आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२३ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणात नांदेडच्या एटीएस पथकानं दोन संशयीत शिक्षकांना चौकशीसाठी घेतलं होतं. दोघे शिक्षक सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून, ते लातूरमध्ये खाजगी कोचिंग क्लास चालवतात. या माध्यमातूनच पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. दरम्यान, या शिक्षकांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं असल्याची माहिती नांदेडच्या एटीएस पथकाकडून देण्यात आली.
****
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी आज घेण्यात येणारी पीजी नीटची परीक्षा रद्द केली आहे. अता या परीक्षेचं सुधारीत वेळापत्रक लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे.
****
आज कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी आणि जोराचे वारे वाहण्याचा अंदाज आहे. तसंच विदर्भातही जोराच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
****
मराठा समाजाला आरक्षण देतानाच इतर मागास प्रवर्ग-ओबीसींवर अन्याय होणार नाही, अशी राज्य शासनाची भूमिका आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते जळगाव इथं शैक्षणिक संस्था चालकांच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत काल रात्री बोलत होते.
आगामी विधिमंडळ अधिवेशन काळात बैठक घेऊन दोन्ही समाजांवर अन्याय होणार नाही, यादृष्टीनं निर्णय घेतला जाईल. तसेच या घटकात तेढ आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यादृष्टीनं सरकार लवकरच निर्णय घेईल, असं ते म्हणाले.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियावर २१ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्ताननं सहा बाद १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ विसाव्या षटकाचे चार चेंडू शिल्लक असतांना १२७ धावांवर सर्वबाद झाल्यामुळं अफगाणिस्तानला २१ धावांनी विजय मिळाला.
दरम्यान, भारतानं सुपर एट फेरीतले गट एक मधले दोन सामने जिंकले असून उर्वरीत एक सामना उद्या ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. भारताची स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेशाकडं दमादार वाटचाल सुरु आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीतील राजकीय -लष्करी हालचालींचा प्रभारी, वरिष्ठ नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू यानं पत्नी संगीतासह; राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल शरणागती पत्करली. त्याच्यावर ८६ चकमकी, १५जाळपोळीच्या अशा १७९ गुन्ह्यांची नोंद आहे. तर, महाराष्ट्र शासनानं त्याला पकडण्यासाठी २५ लाख रुपये बक्षीस जाहीर केलं होतं.
****
No comments:
Post a Comment