▼

Tuesday, 23 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक 23.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 July 2024

Time 16.45 to 16.55 (18.10 to 18.20)

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जूलै २०२४ सायंकाळी ०४.४५ (०६.१०)

****

·      चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर

·      तीन लाखापर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त-स्टॅण्डर्ड डिडक्शन पन्नास हजारावरून ७५ हजार रुपये

·      कर्करोगाची औषधं, मोबाईल, इलेक्ट्रीक वाहनं, तसंच मौल्यवान धातूंच्या सीमा शुल्कात कपात

·      महाराष्ट्रासाठी विविध विभागांतर्गत सुमारे सात हजार ५४५ कोटी रुपयांची तरतूद

आणि

·      महिला आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारत- नेपाळ सामना

****

आयकर दात्यांना दिलासा, उद्योग क्षेत्राला चालना, धार्मिक पर्यटनाचा विकास, आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारा चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. उत्पादकता, रोजगार, सामाजिक न्याय, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा आदी नऊ प्राधान्यक्रमांवर हा अर्थसंकल्प आधारलेला आहे.

 

या अर्थसंकल्पात आयकर रचनेत बदल प्रस्तावित असून, वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं असून, स्टॅंडर्ड डीडक्शनची मर्यादा वाढवण्यात आली असून, पगारदारांसाठी ही मर्यादा ७५ हजार रुपये तर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी २५ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे पगारदारांच्या आयकरात साडे सतरा हजार रुपये बचत होणार असून, सरासरी सुमारे चार कोटी पगारदारांना याचा लाभ होणार आहे.

वार्षिक सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के, सात लाख ते १० लाख रुपयांपर्यंत १० टक्के, १० लाख ते १२ लाख रुपयांपर्यंत १५ टक्के, १२ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत २० टक्के तर १५ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर ३० टक्के आयकर आकारला जाणार आहे. नव्या कर विवरण पद्धतीने करमूल्यांकनासाठी या तरतुदी लागू असणार आहेत.

****

विदेशी कंपन्यांसाठी कार्पोरेट कर ४० टक्क्यांवरून ३५ टक्के, ई कॉमर्स कंपन्यांसाठी स्रोतावर कर कपात - टीडीएसचा दर एक टक्क्यावरून शून्य पूर्णांक एक टक्का करण्याची तसंच स्टार्टअप्सनास प्रोत्साहन देण्यासाठी एंजल कर रद्द करण्याची तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.

****

या अर्थसंकल्पात, कर्करोगावरची औषधं तसंच वैद्यकीय उपकरणांवरचं सीमा शुल्क माफ करण्यात आलं असून, मोबाईल फोन, इलेक्ट्रीक वाहनं, चामड्याच्या वस्तू, अणु उर्जेसाठी लागणारी उपकरणं, प्लॅटिनम, सोने, चांदी, तांबे तसंच इतर २५ धातूंवरच्या सीमा शुल्कात कपात प्रस्तावित करण्यात आली आहे. तर प्लास्टिक तसंच टेलिफोन उपकरणांवरच्या सीमाशुल्कात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

****

पीएम आवास योजनेअंतर्गत तीन कोटी अतिरिक्त घरं बांधली जाणार असून, शहरी भागात गरीबांच्या घरांसाठी दहा लाख कोटी रुपये तर महिला आणि बालिका विकासासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी पंतप्रधान पाच योजनांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांना कामावर घेण्यास मदत करण्यासाठी नियोक्त्यांना एक महिन्याचा पगार अनुदान म्हणून दिला जाईल. या योजनेसाठी पात्रता मर्यादा १ लाख रुपये मासिक वेतन असेल. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा असेल.

 

या योजनांमुळे पाच वर्षांत चार कोटी १० लाख युवकांना रोजगार मिळणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. युवकांसाठी इंटर्नशीप आंतरवासिता योजना सीतारामन यांनी जाहीर केली, यामध्ये पुढच्या पाच वर्षात पाचशे कंपन्यामध्ये युवकांना १२ महिने इंटर्नशीपचा अनुभव मिळणार आहे, यासाठी दरमहा पाच हजार रुपये विद्यावेतन आणि कार्यकाळ पूर्ण झाल्यावर सहा हजार रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे. मुद्रा योजनेत कर्ज मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार असून, अधिक उत्पादन देणारी ३२ विविध वाणं तसंच बागायती पिकांसाठी शंभरावर नवी वाणं उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक लाख ५२ हजार कोटी रुपये, ग्रामीण विकास दोन लाख ६६ हजार कोटी रुपये, तर शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी एक लाख ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी बिहार राज्यात गया इथं विष्णूपद मंदिर, तसंच महाबोधी मंदिराचा काशी विश्वनाथ कॉरीडॉरच्या धर्तीवर तर ओडिशातल्या मंदिरांचा तसंच पर्यटन स्थळांचा जागतिक पातळीवर विकास करण्यात येणार आहे. नालंदा हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.

