Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
· विरोधी पक्षांच्या खोट्या विधानांविरोधात कठोर कारवाई करावी-पंतप्रधानांची लोकसभाध्यक्षांकडे मागणी.
· राज्यात एक लाख कोटी रुपये गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्मिती-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त.
· आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधान परिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबित.
· सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेसाठी ११७ हेक्टर भूसंपादन पूर्ण- २४६ कोटी मावेजा वितरित.
आणि
· 'नीट'पेपर फुटी प्रकरणी लातूर इथल्या दोन शिक्षक आरोपींना सहा जुलै पर्यंत सीबीआय कोठडी.
****
विरोधी पक्षांकडून संसदेत केली जात असलेली निराधार आणि खोटी विधानं, दुर्लक्ष करण्यासारखी नसल्यानं, त्याविरोधात कठोर कारवाईची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभाध्यक्षांकडे केली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला लोकसभेत उत्तर देतांना पंतप्रधानांनी ही मागणी केली. गेल्या दहा वर्षांच्या आपल्या कार्यकाळावरचा विश्वास म्हणूनच जनतेनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएला तिसऱ्या वेळेस स्थैर्य आणि निरंतरता यासाठी बहुमत दिल्याचं सांगत, विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं
काँग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीत सलग तिसरा मोठा पराभव असून, पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. दरम्यान, पंतप्रधानांच्या या भाषणादरम्यान विरोधकांनी सातत्यानं घोषणाबाजी सुरू ठेवली होती.
****
राज्याच्या विधानसभेतही राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. राज्यात आगामी काळात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी विविध उद्योगांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १४ टक्के आहे. परदेशी थेट गुंतवणुकीतही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून, उद्योग आणि सेवा क्षेत्रातही महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठवाड्यात वॉटर ग्रीड प्रकल्प तसंच समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या योजनेचाही मुख्यमंत्र्यांनी या भाषणात उल्लेख केला –
मराठवाडा वॉटर ग्रीड सर्व आठ जिल्ह्यातील १२५० गावांना जलजीवन मिशनमध्ये घेतलंय आणि एकोणतीस हजार कोटींच्या कामांना आम्ही तत्वतः मान्यता दिलेली आहे. जे काही वाया जाणारं पाणी पुन्हा या ठिकाणी या दुष्काळी भागाकडे वळवण्याचं काम आपलं सरकार करेल.
शेतकरी, कष्टकरी, कामगार, बहिण, युवा आणि वारकरी यांच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी जमिनीची अट काढून टाकली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना लगेच मदतीची रक्कम जमा केली जाईल, तसंच उर्वरित महिलांना अर्ज आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली की जुलै पासूनचे पैसे दिले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणी सरकारी अधिकारी - कर्मचारी पैसे मागत असेल तर त्यांची तक्रार करावी, त्यावर तत्काळ कारवाईचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यात वरूड इथं एका तलाठ्याला अशाच प्रकरणात निलंबित करण्यात आलं आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ही माहिती दिली. तुळशीराम कंठाळे असं या तलाठ्याचं नाव आहे.
****
विधान परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबन करण्याचा ठराव आज विधान परिषदेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला. यासंदर्भात विरोधकांची बाजू ऐकून घेण्यात यावी, असा आग्रह विरोधी पक्षांनी केला, मात्र अशा प्रकारच्या ठरावांवर कधीही चर्चा होत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावर विरोधकांनी हौद्यात उतरून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि या निर्णयाच्या विरोधात सभात्याग केला. सभापतींनी हा निर्णय देताना, या विषयावर झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत अंबादास दानवे यांची अनुपस्थिती, तसंच झालेल्या वर्तनाबाबत कोणतीही अपराधीपणाची भावना त्यांच्या वर्तनात नव्हती, असं निरीक्षण नोंदवत, याला आळा न घातल्यास महिलांना असुरक्षित वाटेल, असं वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, हा निर्णय एकांगी आणि अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलतांना, दानवे यांच्या कथित अवमानकारक वक्तव्याबद्दल आपण माफी मागत असल्याचं सांगितलं. मात्र दानवे यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता, सदनानं असा ठराव संमत करणं हे लोकशाहीला घातक असल्याचं ठाकरे यांनी नमूद केलं
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या संवर्गाकरीता घेण्यात येणारी टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा १ जुलै ते १३ जुलै, दरम्यान घेण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचं आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे. या परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल, असं आयोगानं कळवलं आहे.
****
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ११ जागांसाठी १४ उमेदवारांनी २४ अर्ज भरले आहेत. भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर तसंच अमित गोरखे, यांनी अर्ज भरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी यांनी अर्ज भरला. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांनी तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या अर्जांची छाननी उद्या होणार असून शुक्रवार पर्यंत अर्ज मागे घेता येतील. १२ जुलै रोजी मतदान तसंच मतमोजणी होणार आहे.
****
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेतला एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, असं आश्वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. पुढचा हप्ता वितरीत करण्यापूर्वी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा पात्र यादीत सहभागी करून घेतलं जाईल, असंही मुंडे यांनी सांगितलं. गेल्या वर्षभरात या योजनेमध्ये २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आल्याची माहिती, मुंडे यांनी एका लक्षवेधीच्या उत्तरादरम्यान सदनाला दिली.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ- एस. टी.च्या ताफ्यात ५ हजार १५० नवीन इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. जुन्या सहा हजार बस आता स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्यात येत असल्याचं भुसे यांनी सांगितलं. शासनाने महामंडळाला विद्यार्थी प्रवास सवलत योजनेपोटी ८३७ कोटी, ज्येष्ठ नागरिक विनामूल्य प्रवास सवलत योजनेसाठी १ हजार १२४ कोटी, तर महिला सन्मान योजनेकरीता १ हजार ६०५ कोटी रुपयांची प्रतिपूर्ती केली असल्याची माहिती भुसे यांनी दिली. महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत करण्यात येत असल्याचंही भुसे यांनी सांगितलं.
****
सोलापूर तूळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी १८७ पूर्णांक ३३ हेक्टर जमिनीपैकी ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण झालं आहे. त्यासाठी आतापर्यंत २४६ कोटी रुपये मावेजाचं वाटप करण्यात आलं आहे. येत्या चार महिन्यात भू संपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास भू संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने प्रस्ताव दाखल करण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं. यासाठी येत्या १० जुलै पासून गाव निहाय्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
****
नीट'पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले लातूर इथले आरोपी जलील खान पठाण आणि संजय जाधव या दोन्ही आरोपींना सहा जुलै पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने, त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आरोपींच्या सीबीआय कोठडीची मागणी सीबीआयने न्यायालयाकडे केली होती, न्यायालयाने ती मान्य केली. दरम्यान या प्रकरणाला आता अधिक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
****
ग्रामीण भागात पावसाळ्यात होणाऱ्या जलजन्य आजारांबाबत अतिसार थांबवा या अभियानांतर्गत व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत. या अभियानाचा शुभारंभ आज जालना जिल्हा परिषदेत मुख्याधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
****
संतश्रेष्ठ शेगाव निवासी गजानन महाराज यांच्या पालखीचं आज अंबाजोगाई इथं आगमन झालं. माजी नगराध्यक्ष तथा श्री योगेश्वरी देवल कमिटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी या पालखीचं स्वागत केलं. आजच्या मुक्कामानंतर पालखी उद्या पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.
****
No comments:
Post a Comment