Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· राज्यघटना दीपस्तंभासारखी मार्गदर्शक - पंतप्रधान मोदी यांचं राज्यसभेत प्रतिपादन, संसदेचं अधिवेशन संस्थगित
· मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पारदर्शीपणे राबवण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
· नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला आजपासून सुरुवात, आकांक्षी जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
· टी-ट्वेन्टी विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचं मायदेशी आगमन, पंतप्रधान घेणार खेळाडूंची भेट
****
भारताची राज्यघटना ही प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखीच मार्गदर्शक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यसभेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच आपल्यासारखा राजकीय वारसा नसलेल्या व्यक्तीला राजकारणात येण्याची आणि इतक्या मोठ्या पदावर पोहचण्याची संधी मिळाली, असं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, विरोधकांनी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान घोषणा देत सभात्याग केला. सभापती जगदीप धनखड यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, देशाचं संविधान हे फक्त हातात ठेवण्यापुरतं नसून, ते जीवनात आत्मसात करण्याची गरज असल्याचं नमूद केलं. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सदनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना, पंतप्रधानांच्या काही विधानांवर आक्षेप घेत, सभात्याग केल्याचं सांगितलं.
पंतप्रधानांच्या उत्तरानंतर राज्यसभेचं कामकाज काल अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. लोकसभेचं कामकाज परवाच संस्थगित झाल्यामुळे, संसदेचं अधिवेशन संस्थगित झालं.
****
'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेच्या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची कोणतीही अडवणूक केल्यास, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाईच्या सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं, तसंच प्रत्येक जिल्ह्यात सुकाणू अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
या योजनेत नोंदणीसाठी अधिवास प्रमाणपत्राऐवजी पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र तसंच जन्माचा दाखला, यापैकी एक पुरावा आवश्यक आहे. त्यामुळे अतिरिक्त कागदपत्रांकरता महिलांनी सेतुसुविधा केंद्रात गर्दी करू नये, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी परीक्षेतल्या गैरप्रकारांच्याविरोधात कायदा करण्याचं सुतोवाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल विधान परिषदेत बोलतांना त्यांनी, याच अधिवेशनात याबाबतचं विधेयक सदनात सादर होईल, असं सांगितलं. आपल्या सरकारनं दोन वर्षाच्या कार्यकाळात एक लाख सरकारी नोकऱ्या देण्याचा विक्रम केला आहे, यापैकी ७७ हजार ३०५ युवकांना नोकरी मिळाली असून, पुढच्या तीन महिन्यात सुमारे ३० हजारावर नोकऱ्यांची नियुक्तीपत्रं दिली जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातल्या जोगेश्वरी इथल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास तातडीनं मंजुरी देण्यात येणार असल्याचं, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. आमदार सतीश चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यातल्या सर्व प्रकारच्या महानगरपालिकांच्या वैद्यकीय अधिकारी संवर्गातल्या पदाच्या भरतीबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी काल विधानपरिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सामंत बोलत होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी संवर्गाची ४१ पदं मंजूर असून २९ पदं भरलेली आहेत.
****
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्याकडे आपल्या निलंबनाबाबत फेरविचार करावा अशी विनंती एका पत्राद्वारे केली आहे. या निलंबनासंदर्भात फेरविचाराचा निर्णय विचाराधीन असल्याचं, उपसभापतींनी काल सभागृहात सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या परिषदेच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
****
महाराष्ट्रात आढळलेल्या झिका विषाणूच्या काही प्रकरणांनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सगळ्या राज्यांसाठी याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सगळ्या राज्यांनी याबाबत सतत दक्ष राहावं आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्य सरकारनं झिका विषाणू संसर्गाबाबतची सद्य:स्थिती एका पत्रकाद्वारे जाहीर केली असून, यावर्षी आतापर्यंत या संसर्गाचे आठ ते दहा रुग्ण आढळून आल्याचं यात म्हटलं आहे. हा विषाणू डासामार्फत पसरत असल्यानं नागरिकांनी, काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, पुणे शहरात झिका विषाणूचा संसर्ग झालेला सातवा रुग्ण आढळल्याचं वृत्त आहे. यामध्ये पाच महिला असून त्यापैकी दोघी गर्भवती आहेत.
****
वीरमरण प्राप्त झालेले अग्निवीर अजय कुमार यांच्या कुटुंबियांना एक कोटी ६५ लाख रुपयांचं अर्थसहाय्य केल्याचं, सैन्यदलानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय सैन्यदल अग्निवीरांच्या कल्याणासाठी कटीबद्ध असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे.
