Friday, 2 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.08.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 August 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      रक्षाबंधनापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार-सिल्लोड इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

आणि

·      पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकारात मनू भाकर अंतिम फेरीत दाखल

****

रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज सिल्लोड इथं या योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पणनमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विरोधकांनी या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे आणण्याचे प्रयत्न केले तरी, न्यायालय माझ्या बहिणींना न्याय देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला, ते म्हणाले –

ही योजना आम्ही निवडणुकीसाठी आणलेली नाही. माझ्या बहिणींना आधार देण्यासाठी आणलेली आहे. आणि म्हणून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार हा तुमच्य या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे. विरोधकांच्या पोटात दुखतंय. त्यांचा पराभव दिसू लागलाय. म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी. पण मला विश्वास आहे, माझ्‍या लाडक्‍या बहिणींवर कोर्ट, न्यायालय देखील अन्याय करणार नाही. तो देखील न्याय देईल.

 

ही योजना कायम सुरू राहणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मराठवाड्याचा दुष्काळ निवारणासाठी नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव तसंच वॉटरग्रीड प्रकल्पाचं पुनरुज्जीवन, विविध उद्योगांची उभारणी, आदी विषयांवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.

या कार्यक्रमापूर्वी सिल्लोड शहरातून मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्यात आली. हजारो नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले. अनेक महिलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना ओवाळून राख्या बांधल्या.

****

या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचं छत्रपती संभाजीनगर इथं विमानतळावर आगमन झाल्यावर, पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं.

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी, आदर्श नागरी पतसंस्थेच्या शिष्टमंडळासोबत चिकलठाणा विमानतळ इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, तसंच ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.

****

मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं आज नियोजित पोलिस भरती रद्द करण्यात आली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या उमेदवारांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला, तेव्हाच संबंधितांनी भरती रद्द केल्याची सूचना उमेदवारांना द्यायला हवी होती, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मराठी भाषेत केलेले अर्ज स्वीकारले जातील, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत भरावे लागतील, यासंदर्भात कोणत्याही अपप्रचाराला अर्जदारांनी बळी पडू नये, असं सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेतून भरण्याची करण्याची आवश्यकता नसल्याचंही तटकरे यांनी यावेळी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यांत आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वयंरोजगार मेळावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्याचे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर हे अध्यक्षस्थानी होते. या मेळाव्यातून बीड मतदारसंघात शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं प्रतिपादन क्षीरसागर यांनी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. शहरांच्या नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार देत नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे, असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेत सविस्तर आदेश दिले आहेत, त्यात आपण हस्तक्षेप करणार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

दरम्यान, या प्रकरणी याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी अजून हे प्रकरण न्यायालयात असल्याने याबद्दल भाष्य करण्यास नकार दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यात जूनमध्ये सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला असला तरी त्या तुलनेत पेरण्या केवळ ५६ टक्के झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. राज्यभरात सर्वाधिक १३६ मिलिमीटर इतका पाऊस छत्रपती संभाजीनगर विभागात झाला असून त्या खालोखाल नाशिक विभागात ११४, तर अमरावती विभागात ११० मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वांत कमी ७० टक्के पाऊस हा नागपूर विभागात झाला आहे.

****

लोकसभेत आज अर्थसंकल्पातल्या आरोग्य सुविधांच्या अनुदान मागण्यांवर चर्चा झाली, यामध्ये नंदूरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी आदिवासी भागातल्या सिकल सेल आजाराचा मुद्दा उपस्थित केला. या आजाराच्या निर्मुलनासाठी अद्ययावत संशोधन केंद्रं तसंच रुग्णालयं उभारण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्याची मागणी पाडवी यांनी केली. कोरोना काळात आशा स्वयंसेवकांनी केलेल्या कामाकडे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी लक्ष वेधत, त्यांचं मानधन वाढवण्याची मागणी केली.

****

जागतिक कृषी मंच अर्थात वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचं या वर्षासाठीचं दुसरं जागतिक कृषी पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर झालं आहे. मंचाच्या अध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. या पुरस्कारासाठी राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँण्टिनिओ गुटेरस यांनी शाश्वत विकास, हवामान बदलाशी लढा आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, तातडीनं पावलं उचलण्याचं आवाहन केलं होतं. महाराष्ट्र सरकारनं या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर या पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे.

****

पॅरीस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकाराच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. पात्रता फेरीत तिने ५९० गुण मिळवत दुसरं स्थान गाठलं आहे. मनूने या स्पर्धेत आतापर्यंत दोन कांस्यपदकं मिळवली आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.

तिरंदाजीत रिकर्व्ह सांघिक स्पर्धेच्या मिश्र प्रकारात उपांत्यपूर्व फेरीसाठी अंकिता भकट आणि धीरज बोम्मादेवरा पात्र ठरले आहेत. बॅडमिंटनमध्ये आज लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीतील लढत होणार आहे. नौकानयनात पुरुष गटात विष्णू सरवानन तर महिला गटात नेत्रा कुमारन यांची स्पर्धा आज होणार आहे.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आज कोलंबो इथं नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ५० षटकांत आठ बाद २२९ धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा दुनिथ वेल्लालगे ५० धावा काढून खेळत होता. भारताकडून अक्षर पटेलनं सर्वाधिक दोन बळी घेतले आहेत.

****

५५ व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. निर्मात्यांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज १६ ऑगस्ट पर्यंत महामंडळाच्या जनसंपर्क विभागात जमा करण्याचं आवाहन  महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केलं आहे.

****

शेती विकास योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल ॲपमध्ये पिकांची अचूक नोंद करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा  प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. तसंच विविध शासकीय सुविधांसाठी ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲपदेखील सुरु करण्यात आले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प एक ऑगस्ट पासून राज्यभर राबविण्यात येत असल्यानं सर्व शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

****

लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ हिंगोली इथं आज भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने महा स्वच्छता अभियान शहरात १ ऑगस्ट पासून राबवले जात आहे. एक तास शहराच्या स्वच्छतेसाठी ही या अभियानाची संकल्पना आहे. आज शहरातील सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेत या अभियाना अंतर्गत परिसर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थांचा सहभाग लक्षणीय होता.

****

अंबाजोगाई तालुक्यातील साकुड इथले रावसाहेब रामचंद्र चाटे यांचा स्वाईन फ्ल्यूची लागण होऊन मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीदरम्यान, १७ जुलैला त्यांचा मृत्यू झाला होता, त्यांना स्वाईन फ्ल्यूची लक्षणं दिसत असल्याने डॉक्टरांनी त्यांचा स्वॅब छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोग शाळेला तपासणी साठी पाठवला होता, त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यांना स्वाईन फ्ल्युची लागण झाली होती, असं या अहवालात म्हटलं आहे.

****

No comments:

Post a Comment