Friday, 5 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:05.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 July 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला सुरुवात, राज्यात १५ जिल्ह्यांमधल्या २७ तालुक्यांचा समावेश

·      विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबन काळात कपात

·      दूध उत्पादकांना हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक - केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

आणि

·      टी-ट्वेन्टी विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे मुंबईत भव्य स्वागत, पॅरिस ऑलिम्पिकसाठी रवाना होणाऱ्या क्रीडापटूंना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

****

नीती आयोगाचं संपूर्णता अभियान कालपासून देशभरात सुरू झालं. ३० सप्टेंबर पर्यंत देशातल्या ५०० तालुक्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानामार्फत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार आहे.

राज्यात नांदेड, जालना, हिंगोली, धाराशिव, बीडसह १५ जिल्ह्यांमधल्या २७ तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात संपूर्णता अभियानाला काल सुरुवात झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आकांक्षित तालुक्यात करण्याच्या कामांची यादी वाचून दाखवत सर्व निकष मुदतीपूर्वीच पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. यासाठी हिंगोली तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले...

“ह्या कार्यक्रमामध्ये सहा पॅरामीटर्स नीती आयोगाकडून निश्चित केलेले आहेत, त्याच्यामधलं १०० टक्के काम आम्हाला पूर्ण करायचं आहे. ह्याच्यामध्ये महिलांच्या अनुषंगाने १०० टक्के प्रेगनन्ट लेडीजचं रजिस्ट्रेशन, महिलांच्या साठी असलेला १०० टक्के पोषण आहार, त्याच अनुषंगाने आपल्याकडच्या कृषी विभागाकडच्या असलेल्या कृषी आरोग्य कार्डचं डिस्ट्रीब्युशन आणि आपल्या महिला बचत गटांना १०० टक्के रिव्हॉल्व्हिंग फंड देणे या चार पॅरामीटर्समध्ये १०० टक्के काम करण्यासाठी आम्ही त्याचं नियोजन आणि आराखडा आज समितीमध्ये मंजूर केला. आणि खऱ्या अर्थाने आकांक्षित तालुका ऑगस्ट महिन्याच्या अखेरच आपण ह्याच्यातले जे काही पॅरामीटर्स आहेत, ते १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन आम्ही केलेलं आहे.’’

धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथं संपूर्णता अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांचे हस्ते झाला, यावेळी परंडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात जमीन आरोग्य पत्रिकांचं वाटप करण्यात आलं, तसंच आयुष्यमान भारत अंतर्गत आभा कार्डाच वाटप आणि महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वाटप करण्यात आलं. तालुक्यातल्या प्रत्येक गावात यानिमित्ताने नीति आयोगाने घालून दिलेल्या विविध निर्देशांकाची जनजागृती करण्यासाठी जनजागृती फेरी काढण्यात आली होती.

यवतमाळ जिल्ह्यात झरी-जामणी इथंही काल संपूर्णता अभियानाचं उद्घाटन झालं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित सर्वांनी आकांक्षित तालुक्याला सक्षम आणि समृद्ध करण्याची प्रतिज्ञा घेतली.

****

महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी ७१ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक लाख १० हजार हेक्टरची वाढ झाल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत दिली. आतापर्यंत १०१ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, गेल्यावर्षीच्या तीन जुलैच्या तुलनेत हे प्रमाण २० लाख हेक्टरनं वाढलं असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात कुठेही खतं आणि बियाणांचा तुटवडा नाही, नियोजनापेक्षा अधिक खतं आणि बियाणं उपलब्ध असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

****

राज्यात पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये पाऊस पडून पाणी उपलब्ध होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना, मुख्य सचिव आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. विधानसभा सदस्य राजेश टोपे आणि जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. राज्यातल्या कुठल्याही खेड्यात कुणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असं पवार यांनी आश्वस्त केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतल्या गुंतवणुकदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत असल्याचं, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत सांगितलं. हरिभाऊ बागडे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. गैरव्यवहार करणाऱ्या संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना देण्याबाबत कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली. नारायण कुचे, प्रकाश सोळंके आणि बबनराव लोणीकर यांनीही याबाबत उप प्रश्न विचारले होते.

