▼

Thursday, 2 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 02.05.2024, रोजीचे सकाळी:11.00,वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०२ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या रत्नागिरी इथं तर, कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची उद्या पुणे इथं सभा होईल. दरम्यान, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुणे जिल्ह्यातल्या भोर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभा घेतली. तसंच काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल कोल्हापूर इथं सभा झाली. या शिवशाहू निर्धार सभेत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली.

****

लातूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची निवडणूक विषयक खर्च नोंदीची दुसरी तपासणी आज निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांच्याकडून केली जात आहे. लातूरच्या शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात ही तपासणी होत आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अठ्ठेचाळीसाव्या नाट्यमहोत्सवांचं उद्घघाटन प्रसिद्ध चित्रपट तथा नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते काल झालं. १० मे पर्यंत चालणाऱ्या या नाट्यमहोत्सवात एकूण दहा नाटकं सादर होणार आहेत.

****

अमृतसरहून नांदेड इथं येणारी सचखंड एक्सप्रेस सुमारे २४ तास उशिरानं धावत असल्यानं नांदेड येथून आज सुटणारी हुजूर साहिब नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.

****

येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

No comments:

Post a Comment