बिहार राज्यात रस्ते बांधणीसाठी २६ हजार कोटी तर आंध्रप्रदेशात राजधानी अमरावतीसह विविध प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

 

प्रधानमंत्री जनजाती उन्नत अभियानाची घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली, या माध्यमातून ६३ हजार गावांतल्या पाच कोटी आदिवासी बांधवांना लाभ होणार आहे.

 

 

 

सीतारमन यांनी लोकसभेत वित्त विधेयक सादर केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. वित्तमंत्र्यांनी राज्यसभेतही वित्त विधेयक सादर केलं, त्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.

****

दरम्यान, या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी सुमारे सात हजार ५४५ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामध्ये विदर्भ तसंच मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ६०० कोटी, ग्रामीण रस्ते सुधार ४०० कोटी, कृषी प्रकल्पांसाठी ५९८ कोटी, उद्योग ४६६ कोटी, आदी तरतुदींचा समावेश असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.

****

आज सादर झालेला अर्थसंकल्प समाजाच्या सर्व घटकांना सशक्त करणारा अर्थसंकल्प असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, आणि या गतीत सातत्य राहील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, हा अर्थसंकल्प ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा असल्याचं सांगत, कररचनेततल्या मोठ्या बदलांमुळे सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधानांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरवल्याची भावना व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी, हा अर्थसंकल्प दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, आणि अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा लोककल्याणकारी अर्थसंकल्प असल्याचं नमूद केलं.

****

विरोधी पक्षांनी मात्र अर्थसंकल्पावर टीका केली आहे. देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या हातावर केंद्र सरकारने तुरी दिल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अवघ्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी महाराष्ट्राला देशाचा पॉवर हाऊस म्हणून संबोधलं होतं, मात्र त्यांचं प्रेम हे बेगडी असल्याचं, या अर्थसंकल्पावरून दिसून आल्याचं मत, दानवे यांनी व्यक्त केलं.

विधान सभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राला सापत्न वागणुक दिल्याची टीका करत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने केंद्र सरकारला पाठिंबा दिल्यामुळेच या दोन्ही राज्यांना भरभरून देण्यात आल्याचा आरोप केला.

प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी, धोरण आणि दृष्टी नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया नोंदवली.

****

मतदान केंद्र सुसूत्रीकरण आणि नवीन मतदान केंद्र तयार करताना मतदारांच्या मतदान केंद्रात बदल करण्यात येऊ नये, अशी मागणी, भारतीय जनता पक्षातर्फे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात निवेदन दिल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मतदान केंद्राच्या ठिकाणीच वाढीव मतदान केंद्र त्याच इमारतीत मंजूर करावे अशी मागणीही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

आकाशवाणी आज आपला सत्त्याण्णवावा वर्धापन दिन साजरा करत आहे. १९२७ साली आजच्या दिवशी आकाशवाणीचं पहिलं केंद्र मुंबई इथं सुरू झालं. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी नावानं सुरू झालेलं हे केंद्र १९५७ नंतर आकाशवाणी या नावानं प्रसिद्ध झालं.

****

महिला आशिया चषक टी - ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंकेतल्या दांबुला इथं भारताचा सामना नेपाळसोबत होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर आहे.

****

बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन मोहिमे अंतर्गत पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. बालविवाहाविषयी माहिती देण्यासाठी दहा-नऊ-आठ या चाईल्ड मदतवाहिनीवर संपर्क करावा अशी माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.

****

 

सुधारित फौजदारी कायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी धाराशिव इथं मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनाला आज प्रारंभ झाला. धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जोशी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. हे प्रदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीत दोन दिवस चालणार आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहयोगी प्राध्यापकांसह विविध पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती येत्या २९ जुलैला नवी मुंबई इथं घेण्यात येणार आहेत. मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असं आयोगानं कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment