Tuesday, 23 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:23.04.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२३ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. या दिवशी हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं निवडणूक आयोगाला कळवला आहे. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यापूर्वी उष्णतेच्या लाटेवर लक्ष ठेवण्यासाठी आयोगानं कृती दलाची स्थापना केली आहे. या दलाकडून प्रत्येक मतदान टप्प्याच्या पाच दिवस आधी हवामानाचा अंदाज सादर केला जातो.

****

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल सात उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये बिहारमधल्या पाच आणि पंजाबमधल्या दोन उमेदवारांचा समावेश आहे. 

****

चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीनिमित्त आज ठीकठिकाणच्या हनुमान मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सर्वच लहान मोठ्या मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

****

शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधल्या सुट्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार दोन मे पासून उन्हाळी सुट्या लागणार आहेत, तर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार आहे. दिवाळीच्या सुट्या २८ ऑक्टोबरपासून १४ नोव्हेंबर पर्यंत असतील.

****

अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलिसांनी काल अटक केली. दिलीप पेंदाम असं त्याचं नाव असून, तो भामरागड तालुक्यातल्या नेलगुंडा इथला रहिवासी आहे.

****


छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुटी शिबीरं सुरू आहेत. या शिबीरांमध्ये चित्रकला, हस्तकला, कथाकथन, यासह विविध क्रीडाप्रकार शिकवले जात आहेत. आज या शिबीरात विद्यार्थ्यांना मल्लखांबाचं प्रशिक्षण देण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं काल नवा मोंढा परिसरात विशेष अभियान राबवत, २१० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केलं. सहा दुकानांमध्ये केलेल्या या कारवाईत १६ हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला.

****

भारताच्या तुलिका मान नं हाँगकाँग इथं सुरु असलेल्या आशियाई ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. तुलिकानं महिलांच्या ७८ किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या किम हायुनचा पराभव केला.

****

No comments:

Post a Comment