Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 05 June 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०५ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
·
सतरावी लोकसभा राष्ट्रपतींकडून
बरखास्त-पंतप्रधानांचा राजीनामा
·
देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही
राजीनाम्याचे संकेत-मात्र निवडणूक निकाल ही सामुहिक जबाबदारी असल्याचा मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांचा निर्वाळा
·
खासदारांची संख्या एक अंकी झालेल्या
भाजपने आत्मचिंतन करावं-विजय वडेट्टीवार यांचा सल्ला
आणि
·
जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र
विविध कार्यक्रमांनी साजरा
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी सतरावी लोकसभा बरखास्त केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रपतींकडे
आजच याबाबतची शिफारस केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींची भेट
घेऊन, मंत्रिमंडळासह आपला पंतप्रधानपदाचा राजीनामा सादर केला, नवीन सरकार स्थापन होईपर्यंत
कामकाज सांभाळण्याची सूचना राष्ट्रपतींनी यावेळी त्यांना केली.
केंद्रीय
मंत्रिमंडळासाठी राष्ट्रपतींनी आज 'रात्रीभोज' आणि निरोप समारंभ आयोजित केला आहे.
दरम्यान,
दिल्ली इथं आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षांची बैठक सुरु आहे. या बैठकीला राज्यातून
मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत. आपण काही मागण्यासाठी नव्हे,
तर पंतप्रधानांना सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचं, शिंदे यांनी
सांगितलं.
काँग्रेस
प्रणित इंडिया आघाडीचीही आज दिल्लीत बैठक होत आहे. विविध घटकपक्षांचे नेते या बैठकीला
हजर राहण्यासाठी दिल्लीत पोहोचत असल्याचं वृत्त आहे.
दरम्यान,
राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे बहुमताचं संख्याबळ असल्यानं, सरकार स्थापनेत काहीही अडचण
नसल्याचं, भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी नमूद केलं आहे. ते म्हणाले –
दावा कोई भी पेश कर सकता है। बीजेपी और एन डी ए की
अलायंस मिलकर वो आकडा स्पष्ट हो गया है, जो दिखाई दे रहा है। रिझल्टस् पुरे आ चुके
है। जब एन डी ए अलायंस पार्टनर्स मिलकर बहुमत का आकडा हो रहा है तो सरकार स्थापन करने
मे कोई दिक्कत नही है।
****
लोकसभा
निवडणुकीत राज्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचे
संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीच्या
बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आपल्याला
सरकारमधून मोकळं करावं, अशी मागणी आपण वरिष्ठांकडे करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं,
ते म्हणाले –
हा जो काही भारतीय जनता सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन
करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस, मी या ठिकाणी सगळी स्वीकारतो.
आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ याठिकाणी
उतरायचं आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला ही विनंती करणार
आहे, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची संधी
द्यावी. जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत, त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने
मला माझा पूर्ण वेळ देता येईल.
या
पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते, फडणवीसांनी सरकारमध्येच राहूनच पक्षासाठी काम करावं अशी विनंती करणार
असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनीही या संदर्भात बोलतांना, निवडणूक निकाल ही सामुहिक जबाबदारी असल्याचं
सांगितलं. महायुतीला जागा अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्या असल्या तरीही मतांची टक्केवारी
कायम असल्याचं, काही ठिकाणी वाढल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलं –
ही जी कही जबाबदारी आहे, जे काही निकाल लागले, ती
आमची सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही टीम म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये
जागा आमच्या कमी झाल्या असल्या, तरी सुद्धा मतं जी आहेत ती intact राहिली आहेत. मतं
काही ठिकाणी मुंबईत वाढलेली आहेत. आणि मूळ मतदार जो आहे, तो महायुतीबरोबर राहिला.
****
राज्यात
भाजपच्या खासदारांची संख्या एक अंकी झाली असून, भाजपने आत्मचिंतन करावं, असा सल्ला
विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. ते आज मुंबईत पत्रकार
परिषदेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ऐतिहासिक विजय मिळाला, हे राहुल
गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं यश असल्याचं
वडेट्टीवार यांनी सांगितलं.