****

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी केलेलं निलंबन तीन दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेनं काल एकमतानं मंजूर केला. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

दरम्यान, विधानपरिषदेतल्या निवृत्त सदस्यांना काल निरोप देण्यात आला. वरिष्ठ सभागृहाचा नावलौकिक वाढवण्याचं काम या सदस्यांनी केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.

****

राज्य पोलीस दलात ८१ पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली. आमदार रमेश पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. भारतीय तटरक्षक दल, नौदल अशा यंत्रणांमधून निवृत्त झालेल्यांची भरती कंत्राटी तत्त्वावर करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवणाऱ्या निर्णयाला, स्थगितीची मागणी करणारा अर्ज, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं, फेटाळून लावला आहे. या बँकेमध्ये १५० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ५ वर्षे सक्तमजुरी आणि साडे बारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानं ही शिक्षा निलंबित करून केदार यांना जामीन दिला होता.

****

ऊस उत्पादकांप्रमाणे दूध उत्पादकांना हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली आहे. राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल दिल्ली इथं शाह यांची भेट घेवून महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. महायुती सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहितीही विखे पाटील यांनी शाह यांना दिली.

****

धाराशिव इथं काल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची आढावा बैठक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. बँकांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करावी, असं त्यांनी यावेळी सांगितलं. जिल्ह्यात महामंडळाअंतर्गत चार हजार १५३ लाभार्थ्यांचे बँकांनी कर्ज मंजूर करून, ३१८ कोटी रुपये रक्कम वितरित केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचं काल मुंबईत वानखेडे क्रीडा संकुलावर भव्य स्वागत करण्यात आलं. दिल्लीहून मुंबईत दाखल झाल्यावर हा संघ विशेष बसमधून मिरवणुकीने क्रीडासंकुलावर पोहोचला. या संघाचं स्वागत करण्यासाठी क्रिकेटप्रेमींचा अफाट जनसागर मरीनड्राईव्हवर लोटला होता.

दरम्यान, भारतीय संघानं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांनी या संघाचं कौतुक करत, देशाला त्यांचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं.

****

पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंशी देखील काल संवाद साधला. भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करुन देशाचं नाव उंचावतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

****

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातल्या सर्वेश कुशारे याची उंच उडी प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. हरयाणात पंचकुलात झालेल्या चाचणीत सर्वेशने सव्वा दोन मीटर उंच उडी मारत प्रथम क्रमांकासह ऑलिम्पिक पात्रताही पटकावली. भारतीय लष्करी सेवेत असलेला सर्वेश हा अशी किमया करणारा महाराष्ट्रातला पहिलाच खेळाडू ठरला आहे.

****

विंबल्डन टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांब्री आणि त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ओलिवेती यांनी कझाकस्तानच्या जोडीचा सहा - चार, सहा - चार असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी देखील दुसरी फेरी गाठली असून, त्यांचा पुढचा सामना जर्मन जोडीशी होणार आहे.

****

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत राज्य शासनानं 'संवादवारी' हा उपक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती चांगल्या प्रकारे मिळत असल्याच्या प्रतिक्रिया वारकऱ्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल जेजुरी इथं मुक्कामी होती. काल जेजुरीत भंडाऱ्याचं उधळण करत पालखीचं स्वागत करण्यात आला. संत तुकाराम महाराज यांची पालखी काल वरवंड इथं मुक्कामी होती.

पैठणहून निघालेल्या संत श्री एकनाथ महाराजांच्या पालखी आज पाटोदा इथून मार्गस्थ होत आहे. पालखीचा दुसरा रिंगण सोहळा आज पारगाव घुमरे इथं होणार आहे.

शेगाव इथल्या संत गजानन महाराजांची पालखी काल धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली. कळंब शहरात नगरपालिका प्रशासनाने पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.

****

छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाच्या विकासासंदर्भात खासदार संदिपान भुमरे यांनी नागरी हवाई वाहतुक मंत्री राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र लिहिलं आहे. यासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन, विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा, असं भुमरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

No comments:

Post a Comment