▼

Thursday, 2 May 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.05.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 May 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ मे २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      सर्वेक्षणाच्या नावाखाली राजकीय पक्षांकडून मतदारांना कल्याणकारी योजनांचे प्रलोभन दाखवण्याच्या प्रकाराची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

·      लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस

·      नाशिक, दिंडोरी, कल्याण मतदारसंघातून महायुतीच्या तर मुंबई उत्तर पश्चिम आणि पालघर मतदारसंघातून महाआघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

आणि

·      मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी पारा चाळीशी पार, पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा हवामान खात्याचा इशारा

****

राजकीय पक्षांनी प्रस्तावित लाभार्थी योजनांसाठी सर्वेक्षण तसंच नोंदणीच्या नावाखाली मतदारांना प्रलोभन दाखवण्याच्या प्रकाराची निवडणूक आयोगांनं गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान, सर्वेक्षणाच्या नावाखाली कोणत्याही राजकीय पक्षाला मतदारांना कुठल्याही प्रकारचं प्रलोभन दाखवता येणार नसल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. निवडणुका पूर्ण होईपर्यंत कुठल्याही पक्षाला कल्याणकारी योजना, त्यावरील निधी तसंच कुठल्याही प्रकारच्या प्रकल्पांची पायाभरणी सारखे कार्यक्रम घेता येणार नसल्याचं मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत उद्या संपणार आहे. त्यामुळं अर्ज भरण्याची उमेदवारांची लगबग आज दिसून आली.

महायुतीच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. तसंच माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आज बंडखोरी करत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे, चंद्रकांत मोटे तर संयुक्त भारत पक्षाचे उमेदवार संभाजी जाधव यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून तर काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

ठाणे लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार राजीव भोसले, पालघर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पार्टीचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी तसंच भीमसेना या पक्षाच्या वतीनं मुकीमुद्दीन शेख यांनीही नामनिर्देशन पत्र दाखल केलं.

****

दिंडोरी आणि नाशिक इथले महायुतीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होतील, असा विश्वास शिवसेना पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतर्फे नाशिक आणि दिंडोरी इथल्या उमेदवारांनी आज अर्ज भरल्यानंतर ते नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास केला असून त्यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

****

इंडिया आघाडी अस्थिर सरकार देईल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाबाबत अजून चर्चा झालेली नसून पुरेसं संख्याबळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या लोकसभा निवडणुका पाच टप्प्यात घेण्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षाला अधिकाधिक ठिकाणी प्रचाराची संधी मिळावी म्हणून जाणीवपूर्वक राज्यातली निवडणूक लांबवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

****

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील सगळ्यात प्राबल्य असलेला पक्ष राहील असा दावा, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते आज लातूर इथं वंचित आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष तयार असेल तर एकत्र निवडणूक लढवू अशी इच्छा आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली.

****

जालना लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांची आज जालना जिल्ह्यात रामनगर इथं प्रचार सभा झाली. दरम्यान, जालना शहरातल्या दानवे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालं.

****

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, ठाकरे यांची सदिच्छा म्हणून भेट घेतल्याचं, विधीज्ञ निकम यांनी समाज माध्यमातून स्पष्ट केलं.

****

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या रत्नागिरी इथं सभा होईल. तर, कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची उद्या पुणे इथं सभा होणार आहे.

****

 

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या सात मे रोजी अहमदनगर आणि नंदुरबार इथं सभा होणार आहे. अहमदनगर इथं महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी तर नंदुरबार लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी या सभा होणार आहेत.

****

नवी मुंबईतले भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अशा सुमारे ६४ जणांनी आपले राजीनामे पक्षाचे माजी सभागृह नेते रविंद्र इथापे यांच्याकडे सादर केले आहेत. हे राजीनामे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती, नवी मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार यांनी दिली.

****

लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.

****

लातूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची दुसरी तपासणी आज निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी केली. लातूरच्या शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात ही तपासणी करण्यात आली.

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची तपासणी, येत्या चार मे, आठ मे, आणि १२ मे रोजी केली जाणार आहे. निवडणूक खर्च निरीक्षक सुसांता कुमार बिस्वास यांच्याकडून ही तपासणी केली जाईल. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रात ही तपासणी होईल.

****

नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी इथल्या पंप हाऊसमध्ये काल रात्री तांत्रिक बिघाड झाल्यानं, शहरातल्या काही भागात आगामी चार दिवस पाणीपुरवठा होणार नाही. या काळात पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केलं आहे. शहरातील उत्तर भाग तसंच देगलूरनाका, वजिराबाद आणि खडकपुरा भागात पुढील चार दिवस पाणीपुरवठा होणार नाही मात्र, या तांत्रिक बिघाडाचा नांदेड दक्षिण भागात कोणताही परिणाम होणार नसल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

राज्यात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्याच्या तुरळक भागात ३ ते ५ मे दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, रात्रीच्या वेळीही वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे. तसंच विदर्भात येत्या चार दिवसांत कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सियसपर्यंत वाढ होईल, असंही नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं कळवलं आहे.

दरम्यान, राज्यात आज अकोला इथं सर्वाधिक ४३ पूर्णांक १ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्याखालोखाल सोलापूर, अहमदनगर, जळगाव, मालेगाव, मराठवाड्यातील नांदेड, परभणी, धाराशीव, बीड, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातील बहुतांश ठिकाणी पारा चाळीशीपार पोहचला आहे. नांदेड इथ ४१ पूर्णांक सहा, परभणी इथं ४१, बीड इथं ४० पूर्णांक नऊ, छत्रपती संभाजीनगर इथं ४० पूर्णांक आठ तर धाराशीव इथं ४० पूर्णांक चार अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.

****

मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशा पर्यंत विस्तारीत करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या पाच मे रोजी मुंबईहून सुटणारी ही गाडी बल्लारशा पर्यंत धावणार असून परतीच्या प्रवासात सात मे रोजी बल्लारशा इथून सुटेल. ही गाडी पिंपळकुटी, वणी, भांडक, चंद्रपूर या रेल्वे स्थानकांवर थांबेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.

****

महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेश इथं भारत आणि बांग्लादेश संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज बांगलादेशनं निर्धारीत २० षटकांत आठ बाद ११८ धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ११ षटकांत बिनबाद ८८ धावा झाल्या होत्या.

****

इंडियन प्रिमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रीडासंकूलात संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल.

****

No comments:

Post a Comment