****
विधान
परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आज चार उमेदवारांनी सहा
नामनिर्देशन पत्रं सादर केली. या जागेसाठी आतापर्यंत १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
गव्हारे
पंडीत सुपडू यांनी अपक्ष म्हणून, रतन राजलदास चावला तसंच महेंद्र मधुकर भावसार, यांनी
अपक्ष तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे प्रत्येकी दोन अर्ज, तर दत्तात्रय भाऊसाहेब
पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अर्ज सादर केला आहे. या मतदार संघाचे विद्यमान
आमदार किशोर दराडे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. तर महाविकास
आघाडीने शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे.
****
राज्यसभेचे
सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्याची
सूचना राज्य विधीमंडळ सचिवालयानं जारी केली आहे. त्यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला
१३ जून पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असून, निवडणूक लढवली गेल्यास २५ जून
रोजी मतदान होणार आहे.
****
जागतिक
पर्यावरण दिवस आज साजरा होत आहे. १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या मानव पर्यावरणावरील
स्टॉकहोम परिषदेपासून हा दिवस साजरा करण्यास प्रारंभ झाला. जमिनीचं पुन:स्थापन, वाळवंटीकरण
आणि दुष्काळावर मात, अशी यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे.
जागतिक
पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरीकांना, शाश्वततेवर आधारित
एक चांगलं आणि हरित जग निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे.
पृथ्वीचं रक्षण ही आपली मुख्य जबाबदारी असल्याचं, त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात
नमूद केलं.
उपराष्ट्रपती
जगदीप धनखड यांनी पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतांना, मानवता आणि निसर्ग यांच्यातील
सुसंवाद हा शाश्वत जीवनाचा पाया असल्याचं सांगितलं.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेअंतर्गत बुद्ध जयंती उद्यानात
वृक्षारोपण केलं. देशभरात कोट्यवधी झाडं लावण्यासाठी एक जनआंदोलन उभारण्याच्या उद्देशानं
ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जागतिक
पर्यावरण दिनाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज आंब्याच्या कोयी
संकलनाची विशेष मोहीम राबवण्यात आली.
****
छत्रपती
संभाजी नगर शहरातील विविध प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपणाचा
कार्यक्रम घेण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील रामनगर, स्वर्गीय बाळासाहेब
ठाकरे उद्यान, झोन क्रमांक सात यांच्यासह शहरातील विविध परिसरात सुमारे एक हजार वृक्षांची
लागवड करण्यात आली.
****
प्रत्येकाने
पर्यावरण पूरक जीवनशैली आत्मसात केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन निसर्गाचा समतोल कायम राखण्यास मदत होईल असं प्रतिपादन परभणी
इथं ‘आत्मा’ प्रकल्पाचे संचालक दौलतराव चव्हाण यांनी केलं आहे. आजच्या जागतिक पर्यावरण
दिनानिमित्त, नांदेड इथं केंद्रीय संचार ब्यूरो, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग
परभणी आणि शिवकृषक ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी तालुक्यात
पोहेटाकळी इथं विशेष प्रचार कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जमिनीची
सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर करण्यावर भर द्यावा असं मतही त्यांनी व्यक्त
केलं. यावेळी विद्यार्थ्यांची पर्यावरणाविषयक भित्तीपत्रक स्पर्धा घेण्यात आली. या
स्पर्धेत जवळपास १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या
हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
****
धुळे
महानगरपालिकेत आज झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ही झाडं सुमारे ५ वर्षापूर्वी
धुळे महानगरपालिका प्रांगणात आजच्या जागतिक पर्यावरणदिनी लावण्यात आलेली आहेत.
****
टी
- ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार
आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.
****
नैऋत्य
मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तसंच गोव्यात पुढे सरकला आहे. येत्या
तीन ते चार दिवसांत राज्यात मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी स्थिति अनुकूल असण्याची शक्यता
हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात देगलूर इथं आज दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसाने देगलूर बाजारपेठेत व्यापारी
तसंच ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे
शेतकरी खरीपाच्या पेरणीला लागले असून, बी -बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली
आहे. आज झालेल्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या खरीपपूर्व मशागतीला गती मिळणार
आहे.
****
No comments:
Post a Comment