Wednesday, 1 May 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.05.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 May 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ मे २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट-भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा लढवणार

·      पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह अमान्य - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

·      व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात १९ रुपये कपात

आणि

·      महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा

****

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यातल्या ४८ जागांपैकी भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा लढवणार आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी कोल्हापूर इथं ही माहिती दिली. शिवसेनेनं आज तीन उमेदवारांची नावं जाहीर केली. नाशिकमधून हेमंत गोडसे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. ठाणे मतदारसंघात माजी महापौर नरेश म्हस्के महायुतीचे उमेदवार असतील.

****

काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम परवा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसलो तरी सुमारे २० वर्षानंतर शिवसेनेत पुन्हा प्रवेश करताना आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगानं, राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या चर्चात्मक कार्यक्रमाचं आज आकाशवाणीवरुन प्रसारण होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या सर्व प्रादेशिक केंद्रांवरुन हा कार्यक्रम ऐकता येईल.

****

लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यात रोकडा सावरगाव इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज प्रचार सभा घेतली. गरीब महिलांना मदत, सरकारी रिक्त पद भरती, शेतकरी कर्जमाफी, किमान हमी भाव कायदा, यासह अनेक मुद्यांवर नाना पटोले यांनी भाष्य केलं.

****

दरम्यान, मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत असून, आपण केलेल्या कामाबद्दल ग्रामीण भागातले नागरिक समाधानी असल्याचा दावा औरंगाबादचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी केला आहे. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक ही वैयक्तिक विषयांवर नव्हे तर विकासाच्या मुद्यावर लढायला हवी, असं भुमरे यांनी सांगितलं.

****

पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह मान्य ठरु शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हिंदू विवाह अधिनियम १९५५ नुसार हिंदू विवाहाची कायदेशीर आवश्यकता आणि पावित्र्य याबाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे. हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी सप्तपदी सारखे सोहळे आवश्यक असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. तरुण-तरुणींनी विवाह संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असं न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांनी नमूद केलं आहे.

****

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातल्या एका आरोपीने मुंबई पोलिसांच्या कोठडीत आत्महत्या केली आहे. अनुज थापन असं त्याचं नाव असून, त्याने चादरीच्या तुकड्याने स्वच्छतागृहात गळफास घेतल्याचं समोर आलं. कोठडीत झालेल्या या मृत्यूप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. गेल्या १४ एप्रिलला हा गोळीबार झाला होता.

****

व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो वजनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १९ रुपयांनी घट झाली आहे. आजपासून ही दरकपात लागू झाली. आता या सिलिंडरची मुंबईत किरकोळ विक्री किंमत प्रतिसिलिंडर एक हजार ६९८ रुपये ५० पैसे असेल. दरम्यान, घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

****

महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन आज साजरा झाला. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. उद्यमशील, पुरोगामी, आणि कष्टाळू नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून, सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू या, तसंच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू या, असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तर नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

मराठवाड्यातही महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयं, तसंच इतर शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण झालं.

छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी २८ पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. नागरिकांनी मतदान करुन लोकशाही समृद्ध करावी, असं आवाहन आर्दड यांनी यावेळच्या भाषणातून केलं.

****

बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. पोलिस मुख्यालयात पालकमंत्री मुंडे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. संचलनाचं निरीक्षण केल्यावर उपस्थितांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर पोलिस उपनिरीक्षक अमोल आगलावे, हवालदार कृष्णा तंगे, पोलीस नाईक सचिन चौधरी, राजेश काळे, अनिल चंद्रहास, शिपाई किरण कणखर यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते दहशतवाद विरोधी पथकातले दिलीप जाधव यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं.

****

परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 

विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक शेख महेबूब यांच्यासह सहा जणांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

****

हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी परेड सादर करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं.

****

लातूर इथं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. सावंत यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू विजय फुलारी यांच्या हस्ते, परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू इंद्रमणी यांच्याहस्ते तर, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

विभागात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या उन्हाळी शिबीरांमध्येही आज राज्यगीताचं गायन करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

****

आजचा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. विश्वात आर्थिक आणि सामाजिक अधिकार प्राप्तीसाठी श्रमिकांच्या बलिदानाची आठवण अर्थात श्रमिकांच्या योगदानाला सन्मानित करण्यासाठीचा हा दिवस मे दिन म्हणूनही ओळखला जातो.

****

आकाशवाणीच्या महासंचालक म्हणून मौसमी चक्रवर्ती यांनी आज पदभार स्वीकारला. भारतीय माहिती सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेल्या मौसमी चक्रवर्ती यांचा माहिती क्षेत्रात तीन दशकांहून अधिक व्यापक अनुभव आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.

****

No comments:

Post a Comment