Wednesday, 24 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.07.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२४ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

सर्वोच्च न्यायालयानं न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भातल्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. नवीन नियमानुसार न्यायालयाचं कामकाज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालेल. सुटीचे दिवस तसंच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी न्यायालयाचं कामकाज बंद राहील, असं यासंदर्भात जारी अधिसूचनेत म्हटलं आहे. हे नवीन नियम एक ऑगस्ट पासून लागू होतील.

****

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे दोन लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली असून, त्यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.

****

राष्ट्रीय जलजीवन अभियानाअंतर्गत देशात ग्रामीण भागात १५ कोटी घरांमध्ये नळानं पिण्याचं पाणी पोहोचलं आहे. या अभियानानं एक ऐतिहासिक टप्पा गाठला असल्याचं, जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आठ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये शंभर टक्के काम पूर्ण झालं आहे.

****

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १२३ टक्के पाऊस झाला असून, पेरण्याही समाधानकारक झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाने काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली. उसाचं क्षेत्र वगळता राज्यात आतापर्यंत खरीपाच्या १२८ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याचं कृषी विभागानं नमूद केलं आहे.

****

प्लास्टिकमुक्त शाळा हा उपक्रम नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या महानगरपालिकेच्या आणि खाजगी शाळांमध्ये राबवण्यात आला. ८८ शाळांमधल्या पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमांत उत्साही सहभाग घेत, प्लास्टिक बाटल्यांच्या स्वरुपात बाराशे किलो प्लास्टिक जमा केलं.

****

नांदेड जिल्ह्यात भोकर ते म्हैसा रस्त्यावर पिंपळढव जवळ दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत तीन जण ठार तर दोघे जखमी झाले. काल संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

****

पावसाळ्यातल्या जलजन्य आजारांना प्रतिबंधासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

****s

No comments:

Post a Comment