Monday, 26 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 26 August 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी

·      देशात स्त्री शक्तीच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य - पंतप्रधानांचं प्रतिपादन; जळगाव इथल्या कार्यक्रमात बचतगटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी जारी 

·      विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी युवकांनी राजकीय सहभाग वाढवावा, पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन

आणि

·      राज्यासह मराठवाड्यात पावसाचा जोर कायम, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ४४ टक्क्यांवर

 

सविस्तर बातम्या

केंद्र सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यास राज्य मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. या योजनेची अंमलबजावणी मार्च २०२४ पासून करण्यात येणार असून, राज्य सरकारच्या सेवेतल्या सुमारे १८ लाखाहून जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कर्मचार्यांनी या योजनेचा पर्याय निवडल्यास त्यांना त्यांच्या अखेरच्या वेतनाच्या ५० टक्क्यांइतकं निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई वाढ, तसंच निवृत्तीवेतनाच्या ६० टक्के इतकं कुटुंब निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई वाढ मिळणार आहे.

 

शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्याच्या योजनेची व्याप्ती वाढवण्यास, तसंच नार - पार - गिरणा नदी जोड प्रकल्पालाही सरकारनं काल मान्यता दिली. सात हजार १५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पानं नाशिक, जळगाव जिल्ह्याला मोठा फायदा होईल.

 

आरोग्य खात्यातल्या गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजारांची वाढ करण्याचा, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत करण्याचा, ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.

****

देशातल्या स्त्री शक्तीच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे, मात्र त्याच मातृशक्तीवर कुणी अत्याचार करत असेल, तर ते अक्षम्य पाप असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जळगाव इथं काल देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लखपती दीदींशी पंतप्रधानांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. विविध राजकीय पक्ष तसंच सत्ताकेंद्रांनी महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, अशी सूचना त्यांनी केली. स्त्री शक्तीनं समाज आणि राष्ट्राचं भविष्य घडवण्यात नेहमीच मोठं योगदान दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमात ११ लाख लखपती दीदींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. बचतगटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी देखील पंतप्रधानांनी जारी केला, त्याचा लाभ चार लाख तीन हजार बचत गटातल्या सुमारे ४८ लाख सदस्यांना होणार आहे. याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज देखील बचतगटांना वितरित करण्यात आलं. त्याचा लाभ दोन लाख ३५ हजार बचत गटातल्या २५ लाख आठ हजार सदस्यांना होणार आहे.

गेल्या १० वर्षात एक कोटी लखपती दीदी बनवल्या गेल्या आणि अवघ्या दोन महिन्यात आणखी ११ लाख लखपती दीदी एक कोटीत जोडल्या गेल्या असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

 

3 करोड़ बहनों को लखपति दीदी बनाना है। यानी 3 करोड़ ऐसी बहनें और जो सेल्फ हेल्प ग्रुप में काम करती हैं। जिनकी एक साल की कमाई, एक लाख रुपये से अधिक होगी। बीते 10 वर्षों में एक करोड़ लखपति दीदी बनीं और बीते 2 महीनों में, सिर्फ दो महीने में 11 लाख और लखपति दीदी उसमें जुड़ गईं, नई बन गईं।

या कार्यक्रमात लखपती दीदींनी पंतप्रधानांना भेटववस्तू देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यापूर्वी त्यांनी निवडक लखपती दीदींशी संवाद साधला. जळगावात दाखल होताच पंतप्रधानांचं पारंपरिक स्वागत करण्यात आलं.

 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, यावेळी उपस्थित होते.

 

भारताला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी अत्यंत आवश्यक असून, त्यासाठी लखपती योजना पथदर्शी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांमुळे गेल्या दहा वर्षात ग्रामीण भागातल्या दहा कोटी महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकार महिला सक्षमीकरणासाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली. तर तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं स्वप्न पंतप्रधानांनी पाहिलं आहे, या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्रात ५० लाख लखपती दीदी बनवण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

****

धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुक्यातल्या पारगाव, पारा, तेरखेडा प्रभागसंघ अंतर्गत लखपती दीदी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात लखपती दीदींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.

****

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिलं, विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आज अशाच भावनेची गरज असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून काल त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. आज मोठ्या संख्येनं युवा राजकारणात यायला तयार आहेत, त्यांना केवळ योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधीची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.

हर घर तिरंगा, प्राणी तसंच पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी देशाभरात सुरु असलेले काही अभिनव प्रयत्न, लहान मुंलांचं पोषण, कुपोषण, संस्कृत भाषा संवर्धन आदी विषयांवर त्यांनी मन की बात मध्ये भाष्य केलं. आज साजऱ्या होणाऱ्या जन्माष्टमीसह आगामी गणेशोत्सव, ओणम, मिलाद उन नबी या सणांसह तेलुगू भाषा दिनाच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

****

गुरु गोविंदसिंग जी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं नांदेड इथलं रेल्वे स्थानक, येत्या काळात सर्व सोयी सुविधांनी सज्ज केलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी दिलं आहे. नांदेड इथं काल त्यांनी विशेष रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यानंतर ते बोलत होते. शहीद बाबा भुजंगसिंघजी धर्मादाय विश्वस्त संस्थेद्वारे सहा सप्टेंबर पर्यंत पंच तख्त साहिबांच्या दर्शनासाठी ही विशेष रेल्वे यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेची पहिली गाडी काल रवाना झाली.

****

राज्यात विविध ठिकाणी कालही मुसळधार पाऊस झाला. बहुतांश प्रकल्पात पाणीसाठा वाढल्यानं विसर्ग सुरू  आहे.

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात काल दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९४ पूर्णांक नऊ टक्के, जालना जिल्ह्यात ९५ पूर्णांक पाच टक्के, तर बीडमध्ये वार्षिक सरासरीच्या ९७ टक्के इतका पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यात दुधना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, अनेक बंधारे तुडुंब भरले आहेत.

बीड जिल्ह्यात मांजरा नदीला पूर आल्यानं केज आणि कळंब तालुक्याच्या सीमेवर फक्राबाद इथला बंधारा फुटल्याने बीड आणि धाराशिव जिल्ह्याची वाहतूक ठप्प झाली आहे.

 

नाशिक शहरासह जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला आलेला पुर कायम आहे. गंगापूर धरणातू आठ हजार ४२८, दारणा धरणातून १४ हजार ४१६, तर नांदूर मध्यमेश्वर मधून ५२ हजार ३०८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नाशिक शहरातल्या रामकुंड परीसरातली मंदिरं पाण्याखाली गेली आहेत.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणात ५८ हजार ७९९ घनफूट प्रतिसकेंद वेगाने पाण्याची आवक सुरु असून, धरणाचा पाणीसाठा ४४ टक्क्यांवर गेला आहे.

नवी मुंबई, पालघर, कोल्हापूर, सातारा, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला असून, धरणांमधून विसर्ग सुरु आहे.

****

जालना औद्योगिक वसाहतीमधल्या गजकेसरी स्टील कारखान्यात झालेल्या स्फोटात जखमी एका कामगाराचा छत्रपती संभाजीनगर इथल्या एका खाजगी रुग्णालयात काल उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रामश्रेष्ठ भटुरिया, असं मृत कामगाराचं नाव आहे. इतर तीन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या कंपनी मालकासह इतर दोघांना न्यायालयानं काल जामीन मंजूर केला.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौर्यावर असून, काल त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यात सत्ता परिवर्तनासाठी एकजुटीने प्रयत्न करा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बरोजगारी, महिला सुरक्षा यावरुन त्यांनी सरकारवर टीका केली. आदित्य ठाकरे आजही जिल्ह्यातल्या काही तालुक्यांचा दौरा करून शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत.

****

परभणी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी ४७० कोटी ३७ लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली, त्यात ही मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेली कामं विहित कालमर्यादेत आणि दर्जेदार होतील, यावर भर देण्याचे निर्देश बनसोडे यांनी यावेळी दिले.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे माजी आमदार डी. के. देशमुख यांची तर सचिवपदी सारंग टाकळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. काल झालेल्या संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची निवडही करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढील पाच वर्ष कार्यरत राहील.

****

श्रीकृष्ण जन्माष्टमी आज साजरी होत आहे. आज मध्यरात्री १२ वाजता ठिकठिकाणच्या श्रीकृष्ण मंदीरांसह घरोघरी श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जाईल.

****

No comments:

Post a Comment