Saturday, 6 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 06.07.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०६ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

मोबाईल सेवा, बाजारातली मागणी आणि आपूर्ती या माध्यमातून संचलित होत असल्याचं, संचार मंत्रालयानं नुकत्याच झालेल्या मोबाईल सेवा शुल्काच्या वाढीबाबत म्हटलं आहे. ग्राहकांच्या हिताचं रक्षण, नवीन प्रौद्योगिकींमध्ये गुंतवणूक यासह वित्तीय व्यवहारातली सुरक्षितता सुनिश्चित करण्याकडे सरकार लक्ष केंद्रीत करत असून, सरकारची धोरणं आणि नियामक आराखड्यांमुळं भारतात मोबाईल ग्राहकांना आकारण्यात येणारं शुल्क सर्वात कमी आहे असंही संचार मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

हाथरस इथं झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी देव प्रकाश मधुकर याला अटक केली आहे. गेल्या मंगळवारी या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यु झाला होता.

****

या वर्षी जगभरात २८५ कोटी टन हून अधिक धान्य उत्पादन होईल असा अंदाज संयुक्त राष्ट्र खाद्य आणि कृषी संघटनेनं व्यक्त केला आहे. आशिया खंडात गव्हाचं उत्पादन चांगलं राहील तर तांदळाचं उत्पादन ५३ कोटी ५० लाख टनपेक्षाही अधिक होईल असा संयुक्त राष्ट्र खाद्य आणि कृषी संघटनेचा अंदाज आहे.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहिणींना रहिवासी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येकी १०० रुपयांची कोणतीही पावती न देता वसुली करून सामान्यांची आर्थिक लूट केल्या प्रकरणी दोषी आढळलेल्या हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा इथला ग्रामसेवक मुकुंद चांदोजी घनसावंत याच्यावर गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवणयात आला आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी आवाज उठवला होता.

****

दूध तसंच कांद्याच्या दरासंदर्भात खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीनं अहमदनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला काल मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो शेतकरी आपल्या जनावरांसह या आंदोलनात सहभागी झाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी यावं अशी मागणी खासदार लंके यांनी लावून धरली असल्यानं आंदोलन सध्या सुरुच आहे.

****

No comments:

Post a Comment