****
नीति आयोगाच्या संपूर्णता अभियानाला आजपासून देशभर सुरुवात होत आहे. देशातले ११२ आकांक्षी जिल्हे आणि ५०० तालुक्यांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत हे अभियानात राबवण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यात परंडा इथं या अभियानाचं आज उद्घाटन होणार आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी याबाबत अधिक माहिती दिली..
‘‘उद्देश हाच आहे की आपले जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना १०० टक्के लाभ मिळवून देणं. आणि आपले जे पॅरामिटर्स आहेत, विशेषतः आरोग्याचे, शैक्षणिक आणि शेतीशी रिलेटेड पॅरामिटर्स आहेत ते १०० टक्के अचिव्ह करणं आणि आपल्या प्रोग्राम जो उद्देश हाच आहे की, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्याला म्हणतो, ज्याच्यामधेय प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण आणि इनकम हे तीन फॅक्टर त्याच्याशी रिलेट असतात त्याच्यामध्ये वृद्धी करणे.’’
नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात झाली. आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत सर्व निकष ऑगस्टअखेर पूर्ण केले जातील, असं राऊत त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात बीड जिल्ह्यात वडवणी, जालना जिल्ह्यात बदनापूर तसंच परतूर, आणि हिंगोली इथंही या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या अभियानात महत्त्वपूर्ण क्षेत्रातल्या एकूण चाळीस निर्देशकांचा समावेश आहे.
****
राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाईल, तसंच वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलत होते.
दरम्यान, संत मुक्ताबाईंच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. शहरात माळीवेस इथल्या हनुमान मंदिरात मुक्ताईंच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या आहेत. आज ही पालखी पेठ बीड भागातल्या बालाजी मंदिरात पोहोचणार आहे.
अंमळनेर इथल्या संत सखाराम महाराज यांची दींडी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दौलताबाद इथं मुक्कामी होती, ही दींडी आज वाळूजला पोहोचणार आहे.
पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज राक्षसभूवन इथला मुक्काम आटोपून पुढे मार्गस्थ होत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज जेजुरीतल्या मल्हारनगरीत पोहोचणार आहे. तर संत तुकाराम महाराजांची पालखीनं काल लोणी काळभोर ते यवत काल २७ किलोमीटरचा सर्वात मोठा टप्पा पार केला. आज ही पालखी यवतहून मार्गस्थ होत आहे.
****
संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथांचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा काल अहमदनगर इथं साजरा झाला. दरवर्षी आषाढी वारीच्या मार्गावर वारकऱ्यांच्या समवेत अहमदनगरमध्ये तसंच त्र्यंबकेश्वर इथं हा संजीवन समाधी सोहळा साजरा होत असतो.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक विजेता भारतीय संघ आज भारतात दाखल झाला. सकाळी हा संघ नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल. त्यानंतर दुपारी या संघाचं मुंबईत आगमन होईल. मुंबईत मरीन ड्राइव्हवर त्यांची विजयी मिरवणूक काढली जाणार असून, वानखेडे मैदानावर विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन केल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली.
****
नांदेड शहरात एका अपघातात मेंदू मृत झालेल्या अभिजित ढोके या रुग्णाचे अवयव त्यांच्या कुटुंबियांनी दान केले. त्यांचे दोन्ही डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात देण्यात आले तर हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंड, छत्रपती संभाजीनगर इथल्या गरजू रुग्णांना देण्यात आले. यासाठी रुग्णालय ते विमानतळ असा ग्रीन कॉरिडॉर तयार करत, हे अवयव रुग्णालयातून विमानतळापर्यंत आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला पोहोचवण्यात आले.
****
परभणी इथं काल प्रधानमंत्री गतिशक्ती एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. नागपूर इथल्या महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजना केंद्राचे वैज्ञानिक डॉ. इंदल के. रामटेके यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. गतिशक्ती योजना ही देशातली मिश्रवहन जोडणी अद्ययावत करण्यासाठीची महत्वाची योजना असून, यामुळे देशातल्या पायाभूत सुविधा क्षेत्राचा विकास करण्यासाठी उपयोग होणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
सर्वसामान्य नागरिकांचं ३०० युनिट पर्यंत वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं निदर्शनं करण्यात आली. महानगरप्रमुख रेणुकादास वैद्य यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांना सादर केलं.
****
No comments:
Post a Comment