Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
सुरक्षा मानकांची पूर्तता करेपर्यंत कोचिंग क्लासेस बंद ठेवले जाऊ शकतात, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. दिल्लीत पुराचं पाणी शिरल्यामुळे एका कोचिंग क्लास मधल्या तीन मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगर पालिकेला नोटीस बजावली आहे. कोचिंग क्लासेसच्या असुरक्षिततेबद्दल न्यायालयानं यावेळी नाराजी व्यक्त केली.
****
राज्यसभेत आज शून्य काळात अनेक खासदारांनी सार्वजनिक महत्त्वाचे विविध मुद्दे उपस्थित केले. भाजपचे समिक भट्टाचार्य यांनी बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी मागणी केली. पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातली लोकसंख्याशास्त्रीय रचना पूर्णपणे बदलली असून, यामुळे लोकशाही, अखंडता आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी देशात कर्करोगाच्या वाढत्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला.
****
बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलनामुळे झालेल्या हिंसाचारात काल एकाच दिवशी १३ पोलिसांसह ९१ जणांचा मृत्यू झाला. राजधानी ढाका आणि देशाच्या इतर काही भागांमध्ये कालपासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १९७१ च्या युध्दातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटूंबांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून, विद्यार्थी संघटनांनी देशव्यापी असहकार आंदोलन सुरु केलं होतं. पंतप्रधान शेख हसीना यांचा चर्चेचा प्रस्ताव आरक्षण-विरोधकांनी फेटाळून लावला असून, त्यांनी राजीनामा द्यावा, ही एककलमी मागणी केली आहे.
दरम्यान, या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये अशा मार्गदर्शक सूचना भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केल्या आहेत.
****
सुरक्षेच्या कारणावरुन अमरनाथ यात्रा आज एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. भगवती नगर तळापासून यात्रेकरुंचा प्रवास थांबवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधलं कलम ३७० हटवून आज पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षातर्फे केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली आर. एस. पुरा इथं एका भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात सामाजिक वातावरण कलुषित झालं असून, जातीय द्वेष निर्माण करणार्यांना माध्यमांनी स्थान देवू नये, असं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आहे. ते आज सोलापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मनसे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असून, त्या अनुषंगानं निवडणुकीत किती आणि कशा जागा लढवायच्या हे ठरवण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.
****
श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली. आज श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदिरासह हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं तसंच बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैजनाथ मंदीरातही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज, बॅडमिंटनपटू लक्ष्यसेनचा पुरुष एकेरीत कांस्यपदकासाठी सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल.
अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तीन हजार मीटर अडथळांच्या शर्यतीत बीडचा अविनाश साबळे सहभागी होणार आहे. तर महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत किरन पहलचा सामना होईल. त्याशिवाय आज नौकानयन आणि टेबल टेनिसचेही सामने होतील. हॉकीमध्ये भारताचा उपान्त्य फेरीचा सामना उद्या होणार आहे.
दरम्यान, टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचनं प्रथमच ऑलिम्पिकचं सुवर्णपदक पटकावलं आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत त्यानं कार्लोस अल्काराझचा सात - सहा, सात - सहा असा केला पराभव. १९८८ नंतर ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा जोकोव्हिच हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
****
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पाऊस सुरु असून, अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातून काल सायंकाळ पासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे. धुळे शहरातील फरशी पूल पाण्याखाली गेल्याने त्यावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून महापालिकेच्या अग्निशामन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नदी काठच्या रहिवाशांना देखील सुरक्षीत स्थळी हलवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. दरम्यान, निम्न पांझरा मध्यम प्रकल्पातून आज सकाळी पाच हजार सातशे पन्नास घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment