Sunday, 23 June 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २३ जून २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 23 June 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नीट प्रकरणी सीबीआय चौकशीचा केंद्र सरकारचा निर्णय-आतापर्यंत सहा जणांना अटक

·      एनटीएचे महासंचालक पदमुक्त-आजची नियोजित नीट पीजी रद्द

·      शिक्षकांना शिक्षणबाह्य कामं न देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन

·      सरकारी शिष्टमंडळासोबत चर्चेनंतर ओबीसी नेत्यांचं उपोषण तुर्तास स्थगित

·      अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना-छत्रपती संभाजीनगरात हज हाऊसमध्ये कार्यालय

आणि

·      टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर पन्नास धावांनी विजय

****

वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा नीट संदर्भातल्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यासाठी या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी बिहार पोलिसांनी काल झारखंडमधून सहा जणांना अटक केली. लातूर इथूनही दोन शिक्षकांना या प्रकरणात ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.

 

या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा परिषद-एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंह यांना पदमुक्त करण्यात आलं असून, या पदाचा कार्यभार, भारतीय व्यापार संवर्धन संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपसिंह खरोला यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर नीट पीजीची आज होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

 

दरम्यान, एनटीएच्या कार्यान्वयनासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. परीक्षा प्रक्रियेतल्या सुधारणा, माहिती सुरक्षा नियमन प्रणाली, तसंच परीक्षा परिषदेची एकूण संरचना आणि कार्यान्वयन, याचा ही समिती आढावा घेईल, तसंच दोन महिन्यात मंत्रालयाला अहवाल सादर करेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

स्पर्धा परीक्षांमधले गैरप्रकार आणि अनियमिततेला आळा घालण्यासाठीचा, सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य माध्यमांना प्रतिबंध कायदा २०२४ कालपासून लागू झाला. या कायद्यात गुन्हेगारांना दहा वर्ष तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.

****

ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि व्याख्याते म्हणून निवड करण्यासाठी संयुक्तपणे घेतली जात असलेली सी एस आय आर यूजीसी नेट परीक्षा राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं पुढे ढकलली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २५ जून ते २७ जून दरम्यान घेण्यात येणार होती.

****

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या सामायिक प्रवेश प्रक्रिया-सीईटीबाबतचे नागरिकांचे आक्षेप वस्तुस्थितीला धरून नसल्याचं, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. संगणकाधारित असलेली ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपरहीत आहे. त्यामुळे विद्यार्थी तसंच पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन आयुक्त सरदेसाई यांनी केलं आहे.

****

बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणारे प्रकार रोखण्यासाठी वस्तू आणि सेवा करात आधारसंलग्न बायोमेट्रीक यंत्रणा राबवली जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या ५३ व्या बैठकीत हा निर्णय झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. गुजरात, पुद्दुचेरीमध्ये याची चाचणी झाली असून टप्प्याटप्प्याने देशभरात याची अंमलबजावणी होईल, रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट, प्रतीक्षा कक्ष यासारख्या सुविधांना जीएसटीतून वगळल्याचं त्यांनी सांगितलं

****

शिक्षकांना शिक्षणबाह्य कामं न देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल अहमदनगर इथं मुख्याध्यापक-शिक्षक मेळाव्यात बोलत होते. शिक्षकांनी फक्त शिकवण्याचं काम केलं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. २००५ पूर्वी सेवेत आलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं आंदोलन करणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सरकारच्या एका शिष्टमंडळाने काल वडीगोद्री इथं उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेत, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं आश्वासन दिलं. त्यानंतर हाके यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित केलं. बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटणाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन सरकारनं दिल्यामुळे आंदोलन स्थगित केल्याचं, हाके यांनी सांगितलं आहे.

राज्य मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य छगन भुजबळ, धनंजय मुंडे, यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर  आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण करत असलेले विधीज्ञ मंगेश ससाणे यांचीही काल भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेअंती  ससाणे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं.

****

मराठा आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी या दोन मागण्यांबाबत राज्य शासनावर आमचा विश्वास असून, १३ जुलै पर्यंत आम्ही वाट पाहणार, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते. मराठा सामाजाला दिलेल्या कुणबी नोंदी रद्द होऊ देणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

****

लोकशाही मार्गाने प्रत्येकाने आंदोलन करावं मात्र आंदोलनात हिंसा नसावी अशी अपेक्षा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

****

खासगी उपसा सिंचनासाठीच्या वाढीव दरांना स्थगिती देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती पूर्ण होणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. २९ मार्च २०२२ रोजी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काढलेल्या आदेशामुळे खासगी उपसा सिंचनाला प्रवाही उपसा सिंचनाचे दर लागू झाल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं.

****

राज्य शासनाने अल्पसंख्याक आयुक्तालयांची स्थापना केली असून अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मोईन ताशीलदार यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या हज हाऊसमध्ये हे आयुक्त कार्यालय असणार आहे. या वर्षी २ फेब्रुवारीला हज हाऊसच्या लोकार्पण सोहळ्यात अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी हे आयुक्तालय स्थापनेची घोषणा केली होती  

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज - सी आय आय या संघटनेच्या मराठवाडा विभागाच्या कार्यालयाचं उद्घाटन टाटा केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा सी आय आयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आर मुंकुदन यांच्या हस्ते झालं. मराठवाड्यातली पाणी समस्या, रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासह पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्याचा मानस, मुकुंदन यांनी यावेळी व्यक्त केला.

****

टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल बांगलादेशवर पन्नास धावांनी विजय मिळवला. सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करणाऱ्या बांग्लादेश समोर भारतानं पाच बाद १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव वीस षटकांत आठ बाद १४६ धावांवर संपला. २७ चेंडूत अर्धशतक झळकावत, एक बळी घेणारा हार्दिक पांड्या सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारतानं सुपर एट फेरीत झालेले गट एक मधले दोन्ही सामने जिंकले आहेत. उर्वरीत एक सामना उद्या ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेत सध्या ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान लढत सुरु आहे.

****

भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम, प्रनीत कौर आणि अदिती स्वामी यांनी तुर्कीतल्या अंताल्या इथल्या झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत कंपाऊंड सांघिक प्रकारात सुवर्णपदकं जिंकली आहेत. भारतीय महिला संघाने या मोसमातल्या तीनही विश्वचषक स्पर्धेत कंपाउंड सांघिक प्रकारात सुवर्णपदकं जिंकण्याचा विक्रम केला आहे.

****

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या वतीनं आज २३ जून रोजी जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा केला जात आहे. खेळाडूंचा सन्मान तसंच ऑलिम्पिक दौडसह विविध कार्यक्रम आज होणार आहेत. सर्व जिल्ह्यांना ऑलिम्पिक दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

****

माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी काल भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षात दहा वर्षे काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले.

****

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ इथले प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर प्रकाश रामचंद्रराव डुबे यांचं काल निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील JEE, NEET, CET या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलं, या गुणवंत विद्यार्थ्यांचा काल महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.

****

लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या देवकरा ग्रामपंचायतीमध्ये 'माझं लातूर, हरित लातूर' या पाच हजार झाडं लावण्याच्या मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल उपस्थित होते.

****

श्री संत गजानन महाराज यांच्या पंढरपूर आषाढी वारीच्या पालखीचं आज हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव इथं आगमन होत आहे.आज संध्याकाळी ही पालखी सेनगावला येणार असून इथंच मुक्कामी असणार आहे. १३ जूनला पालखी शेगावहून मार्गस्थ झालेली आहे.

****

हवामान

येत्या दोन दिवसात मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. दरम्यान, काल छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे.

****

No comments:

Post a Comment