Friday, 7 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 07.06.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date: 07 June 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. नवी दिल्लीत सुरु असलेल्या एनडीएच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत, भाजप नेते राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांना नेतेपदी निवड करण्यासाठी प्रस्ताव मांडला, त्याला सर्व घटक पक्षांनी समर्थन दिलं. भाजपच्या वरीष्ठ नेत्यांसह आघाडीतले तेलगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबु नायडू, संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, आदी घटक पक्षांचे नेते तसंच नवनिर्वाचित खासदार या बैठकीला उपस्थित आहेत. त्याचबरोबर भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, इतर पदाधिकारी देखील यावेळी हजर आहेत. आजचा दिवस ऐतिहासिक असून, शिवसेना - भाजप युती अतुट असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

आंध्र प्रदेशातही एनडीएचं सरकार स्थापन होणार असल्याचं भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यावेळी सांगितलं.

****

भारतीय रिझर्व्ह बॅंकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नसून, रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के इतका कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर सात पूर्णांक दोन टक्के राहील, तर महागाईचा दर साडे चार टक्के राहील, असा अंदाज दास यांनी व्यक्त केला.

****

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नगरसेवक अमीत सरैया यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते. या मतदारसंघातून संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपत आहे.

****

रशियात सेंट पिटर्सबर्ग विधानसभा आणि महाराष्ट्र विधिमंडळ यांच्यात काल सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. रशियन फेडरेशनच्या निमंत्रणानुसार, महाराष्ट्र विधानमंडळाचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ सेंट पिटर्सबर्गच्या अभ्यास दौऱ्यावर आहे. दोन्ही विधानमंडळांमध्ये वैचारिक आदान-प्रदान, दोन्हीकडील सन्माननीय सदस्यांच्या अभ्यास-भेटी, संगीत-कला-साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांच्या कार्यक्रमांचं आयोजन या सामंजस्य करारामुळे आता अधिक चांगल्याप्रकारे करता येऊ शकेल, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केला. महिला सशक्तीकरण, अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रम या बाबींना सामंजस्य करारामुळे चालना मिळेल अशी अपेक्षा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी व्यक्त केला.

****

राज्यात नॅनो डीएपी, नॅनो युरीया, मेटाल्डीहाईड किटकनाशकाची तिप्पट दराने खरेदी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली असून, हा कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा असल्याचा आरोप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या अतिसार नियंत्रण पंधरवाड्याचं उद्घाटन काल महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांच्या हस्ते झालं. २१ जून पर्यंत राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत आशाताई घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत तसंच अतिसाराबाबत समुपदेशन करत आहेत.

****

परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातल्या पोहंडूळ इथं ग्रामविकास अधिकार्याला १० हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. डी पी डी सी निधी अंतर्गत केलेल्या विकास कामाच्या रकमेस बँक खात्यात जमा करण्यासाठी फॉर्मवर सही देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

नांदेड रेल्वे विभागातल्या कामांमुळे धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात आली आहे. आजपासून ते ११ जूनपर्यंत धर्माबाद - मनमाड ही गाडी जालना ते मनमाड दरम्यान, आणि मनमाड - धर्माबाद ही गाडी मनमाड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसंच नांदेड निझामुद्दीन एक्सप्रेस चिकलठाणा इथून ७० मिनिटे उशिरा सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.

****

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा आज उपान्त्य-पूर्व फेरीतला सामना डेन्मार्कच्या आंद्रेस ॲन्टोन्सेन बरोबर होणार आहे. काल झालेल्या सामन्यात लक्ष्य सेननं जपानच्या केन्टा निशिमोटो याचा २१ - नऊ, १२ - १५ असा पराभव केला होता.

****

हवामान

येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यासाठी आठ जूनपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment