Sunday, 2 June 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०२ जून २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 02 June 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासरासरी ६२ टक्के मतदान-परवा मतमोजणी

·      घरकुल योजनेत धनगर समाज बांधवांसाठी २५ हजार घरकुलांची अतिरिक्त तरतूद

·      शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यभरात धडक मोहीम-साडे तीनशे पथकांची स्थापना

·      नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त

आणि

·      टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ-सराव सामन्यात भारताचा बांग्लादेशवर ६० धावांनी विजय

****

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याआठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांकाल सरासरी ६२ पूर्णांक तीन टक्के मतदान झालं. पश्चिम बंगाल ७३ पूर्णांक ७९ शतांश टक्के, हिमाचल प्रदेश ७०, झारखंड ७० पूर्णांक ६६, उत्तर प्रदेश ५५ पूर्णांक ५९ , बिहार ५२, चंदीगढ सुमारे ६८, पंजाब ६१ पूर्णांक ३२, तर ओडिशामध्ये सरासरी ७० पूर्णांक ६७ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे. अरुणाचल प्रदेश तसंच सिक्कीम विधानसभेसाठीची मतमोजणी आज होत आहे.

 

दरम्यान, काल सायंकाळपासून सर्वच खासगी वृत्तवाहिन्या तसंच राजकीय समीक्षकांनी कलचाचण्यांनुसार निकालाचे अंदाज वर्तवण्यात सुरुवात केली आहे.

****

राठवाड्यात सर्वच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.

जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या तयारीची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मतमोजणीसाठी एक हजार ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी होत आहे.

****

हिंगोली लोकसभा मतदारसंघात एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ही माहिती दिली. हिंगोतील लिंबाळा मक्ता इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे.

****

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत जे जे दोषी आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत असल्याचं सांगत, विरोधकांनी केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी फेटाळून लावले. दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिलाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतल्या दोन परिचारिकांचीही चौकशी झाली आहे. 

****

राज्य शासनाच्या घरकुल योजनेत धनगर समाज बांधवांसाठी २५ हजार घरकुलांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे, राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. ते काल नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होते. धनगर समाजातील १० हजार मुलांच्या इंग्रजी शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी प्रति विद्यार्थी ७० हजार रुपये खर्च सरकार करणार आहे, तसंच धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीची १६ जुलै ते आठ ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधीत होईल. दहावी तसंच बरावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान होईल. परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या महा एचएसएससी बोर्ड डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उद्यापासून उपलब्ध होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.

****

राज्यातील तिसरी ते बारावीचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी तसंच परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्याकडे दानवे यांनी लेखी स्वरूपात ही मागणी केली आहे

****

 

 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ - एसटीचा ७६ वा वर्धापन दिन काल राज्यभरातील ५६० पेक्षा अधिक बस स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व बसस्थानकं स्वच्छ आणि टापटीप करून सजवण्यात आली होती. काही ठिकाणी कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांनी बसचं कृतज्ञतापूर्वक पूजन केलं, तर काही ठिकाणी एसटी बस सजवून तिची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन आणि पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.

 

छत्रपती संभाजीनगर इथं प्रवाशांना पुष्पगुच्छ आणि पेढे वाटून एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विभागात एसटीच्या दररोज एक हजार सहाशे फेऱ्यांमधून १७ हजारावर प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचं आगारप्रमुख संतोष नजर यांनी सांगितलं. येत्या वर्षभराअत्याधुनिक बस स्थानक उभारले जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली.

****

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य दर्जाची बियाणं, खतं, कीटकनाशकं यांचा पुरवठा होण्यासाठी राज्यभरात निविष्ठांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे  विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी ही माहिती दिली. यासाठी राज्यभरात साडे तीनशे भरारी पथकं कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कडक कारवाईचा इशाराही पाटील यांनी दिला आहे. अनुदानित युरिया खताचा गैरवापर होऊ नये म्हणूनही उपाययोजना केल्या जात असून युरियाच्या सर्वोच्च २० खरेदीदारांची तपासणीही क्षेत्रीय स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

****

नांदेड पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. नांदेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. इतर पंचायत समित्यांनीही यातून प्रेरणा घ्यावी, सं आवाहन करनवाल यांनी यावेळी केलं. पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर केलेल्या कामाची दखल घेऊन, हे मानांकन देण्यात आलं आहे.

****

टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरुवात होत आहे. आज पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा या संघादरम्यान होणार आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत काल भारत आणि बांग्लादेश संघात झालेल्या सराव सामन्यात भारतानं बांग्लादेशवर ६० धावांनी विजय मिळवला. भारतानं विजयासाठी दिलेलं १८३ धावांचं लक्ष्य साधतांना, बांग्लादेशचा संघ निर्धारीत षटकांत ९ गडी बाद १२२ धावांचं करु शकला.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात परिसरात गर्भलिंग तपासणीचं आतापर्यंतचं तिसरं रॅकेट समोर आलं आहे. याप्रकरणी गेल्या महिनाभरात तीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत अठरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तीन रॅकेटचं जाळं वाळूज, गारखेडा, सिल्लोड, तसंच भोकरदन मधील दहापेक्षा अधिक गावांमध्ये पसरल्याचं समोर येत आहे.

****

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेली सभा ही विनापरवानगी असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ दिवाकर कुलकर्णी यांच्या मातु:श्री सत्यवती माणिकराव कुलकर्णी यांचं काल रात्री निधन झालं, त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रतापनगर स्मशानभूमीत आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या चोरंबा पाटी इथं पोलीस दलाच्या वतीने लावलेल्या नाकाबंदी दरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत काल एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment