Monday, 5 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,दिनांक:05.08.2024 रोजीचे सकाळी:11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०५ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

विकसित भारताचं उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं ऊर्जा क्षेत्रातलं स्वावलंबित्व अतिशय महत्वाचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशानं इंधन वायू उत्पादनाच्या क्षेत्रात नवा उच्चांक गाठल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंह पुरी यांनी ट्विट संदेशाद्वारे नमूद केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी विक्रमी वायू उत्पादनाबाबत देशवासियांचं अभिनंदन केलं.

****

लोकसभेत आज २०२४- २५ च्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चा पुढे सुरु राहणार आहे. त्याचप्रमाणे विनियोजन विधेयकासह गोवा विधानसभेत अनुसूचित  जमातीला आरक्षण देणारं विधेयक आज मांडलं जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेत आज तेलक्षेत्र विनियमन आणि विकास सुधारणा विधेयक २०२४ मांडलं जाणार आहे.

****

फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रीयेत न्यायव्यवस्थेला सहाय्यभूत ठरतील अशा विविध सेवांचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल झालं. इलेक्ट्रॉनिक स्वरुपातले पुरावे हाताळण्यासाठी न्याय सेतू, न्याय श्रुती आणि ई - समन्स या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

****

श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात खाली, आज श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदीरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत.

****

पुण्यात काल झिका विषाणूचे आणखी सात रुग्ण आढळले असून, यामध्ये पाच गर्भवतींचा समावेश आहे. पुण्यातल्या झिका रुग्णांची एकूण संख्या ६५ झाली आहे.

****

शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी सेवा जनशक्ती पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. काल परभणी इथं पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं धोंडे यांनी सांगितलं.

****

राज्याच्या विविध भागात आजही पावसाचा जोर कायम असेल. पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये तसंच कोकण आणि घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment