Sunday, 4 August 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०४ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 04 August 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पश्चिम घाट परिसरसंवेदनशील क्षेत्रम्हणून घोषित करणारी मसुदा अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी

·      अन्य राज्यातल्या आयुर्वेदिक पदवीधरांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      राष्ट्रीय अवयवदान दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा

·      पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा उपान्त्य फेरीचा सामना

आणि 

·      नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीसाठी आत्तापर्यंत पाच हजार दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग

****

पश्चिम घाट क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या महाराष्ट्रासह सहा राज्यांमधल्या ५६ हजार ८०० चौरस किलोमीटर पेक्षा जास्त परिसराला, ‘पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रम्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन मसुदा अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या सहा राज्यांचा यात समावेश आहे. या संदर्भात सरकारनं जनतेकडून येत्या साठ दिवसांमध्ये सूचना आणि हरकती मागवल्या असून, नागरिक esz-mef@nic.in या संकेतस्थळावर त्याची नोंद करू शकतात. सहा राज्यातला हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यानंतर या भागात उत्खनन, खाणकाम आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, आदी कामांवर बंधनं येतील, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

****

अन्य राज्यातून बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन बी एम एस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. काल मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खाजगी अनुदानित ८५ टक्के तसंच खाजगी विना अनुदानित ७०टक्के कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे.

****

राज्यातल्या सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसह १६३ शासकीय तंत्र विद्यालयातल्या संविधान मंदिरांचं, येत्या १५ ऑगस्टला एकत्रित दूरदृश्य पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य कौशल्य विद्यापीठ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याठिकाणी विद्यार्थ्यांना घटनात्मक अधिकार समजण्यासाठी कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. २६ जूनला संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता.

****

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग आणि आयुष संचालनालय यांच्यावतीनं काल राष्ट्रीय अवयवदान दिन पाळण्यात आला. मुंबईत विधानसभा अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय - घाटीच्या वतीनं गेल्या जवळपास महिनाभर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वक्तृत्व, भित्तीपत्रक, रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. काल जनजागृती फेरीने या उपक्रमांचा समारोप झाला. जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार, घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांच्या उपस्थितीत निघालेली ही जनजागृती फेरी शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, पुन्हा घाटी रुग्णालयात विसर्जित झाली. अवयवदानाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली.

 

धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबसे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमानंतर अवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी पथनाट्य, काव्यवाचन, घोषणा, वक्तृत्व, रांगोळी यासारख्या उपक्रमांमधून अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली, तसंच सर्वांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.

****

नांदेड इथं डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वतीने काल सकाळी जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी झाले.

****

 

पत्री सरकारचे जनक, महान स्वातंत्र्यसेनानी आणि बीडचे माजी खासदार क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे इथल्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

****

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना  डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसन सोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता हा सामना सुरु होईल. भारतीय हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत आज ब्रिटनसोबत लढत होणार आहे.

दरम्यान, काल या स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हिला २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकाराच्या अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. मनूने या स्पर्धेत आतापर्यंत दोन कांस्यपदकं मिळवली आहेत. भारताच्या दीपिका कुमारीला तिरंदाजीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तर नेमबाजीतही महिला एकेरीत भजन कौरचा पराभव झाला.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज होत आहे. कोलंबो इथं दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत परवाचा पहिला सामना अनिर्णित राहिला होता.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नियोजन करतांना शिक्षण आणि आरोग्य या घटकांना प्राधान्य देऊन सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गेल्या वर्षाचा आर्थिक अहवाल सादर करण्यात आला, तसंच २०२४-२५ या वर्षासाठी ७७३ कोटी ९० लाख रुपयांच्या खर्चाला मंजूरीही देण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या ६७२ कोटी ११ लक्ष ३७ हजार रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली.

दरम्यान, सिल्लोड, सोयगाव तालुक्यातल्या जलसंधारण प्रकल्पांचा पालकमंत्री सत्तार यांनी काल आढावा घेतला. घाटनांद्रा बंधाऱ्यावरील प्रकल्पाची पुनर्रचना आणि बांधणी करण्यासाठी प्रकल्पाचा आराखडा तयार करून तात्काळ मंजुरी घ्यावी आणि जलसंधारणाचं काम पूर्ण करावे, असे निर्देश सत्तार यांनी यावेळी जलसंपदा विभागाला दिले.

****

परभणी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत चालू आर्थिक वर्षांत नागरिकांना विविध योजनासांठी ३४५ कोटी रुपयांच्या विकास कामांना पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील स्थानिक गरजा लक्षात घेत, लोकप्रतिनधींशी समन्वय साधून विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना बनसोडे यांनी दिल्या.

****

लातूर पोलीस दलाच्या दामिनी पथकातर्फे तयार करण्यात आलेल्या 'इंस्पेक्टर दामिनी' या चित्रमय पुस्तकाचं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकात छोट्या गोष्टी आणि चित्रांच्या माध्यमातून दामिनी पथक आणि ११२ या मदत क्रमांकाच्या सेवेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

****

राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा १५ ऑगस्टपासून जुन्या जालन्यातील गांधी चमन इथं आमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिला आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं समितीची राज्यव्यापी बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविड संसर्ग झालेले नवे पाच रुग्ण आढळले. यामध्ये एक पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. सध्या शहरात कोविडचे १६ सक्रीय रुग्ण आहेत, वयोवृद्ध नागरिकांनी तसंच रक्तदाब-मधुमेहाचा इतिहास असणाऱ्या रुग्णांची काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, असं आवाहन करण्यात आला आहे.

****

नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीसाठी आत्तापर्यंत पाच हजार दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या नांदूर-मधमेश्वर,दारणा धरणांमधून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण ७५ टक्के भरलं आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात रात्री पावसाच्या तुरळक सरी बरसल्या मात्र, रात्री उशिरा हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.

दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवसांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबई, ठाणे, कोकण, आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment