Sunday, 25 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.08.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 August 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      भारताच्या स्त्री शक्तीने समाज आणि राष्ट्राचं भविष्य घडवण्यात नेहमीच मोठं योगदान दिलं - पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रांचं वाटप.

·      विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी समर्पणाच्या भावनेची गरज - मन की बात मध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन.

·      नांदेडचं रेल्वे स्थानक सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेलं देशातलं सर्वोत्तम रेल्वे स्थानक करण्यात येईल - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांचं आश्वासन.

आणि

·      राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस, बहुतांश धरणातून विसर्ग सुरू.

****

भारताच्या स्त्री शक्तीने समाज आणि राष्ट्राचं भविष्य घडवण्यात नेहमीच मोठं योगदान दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जळगाव इथं आज देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लखपती दीदींशी पंतप्रधानांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आज जेव्हा आपला देश विकसित होण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे, तेव्हा पुन्हा एकदा आपली स्त्री शक्ती पुढे येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असून, त्यात महिलांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी नमूद केलं. लखपती दीदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिणी आणि मुलींची कमाई वाढवण्याची मोहीम नाही, तर हे संपूर्ण कुटुंब आणि येणाऱ्या पिढ्यांना सक्षम करत असून, यामुळे गावाची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या १० वर्षात एक कोटी लखपती दीदी बनवल्या गेल्या आणि अवघ्या दोन महिन्यात आणखी ११ लाख लखपती दीदी एक कोटीत जोडल्या गेल्या असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

महिला स्वयंसहायता गटांना अडीच हजार कोटी रुपयांच्या सामूहिक गुंतवणूक निधीचं वितरण तसंच पाच हजार कोटी रुपयांच्या कर्जाचं वितरण यावेळी करण्यात आलं. ३० हजार ठिकाणच्या ११ लाख महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात लखपती दीदी प्रमाणपत्रं देण्यात आली.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, यावेळी उपस्थित होते.

तीन कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. २५ हजार ३० कोटींची कर्ज स्वयं सहायता गटांना देण्यात आली असून, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

दरम्यान, लखपती दीदी मेळाव्यात भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज छत्रपती संभाजीनगर मार्गे जळगावात आगमन झालं. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री अब्दुल  सत्तार, यांच्यासह स्थानिक खासदार- आमदार, तसंच जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं.

****

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिलं, विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आज अशाच भावनेची गरज असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून आज त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११३ वा भाग होता. आज मोठ्या संख्येनं युवा राजकारणात यायला तयार आहेत, त्यांना केवळ योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधीची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. युवकांनी या अभियानात स्वतःला जोडून घ्यावं असं आवाहन करतानाच, युवकांचं हे पाऊल देशाचं भविष्य बदलवून टाकणारं ठरेल असं पंतप्रधान म्हणाले.

मुझे उम्मीद है कि अब हमारे सामूहिक प्रयास से ऐसे युवा, जिनका कोई Political background नहीं है, वे भी राजनीति में आगे आ सकेंगे, उनका अनुभव, और उनका जोश, देश के काम आएगा।  

नुकताच २३ ऑगस्टला देशानं पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केल्याचं सांगताना, पंतप्रधानांनी मागच्या वर्षी याच दिवशी भारताचं चांद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण भागात शिव - शक्ती पॉइंट इथं यशस्वीपणं उतरल्याच्या कामगिरीला उजाळा दिला.  २१ व्या शतकातल्या देशातल्या घडामोडींमुळे विकसित भारताचा पाया मजबूत होत असल्याचं ते यावेळी म्हणाले.

लवकरच पॅरिसमध्ये होणार असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या आपल्या दिव्यांग खेळाडूंना चिअर फॉर भारत हा हॅश टॅग वापरून प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं.

हर घर तिरंगा, प्राणी तसंच पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी देशभरात सुरु असलेले काही अभिनव प्रयत्न, लहान मुंलांचं पोषण, कुपोषण, संस्कृत भाषा संवर्धन आदी विषयांवर त्यांनी मन की बात मध्ये भाष्य केलं. येत्या काही दिवसात साजऱ्या होणाऱ्या जन्माष्टमी, गणेशोत्सव, ओणम, मिलाद उन नबी या सणांसह तेलुगू भाषा दिनाच्या शुभेच्छा पंतप्रधानांनी नागरिकांना दिल्या.

****

मंकी पॉक्स विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडून पुणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत आहेत. सिंगापूर आणि दुबई इथून आलेल्या ५३१ प्रवाशांची तपासणी पुणे विमानतळावर गेल्या सहा दिवसांत करण्यात आली. यात एकही संशयित रुग्ण आढळला नाही.

****

नांदेडचं रेल्वे स्थानक हे येत्या कालावधीत सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेलं देशातलं सर्वोत्तम रेल्वे स्थानक करण्यात येईल, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी म्हटलं आहे. गुरुद्वारा शहीद बाबा भुजंग सिंघजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वे यात्रा सरु करण्यात आली असून, आज नांदेड इथून रवनीतसिंघ यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यानंतर ते बोलत होते. तेराशे भाविकांना घेऊन ही यात्रा नांदेड इथून पटना, दिल्ली, अनंतसाहिब फतेहगड साहिब सरहंद, दमदमा साहिब भटींडा, दरबार साहिब अमृतसर इथं पोहोचणार आहे. सहा सप्टेंबर रोजी ही यात्रा पुन्हा नांदेडला पोहोचणार आहे.

****

पक्षांतरबंदी कायद्याच्या नियमानुसार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्यानं राज्यात महायुतीमध्ये काहीतरी गडबड सुरू आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. मुख्यमंत्री पदापेक्षा महाराष्ट्राचा धर्म, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र वाचवणं हे महाविकास आघाडीचं कर्तव्य आहे, यासाठी आम्ही सगळे काम करत असल्याचं पटोले म्हणाले.

****

राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून, बहुतांश धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नांदेडमधल्या विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे काल सायंकाळी उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सात हजार ४३१, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ३० हजार १६९ तर पालखेड धरणातून कादवा नदीमध्ये ८३० घनफुट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नाशिक शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे.

धुळे जिल्ह्यात पांझरा नदीवरच्या अक्कलपाडा प्रकल्पाच्या धरणाचे सर्व दरवाजे आज दुपारी उघडून १४ हजार ३०० दशलक्ष घनफुट प्रतीसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं, पांझरा नदीला मोठा पूर आला आहे. या पुरात एक तरुण वाहून गेल्याचं वृत्त आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी पूर्ण केली असून, जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

****

पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी ४७० कोटी ३७ लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली, त्यात ही मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेली कामं विहित कालमर्यादेत आणि दर्जेदार होतील, यावर भर देण्याचे निर्देश बनसोडे यांनी यावेळी दिले.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे माजी आमदार डी. के. देशमुख यांची तर सचिवपदी सारंग टाकळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. आज झालेल्या संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची निवडही करण्यात आली.

****

लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या मरशिवणी गावाजवळील वळण रस्त्यावर आज एका भरधाव चारचाकीने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात रिक्षातील महेश जायभाये या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

****

No comments:

Post a Comment