Saturday, 6 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:06.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 July 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक काल विधानसभेत सादर

·      तुरीच्या दरातील तफावत दूर करून नव्या दराने खरेदीचं सरकारकडून आश्वासन

·      विश्वविजेत्या क्रिकेट संघाला ११ कोटी रुपये बक्षीस-मुंबईकर क्रिकेटपटूंच्या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं एमआयडीसी स्थापनेबाबतची अधिसूचना जारी

आणि

·      संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यात आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा साजरा

****

स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक काल विधानसभेत मांडण्यात आलं. परीक्षेत अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना ३ ते ५ वर्ष तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची, तर परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेला एक कोटी रुपयांपर्यंत दंड आणि परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. याशिवाय संबंधित संस्थेला पुढची ४ वर्ष कोणतीही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली जाणार नाही. परीक्षा सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या दोषी कर्मचाऱ्यांनाही ३ ते १० वर्ष तुरुंगवास आणि १ कोटी रुपये दंड आकारला जाणार आहे. पेपर फुटीच्या प्रकारांची चौकशी आता पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे.

दरम्यान, वैद्यकीय शिक्षणासासाठीची पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, याबाबत राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून जारी परिपत्रकानुसार ११ ऑगस्टला दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे.

****

बिहार आणि आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते काल विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं पवार यांनी नमूद केलं.

दरम्यान, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत काल ते बोलत होते. मराठवाड्यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची घोषणा गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पात यासंदर्भात काहीही ठोस उल्लेख नसल्याचं, तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या विकासासाठी सरकारकडून काहीही मदत केली गेली नसल्याचं, दानवे यांनी सांगितलं.

****

तुरीच्या दरातील तफावत दूर करून, नव्या दराने तूर खरेदी केली जाईल, असं आश्वासन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. तुरीचे बाजारभाव आणि हमी भावाच्या तफावतीचा मध्यबिंदू काढून तूर खरेदी दर निश्चित करण्याचा विचार केला जाईल, असं सत्तार म्हणाले. सदस्य राजेश राठोड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. चालू हंगामात शासनाच्या १५३ तूर खरेदी केंद्रांवर आतापर्यंत फक्त ४६ शेतकऱ्यांनी साडे पाचशे क्विंटल तूर विक्री केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान यांची तर उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विकास विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

****

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल अर्जांपैकी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने या निवडणुकीसाठी आता मतदान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनं पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक आहे.

****

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान काल विधान भवनातील उपाहारगृहात ‘‘भरडधान्य महोत्सव’’ घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला.

****

विश्वविजेत्या क्रिकेट संघाला ११ कोटी रुपये पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. टी ट्वेंटी क्रिकेट विश्वविजेत्या संघातले कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे तसंच संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला, त्यानंतरच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यापूर्वी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंना सन्मानित केलं.

****

सैन्यदलात अतुलनीय शौर्यासाठी दिले जाणारे कीर्तिचक्र तसंच शौर्यचक्र पुरस्कार काल दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये मरणोत्तर सात कीर्तिचक्र तसंच मरणोत्तर नऊ शौर्यचक्रांचा समावेश आहे. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार स्वीकारले.

****

धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं ३६७ एकरावर नवीन औद्योगिक वसाहत -एमआयडीसी स्थापन करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या एमआयडीसीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांची,विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर १४ जुलैला सोलापूर इथं बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या जगद़्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं काल रोटीघाट पार केला. ही पालखी आज बारामती तालुक्यातल्या उंडवडी गावाकडून मार्गस्थ होईल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज नीरा स्नान सोहळा होणार आहे. त्यानंतर पालखी सातारा जिल्ह्यात लोणंद मुक्कामी पोहोचेल.

संत मुक्ताबाईंच्या पालखीत काल बीड जिल्ह्यात बिंदुसरा नदीकाठी गोविंदपंत कुलकर्णी यांच्या समाधीस्थळी आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा साजरा झाला. मुक्ताबाईंच्या पादुका त्यांचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीपर्यंत वाजत गाजत नेण्यात आल्या. दरम्यान मुक्ताबाईंची पालखी आज पाली इथून मार्गस्थ होईल.

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण काल बीड जिल्ह्यात पाटोद्यातल्या पारगाव घुमरे इथं पार पडलं. शेकडो वारकऱ्यांनी हा रिंगण सोहळा अनुभवला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला कालपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुनर्भरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, ‌त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटी वितरित करण्यात येत असल्याचं स्वामी यांनी सांगितलं.

****

लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील आगावू मालमत्ता कर भरणाऱ्यांना कर सवलत देण्यात आली होती. या योजनेला १५ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी घेतला आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या शिरूर-कासार तालुक्यातल्या रेल्वे मार्गावरील गावांमध्ये उड्डाण पूल उभारण्यात यावेत, यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती त्यांनी पवार यांच्याकडे केली आहे.

****

धनगर आरक्षणासाठी लातूर इथं सुरू असलेल्या आंदोलनाकडे आमदार धीरज देशमुख यांनी काल विधानसभेचं लक्ष वेधलं. शासनानं एक शिष्टमंडळ पाठवून या आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्याची विनंती देशमुख यांनी केली. धीरज देशमुख यांच्या या सूचनेची दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.

****

राज्यात २०२१ आणि २०२२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या काही सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र अद्याप दाखल केलेलं नाही. परभणी जिल्ह्यात संबंधित सदस्यांनी १० जुलैपर्यंत त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र संबंधित तहसील कार्यालयात दाखल करावं, अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल असं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आजपासून येत्या १३ तारखेपर्यंत मराठा आरक्षण संवाद रॅली काढण्यात येणार आहे. आज हिंगोलीतून या रॅलीला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसाठी आज परीक्षा होणार आहे. दुपारी साडेतीन ते पाच या कालावधीत १४ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेत संभाव्य गैरप्रकार रोखण्याच्या अनुषंगाने दक्षता घेण्यात येत आहे.

****

समस्यांचं समाधान म्हणजेच संशोधन असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र लडकत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं, 'स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल' या प्रकल्पाअंतर्गत हर्सुल इथल्या महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते काल संबोधित करत होते.

****

No comments:

Post a Comment