Wednesday, 24 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.07.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 24 July 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २४ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

नीट-यूजी परीक्षेच्या मुद्यावर विरोधी पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप, भारतीय जनता पक्षाने केला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन, या मुद्याकडे लक्ष वेधलं. नीट यूजीच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेशी कोणतीही तडजोड झालेली नाही, यावर काल सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याचं प्रसाद यांनी नमूद केलं. काल सादर झालेला अर्थसंकल्प, हा समाजाच्या प्रत्येक घटकासाठीचा अर्थसंकल्प असल्याचं प्रसाद यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर टीका करण्यापूर्वी, तो वाचून समजून घेण्याची गरज प्रसाद यांनी व्यक्त केली.

****

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे दोन लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली, आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात बोलतांना, वैष्णव यांनी, महाराष्ट्रातल्या विविध रेल्वेप्रकल्पांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याचं सांगितलं.

****

या अर्थसंकल्पात कर्करोगाच्या तीन औषधांवरचं सीमा शुल्क माफ करण्यात आलं. यामध्ये स्तनाच्या, फुफ्फुसाच्या आणि पित्तनलिकेच्या कर्करोगावरच्या औषधांचा समावेश आहे. या निर्णयाचा देशातल्या सत्तावीस लाख कर्करुग्णांना फायदा होईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पात निधी वाटपामध्ये भेदभाव झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. आज सकाळी संसदेचं सत्र सुरू होण्यापूर्वी संसदेच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात निदर्शनं केली. विरोधी पक्षांची सरकारं असलेल्या राज्यांवर अन्याय झाल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकाजुर्न खरगे यांनी केला आहे, सदनात आणि सदनाबाहेरही सरकारच्या या धोरणाचा विरोध करणार असल्याची भूमिका खरगे यांनी व्यक्त केली.

****

न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेबाबतच्या नियमांमध्ये सर्वोच्च न्यायालयानं सुधारणा केली आहे. आता न्यायालयांच्या कामकाजाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच अशी असेल. याशिवाय दुसऱ्या तसंच चौथ्या शनिवारी आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशी न्यायालयाची कार्यालयं बंद राहतील, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या याबाबतच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. हा नवीन बदल येत्या एक ऑगस्ट पासून लागू होणार आहे.

****

प्रलंबित खटले निकाली काढण्याच्या तसंच मध्यस्थातर्फे खटले सामोपचारानं मिटवण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल उचलत सर्वोच्च न्यायालयानं येत्या एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान विशेष लोक अदालतीचं आयोजन केलं आहे. ज्या लोकांचे खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी केलं आहे.

****

२०२२ या वर्षासाठीचा राष्ट्रीय हिंदी सेवा सन्मान, हा पुरस्कार ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक दामोदर खडसे यांना जाहीर झाला आहे. हिंदी भाषिक नसणाऱ्या लेखकांनी हिंदी भाषेतल्या साहित्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.

****

यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा तालुक्यात मांडवी ते पाटणबोरी या मार्गावर असलेला पूल पाण्याखाली आला आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. या पुरामुळे मांडवी, पिवरडोल, गवारा आणि माथार्जुन गावांमध्ये देखील पाणी साचलं आहे.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या पाच दिवसांपासून अंतरवाली सराटी इथे त्यांचं उपोषण सुरू आहे. सलाईन लावून उपोषण करण्यापेक्षा, सरकारला जी सत्ता महत्त्वाची वाटते ती मिळवण्याच्या प्रयत्नाला लागू, असा गर्भित इशारा जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

****

राज्यात एकविसाव्या पशुगणनेला येत्या एक सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. देशात दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. २०१९ मध्ये प्रथमच पशुंच्या प्रजाती तसंच ग्रामीण आणि नागरी विभाग, अशा पद्धतीनं पशुंची गणना करण्यात आली, त्यानुसार राज्यात तीन कोटी तीस लाख ऐंशी हजार इतकं पशुधन आहे.

****

पावसाळ्यातल्या जलजन्य आजारांना प्रतिबंधासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

****

हवामान विभागानं आज रायगड आणि सातारा जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड ॲलर्ट जारी केला आहे. याशिवाय पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज ॲलर्टही जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment