Saturday, 3 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:03.08.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 August 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      रक्षाबंधनापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार-सिल्लोड इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

·      जानेवारी ते मे दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी ५९६ कोटी रुपये मदत मंजूर

·      पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकारात नेमबाज मनू भाकर अंतिम फेरीत, तर बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत लक्ष्य सेनची उपांत्य फेरीत धडक

आणि

·      भारत श्रीलंका एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना अनिर्णित

****

रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काल सिल्लोड इथं या योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचं प्रातिनिधिक स्वरुपात वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. दिव्या रामदास सपकाळ या महिलेचा अर्ज स्वतः मुख्यमंत्र्यांनी भरला आणि त्यावर तिची स्वाक्षरी घेऊन तो अर्ज त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पुढील प्रक्रियेसाठी सुपूर्द केला. पणनमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विरोधकांनी या योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे आणण्याचे प्रयत्न केले तरी, न्यायालय माझ्या बहिणींना न्याय देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला, ते म्हणाले...

“ही योजना आम्ही निवडणुकीसाठी आणलेली नाही. माझ्या बहिणींना आधार देण्यासाठी आणलेली आहे. आणि म्हणून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार हा या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे. विरोधकांच्या पोटात दुखतंय. त्यांचा पराभव दिसू लागलाय. म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी. पण मला विश्वास आहे, माझ्‍या लाडक्‍या बहिणींवर कोर्ट, न्यायालय देखील अन्याय करणार नाही. तो देखील न्याय देईल.’’

राज्यातल्या महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणं हे सरकारचं ध्येय्य असून, ही योजना म्हणजे सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर असल्याची भावना व्यक्त करत, ही योजना कायम सुरू राहणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्री युवा अप्रेंटिंसशीप योजना, मराठवाड्याचा दुष्काळ निवारणासाठी नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव तसंच वॉटरग्रीड प्रकल्पाचं पुनरुज्जीवन, विविध उद्योगांची उभारणी, आदी विषयांवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.

या कार्यक्रमापूर्वी सिल्लोड शहरातून मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्यात आली. अनेक महिलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना ओवाळून राख्या बांधल्या.

**

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी, आदर्श नागरी पतसंस्थेच्या शिष्टमंडळासोबत विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, तसंच ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. सोमवारपासून या ठेवीदारांना पैसे परत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीणयोजनेसाठी मराठी भाषेत केलेले अर्ज स्वीकारले जातील, पुन्हा इंग्रजीतून अर्ज करण्याची गरज नाही, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात कोणत्याही अपप्रचाराला अर्जदारांनी बळी पडू नये, असं आवाहन तटकरे यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या नामांतराच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. शहरांच्या नामांतराचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे, तसंच या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेत सविस्तर आदेश दिले असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं.

दरम्यान, या प्रकरणी याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी अजून हे प्रकरण न्यायालयात असल्याने याबद्दल भाष्य करण्यास नकार दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यातील विविध भागात जानेवारी ते मे या कालावधीतील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना ५९६ कोटी २१ लाख ९५ हजार रुपयांचा मदतनिधी वितरीत करण्यास राज्य सरकारनं मंजूरी दिली आहे. नुकसान भरपाईची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे.

****

पॅरीस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकाराच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. पात्रता फेरीत तिने ५९० गुण मिळवत दुसरं स्थान गाठलं आहे. मनूने या स्पर्धेत आतापर्यंत दोन कांस्यपदकं मिळवली आहेत.

बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत काल लक्ष्य सेनने चीनी तैपेईच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. पहिला गेम १९-२१ असा गमावल्यावर लक्ष्यने जोरदार खेळ करत पुढचे दोन्ही गेम्स २१-१५, २१-१२ असे जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली.

ऑलिम्पिक स्पर्धेत अशी कामगिरी करणारे हे दोघेही पहिलेच भारतीय खेळाडू ठरले आहेत.

हॉकीत काल भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा तीन दोनने पराभव केला. कर्णधार हरमनप्रीतसिंहने दोन तर अभिषेकने एक गोल केला.

आज या स्पर्धेत नेमबाजी, तीरंदाजी, गोल्फ, नौकानयन, आदी प्रकारात भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिला सामना काल अनिर्णित राहिला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत आठ बाद २३० धावा केल्या. भारतीय संघही ४८ व्या षटकांत २३० धावांवर सर्वबाद झाला. मालिकेत पुढचा सामना उद्या होणार आहे.

****

५५ व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. निर्मात्यांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज १६ ऑगस्ट पर्यंत चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात काल दोन दुचाकीस्वारांचा कालव्यात पडून मृत्यू झाला. आखाडा बाळापूर इथं घडलेल्या या घटनेत दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्याने ती कालव्याच्या कठड्यावर आदळून त्यावरील दोघे कालव्यात पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात स्तनपान सप्ताहाला परवापासून प्रारंभ झाला. स्त्री रुग्णालयामधील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण तसंच रुग्णांचे नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

****

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४७ हजार ८४६ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रत्येक गावात आणि शहरी भागात अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आल्यानं महिलांना या योजनेसाठी अर्ज करणं अधिक सुलभ झालं आहे.

****

शेती विकास योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल ॲपमध्ये पिकांची अचूक नोंद करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सर्व शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

****

बीड काल स्वयंरोजगार मेळावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्याचे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. या मेळाव्यातून बीड मतदारसंघात शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचं, क्षीरसागर यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने काल शहरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या परिसरात या अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थांचा लक्षणीय सहभाग होता.

****

लातूर महानगरपालिकेनं मालमत्ता करात ऑगस्ट महिन्यासाठी ५% सुट योजना लागू केली आहे. संबंधित सर्व मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन कराचा भरणा करावा, असं आवाहन महापालिकेच्यावतीनं करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविड संसर्ग झालेले नवे पाच रुग्ण आढळले. सध्या शहरात कोविडचे १३ सक्रीय रुग्ण आहेत, यापैकी केवळ एका रुग्णाला गृहविलगीकरणात ठेवलं आहे.

****

अंबाजोगाई तालुक्यातील साकुड इथले रावसाहेब रामचंद्र चाटे यांचा, स्वाईन फ्ल्यूची लागण होऊन मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीदरम्यान, १७ जुलैला त्यांचा मृत्यू झाला होता,

****

No comments:

Post a Comment