Monday, 22 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:22.04.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 22 April 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २२ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यात नांदेड, हिंगोली आणि परभणीसह राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि वाशिम या आठ मतदार संघात, येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व मतदार संघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे.

अमरावतीमध्ये आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होत आहे.

नांदेड जिल्ह्यात भोकर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे.

****

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते. त्यानंतर युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत खैरे यांची प्रचार रॅली काढण्यात येत आहे. 

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार डॉ. हिना गावित तसंच काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी देखील आज उमेदवारी अर्ज भरतला. हिना गावित यांनी अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं.

मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील हे देखील अर्ज दाखल करत आहेत.

****

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात मराठवाड्यातल्या लातूर आणि उस्मानाबादसह राज्यातल्या अकरा मतदारसंघात ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले होते यापैकी ३१७ उमेदवारांचे अर्ज छाननी अंती वैध ठरले आहेत. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सात मे रोजी होणार आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

नांदेड इथं स्वीप कक्षाच्या वतीनं आज सकाळी सात वाजल्यापासून जिल्हा पोलिस परेड मैदानावर विविध उपक्रम राबवण्यात आले. महिला लेझीम पथक, पथनाट्य, मी मतदान करणारच अशी शपथ, विविध स्पर्धा यासह विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नांदेडकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं. संस्कार भारतीच्या वतीने जिल्हा पोलीस परेड मैदानावर भव्य रांगोळी काढून मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. कंधार तालुक्यातल्या पांगरा इथल्या अंगणवाडीतील बालकांनी मतदान जनजागृती गीत, तर नांदेड इथल्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं.

जालना जिल्हाधिकारी कार्यालयाचा बाहेरील आणि अंतर्गत भाग मतदानाच्या जनजागृतीचे आकर्षक पोस्टर आणि गोल पताका लावून सजवण्यात आला आहे.

****

अकोला जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमांतर्गत दोन हजार शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मिळून, अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारत, काल मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यावेळी उपस्थित होते.

****

बुलढाणा जिल्ह्यात सद्य:स्थितीतल्या उष्ण तापमानाच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या सुलभतेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यावेळी मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाला टोकन देण्यात येणार आहे. मतदानासाठी एकावेळी फक्त पाच मतदार रांगेत उभे राहतील, उर्वरीत टोकन असणाऱ्या मतदारांसाठी मतदान केंद्राच्या बाजूच्या खोलीत बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या म्हसावद पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱयांनी  एका चार चाकी वाहनाचा पाठलाग करत पाच लाख ५९ हजारांचा अवैध दारुचा साठा जप्त केला. यासंदर्भात गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

****

मेरेथॉन चालण्याची स्पर्धा मिश्र रिले स्पर्धेत भारताच्या प्रियंका गोस्वामी आणि अक्षदीप सिंह यांनी आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवली आहे. काल तुर्की मध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत १८व्या स्थानावर राहील्यानं त्यांची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली. 

नेमबाजीतही भारताच्या मनु भाकर आणि अनीश भानवाला यांनी दिल्लीमध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पहिल्या स्थानावर राहून ऑलिम्पिक मधली पात्रता जवळपास निश्चित केली आहे.

दक्षिण कोरियामध्ये झालेल्या जागतिक आशिया ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत नौकायनमध्ये भारताच्या बलराज पवारनं तिसरं स्थान मिळवून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे.

****

No comments:

Post a Comment