Tuesday, 4 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:04.06.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०४ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण ५४२ पैकी तीनशेहून अधिक जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, २०० ते २०५ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास ३० जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.

मध्यप्रदेशात सर्व २९ जागांवर, गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर तर उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.

महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी २६ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी १९ जागांवर आघाडी मिळवली आहे.

 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून तिसर्या फेरी अखेर महायुतीचे संदीपान भुमरे आघाडीवर आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल दुसर्या, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसर्या क्रमांकावर आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत. जालना मधून महायुतीचे रावसाहेब दानवे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणी मधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूर मधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबाद मधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर नांदेड मधून महायुतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत.

 

नंदुरबार मधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.

 

बुलडाणा मधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूर मधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतमाळ मधून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा - गोंदिया मधून महायुतीचे सुनिल मेंढे, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावती मधून महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे, अकोला मधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून, भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसर्या क्रमांकावर आहेत.

 

दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे, नाशिक मधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघर मधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडी मधून महायुतीचे कपिल पाटील, कल्याण मधून महायुतीचे श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.

 

रायगड मधून महायुतीचे सुनिल तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामती मधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरुर मधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगर मधून महाविकास आघाडीचे निलेश लंके, तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.

 

सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मधून महायुतीचे धैर्यशील मोहिते पाटील, तर रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत.

 

उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, इशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महायुतीचे रविंद्र वायकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत. 

****

उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. अमेठी मतदरासंघातून काँग्रेसचे किशोरी लाल आघाडीवर, तर भाजप नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दुसर्या क्रमांकावर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली इथून तसंच केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आघाडीवर आहेत.

****

मतमोजणीच्या सर्व फेऱ्यांचे कल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर वर तसंच व्होटर हेल्पलाइन ॲपवर उपलब्ध आहे. आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे. 

****

मतमोजणीच्या ताज्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणीवरुन निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सायंकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी विशेष बातमीपत्र प्रसारित होईल. आमच्या यूट्यूब चॅनलवर तसंच सामाजिक माध्यमांवर ही बातमीपत्रं आपल्याला ऐकता येतील. त्याशिवाय, निवाडा जनतेचा हा निवडणूक निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम देखील सादर होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसंच छत्रपती संभाजीनगर इथले राजकीय विश्लेषक या कार्यक्रमात सहभागी होऊन, निवडणूक निकालाबात माहिती देत आहेत.

****

राज्यातली पाणी टंचाई, बी - बियाण्यांचा तुटवडा, शेतकरी आत्महत्या, पुणे अपघातप्रकरणी सरकारी अधिकारी डॉक्टरांचा समावेश, या विषयांवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला जबाबदार ठरवलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातली पाण्याची टंचाई पाहता युती सरकारने आणलेली जलयुक्त शिवार दोन ही योजना फोल ठरल्याचं दानवे म्हणाले.

****

लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असून या आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचं लातूर जिल्हा प्रशासनाने कळवलं आहे. या काळात विना परवानगी मिरवणूक काढणं, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास मनाई असून या नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

****

No comments:

Post a Comment