Sunday, 25 August 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 25 August 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव इथं लखपती दिदींसोबत संवाद साधत आहेत. लखपती दीदींचा हा राज्यातला पहिला ऐतिहासिक मेळावा असून ३४ राज्यांमधल्या जवळजवळ ३० हजार ठिकाणांहून या कार्यक्रमात लखपती दीदी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित आहेत.

यावेळी देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान राज्यातल्या स्वयंसहाय्यता गटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी, तसंच पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज जारी करतील. दरम्यान, पंतप्रधानांचं आज सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झालं. यावेळी प्रशासनाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं.

                                   ****
अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देशातील युवावर्गाला मोठा फायदा झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. हा या कार्यक्रम मालिकेचा एकशे तेरावा भाग होता.

चांद्रयान-३ मोहिमेद्वारे दक्षिण ध्रुवावर झेंडा रोवणारा भारत पहिला देश असल्याचं सांगत पंतप्रधानांनी या दिनाचं महत्व विशद केलं. चंद्रयान-तीन च्या यशानिमित्त यंदा २३ ऑगस्टला देशवासीयांनी पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला. या दिनानिमित्त त्यांनी 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित नवोद्योग क्षेत्रातील तरुणांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी मन की बातमध्ये राजकारणातील घराणेशाहीबद्दल तरुणांचं मत, हर घर तिरंगा अभियान, स्वातंत्र्यदिनी जम्मू काश्मीरमध्ये आयोजित तिरंगा रॅली, श्रीनगरच्या दल सरोवरातील तिरंगा यात्रा आणि भावा-बहिणींच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सणाचा देखील उल्लेख केला.

देशात अनेक स्टार्टअप पर्यावरणाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगत सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर पर्यावरण रक्षणासह देशही पुढे जाईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. देशविदेशात संस्कृत भाषेविषयी विशेष रुची असल्याचं सांगत अनेक देशांमध्ये संस्कृत भाषेशी संबंधित संशोधन आणि प्रयोग होत असल्यांचही ते म्हणाले. 
मन कि बातद्वारे पंतप्रधान मोदी यांनी पोषण आहाराचं महत्व सांगितलं. गेल्या वर्षी पोषण अभियानाला नव्या शिक्षण धोरणाशी जोडलं गेलं. पोषण आणि शिक्षण सुद्धा या अभियानाअंतर्गत मुलांच्या संतुलित विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचं सांगत छोट्या प्रयत्नांनीही कुपोषणाच्या विरोधातील या लढाईला खूप मोठं बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पावसाळ्याच्या दिवसांत काळजी घेण्यारोबरच वर्षा जलसंचयन मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि एक पेड मा के नाम या अभियानाद्वारे जास्तीत जास्त झाडं लावावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ जुलै नंतर आलेल्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून पात्र महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. अर्जांची प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू असून प्रशासकीय मान्यतेनंतर पात्र महिलांची माहिती विभागाकडं येते. त्यानंतर ही यादी बँकेकडे पाठवली जाते असं त्या म्हणाल्या.

आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. ' राज्यात योजनेला  उत्तम प्रतिसाद मिळत असून बँक खात्याला आधारकार्ड क्रमांक लिंक करून घेत जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन तटकरे यांनी केलं आहे.

****

 

नागपूर- अमरावती महामार्गावर नांदगावपेठ जवळ राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या शिवशाही बसला झालेल्या अपघातात दोन प्रवासी ठार तर २४ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. नागपूरहून अकोल्याला जाणाऱ्या बससमोर अचानक आडव्या आलेल्या गायीला वाचवताना नियंत्रण सुटल्यानं ही बस उलटून हा अपघात झाला.

****

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची काल मुंबईत बैठक झाली. मात्र, या बैठकीत झालेल्या चर्चेनंतरही कोणत्या पक्षाला किती जागा यासंदर्भात निश्चित काहीही ठरलं नसल्याचं वृत्त आहे. 
                                 ****

मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरसह जालना या दोन जिल्ह्यांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुण्यासह  सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

****

भारताची बॅडमिंटनपटू तन्वी पत्री हिनं, चीनमध्ये सुरु असलेल्या अशियाई कनिष्ट गट विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेच्या १५ वर्षांखालील महिला एकेरी गटाचा किताब पटकावला आहे. चीनच्या चेंगडू इथं आज झालेल्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हएतनामच्या गुयेन थी थू ह्यूजेन या खेळाडूला पराभूत करत हे यश मिळवलं. तर, या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात ज्ञान दत्तू टीटी यानं कांस्य पदक प्राप्त केलं आहे.

****

No comments:

Post a Comment