा इंगळे या अपक्ष उमेदवारानं उमेदवारी अर्ज दाखल केला.

****

बीड मतदार संघात काल अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी ११ उमेदवारांनी २५ अर्ज घेतले. गेल्या तीन दिवसामध्ये एकूण ८० उमेदवारांनी १८५ अर्ज घेतले आहेत. दरम्यान भारतीय जवान किसान पार्टीकडून रामा खोटे या एका उमेदवाराने काल अर्ज दाखल केला. आतापर्यंत या मतदार संघात चार अर्ज दाखल झाले आहेत

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले, या सर्व अर्जांची काल छाननी करण्यात आली. उद्या सोमवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात मराठवाड्यातल्या उस्मानाबाद आणि लातूरसह राज्यात अकरा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे.

 

लातूर इथं दाखल ५० अर्जांपैकी पाच उमेदवारांचे पाच अर्ज अवैध ठरले, तर ३१ उमेदवारांचे ४५ अर्ज वैध ठरले आहेत. उस्मानाबाद इथं ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरला, आता ३५ उमेदवार रिंगणात आहेत.

कोल्हापूर इथं ३९, हातकणंगले इथं ५०, सातारा इथं २१, सांगलीत २५ तर रायगड इथं २७ अर्ज वैध ठरले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी तसंच हिंगोलीसह राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, आणि यवतमाळ-वाशिम या आठ मतदार संघात आता प्रचाराचे अखेरचे चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या मतदार संघांमध्ये प्रचारसभा तसंच प्रचार फेऱ्यांना वेग आला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नांदेड तसंच परभणी इथं प्रचार सभा घेतली. मतदान ही लोकशाहीतली सर्वात मोठी ताकद असल्यानं, या निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी या सभांमधून केलं. काँग्रेसनं आपल्या कार्यकाळात विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. नांदेड इथं महायुतीकडून प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोली इथून बाबुराव कदम कोहळीकर, तर परभणीतून महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे निवडणूक लढवत आहेत.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी औरंगाबाद इथं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि जालना इथले उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. बेरोजगारी, इंधन दरवाढ आदी मुद्यांवरून त्यांनी सरकारवर टीका केली.

दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी अहदमनगरला भेट दिली. या वेळी पत्रकारांशी संवाद साधतना, ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला त्यांनाच पंतप्रधान नरेंद मोदी सध्या बरोबर घेऊन फिरत आहेत असा आरोप शरद पवार यांनी केला.

****

श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण रायगड लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. सायंकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल.

****

जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना आज सर्वत्र नमन केलं आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अहिंसा आणि करुणेचे प्रतीक असलेले भगवान महावीर यांनी प्रेम-शांतीचा संदेश देत सत्य आणि त्यागाचा मार्ग दाखवल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आज जन्मकल्याणक महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्तानं विविध सामाजिक-धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

****

शिवसंग्रामच्या नेत्या डॉ ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. काल सकाळी बीड इथं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही बाब स्पष्ट केली. मात्र, या निवडणुकीसाठी शिवसंग्रामची भूमिका आपण ठरवणार असल्याचं ज्योती मेटे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच आपण शासकीय सेवेतून निवृत्ती घेतली, मात्र समाजहित सर्वात महत्त्वाचं असल्यानं आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठवाडा विभागातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची काल लोकसभा निवडणुकीसंदर्भात छत्रपती संभाजीनगर इथं बैठक झाली, या बैठकीला मनसेचे मराठवाडा लोकसभा निवडणूक समन्वयक बाळा नांदगावकर यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी महायुतीचे औरंगाबादचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्यासह  अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

परभणी जिल्ह्यात मौजे सुकापुरवाडी या गावात काल एका ज्येष्ठ मतदाराचं त्यांच्या राहत्या घरी जावून मतदान घेण्यात आलं. बाळासाहेब बबनराव कदम असं या ८८ वर्षीय मतदाराचं नाव आहे. थेट संपर्क नसलेल्या या गावात तहसील कार्यालयाच्या मतदान पथकानं पायवाटेने नदी पार करून कदम यांचं मतदान नोंदवलं. परभणी तालुक्यात एकूण ११७ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारानी गृहमतदानाचा पर्याय निवडला आहे.

****

मराठवाड्याच्या अनेक भागात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली.

लातूर शहर आणि परिसरात काल दुपारी सुमारे तासभर पाऊस झाला. या पावसामुळे लातूर शहरातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट झाली असून, औसा तालुक्यात वीज पडून काही जनावरं दगावल्याचं वृत्त आहे.

नांदेड शहर आणि परिसरातही काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्याने प्रारंभी धुळीचे वादळ आणि त्यानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

हिंगोली शहरासह जिल्ह्यात कळमनुरी, वसमत तालुक्यात काल संध्याकाळी पाऊस झाला. हिंगोलीत बाजारपेठेत पाणी साचल्यानं नागरिकांची आणि व्यावसायिकांची गैरसोय झाली. तर, ग्रामिण भागात शेतात वाळवणीसाठी ठेवलेली हळद भिजल्याचं वृत्त आहे. 

परभणी शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे झाडं तसंच विद्युत खांब पडल्याचं वृत्त आहे. पालम तालुक्याच्या काही भागात काल पावसानं हजेरी लावली.

धाराशिव शहरासह जिल्ह्यात उमरगा, लोहारा, तुळजापूर या तालुक्यात काल पाऊस झाला. या पावसामुळे आंबा तसंच रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या ज्वारीचं नुकसान झालं. तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर परिसरात पाणी वाहून आल्यामुळे भाविकांची तारांबळ उडाली होती

बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात काल पाऊस झाला. या पावसाने आंबा, पपई, आदी फळपिकांचं नुकसान झालं.

जालना जिल्ह्यातही काल भोकरदन, मंठा, अंबड तसंच जालना तालुक्याच्या अनेक भागात पाऊस झाला. जवळपास चाळीस मिनीट झालेल्या या जोरदार पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काल अनेक भागात पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसात अनेक झाडं तसंच वीजेचे खांब उन्मळून पडले, त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. शहरात सुमारे तासाभरात १६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं वृत्त आहे.

****

दरम्यान, येत्या ३६ तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

जालना जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. जालना-मंठा मार्गावर उटवदजवळ भरधाव जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. हे सर्व परतूर इथले रहिवासी होते.

जालना शहरातल्या मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन १३ वर्षीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काल सायंकाळी ही दुर्घटना घडली.

****

बीड जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन हायवा गेवराई पोलिसांनी काल ताब्यात घेतले. या प्रकरणी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून एक कोटी २० लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

****

नांदेड इथं सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात सामाजिक संपर्क माध्यमावरून आक्षेपार्ह मजकुराचा प्रसार केल्याप्रकरणी हे गुन्हे नोंदवण्यात आले.

****

No comments:

Post a Comment