Sunday, 15 September 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १५ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 September 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

·      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल -परंडा इथं महिला सशक्तीकरण अभियानात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थांमधल्या संविधान मंदिराचं आज उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन-राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्येआचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची येत्या शुक्रवारी पंतप्रधानांच्या हस्ते स्थापना

·      भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची 'सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभागाची' घोषणा

आणि  

·      आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी मोहीम कायम

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होता चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. धाराशिव जिल्ह्यात परंडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला सशक्तीकरण अभियानात ते काल बोलत होते. देशभरातल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असून, जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळेच देशभरात विविध क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले..

आज एकूण गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे. आपलं राज्य नंबर एकला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर गेलं होतं. मला अभिमान आहे, तुमच्या शुभेच्छांमुळे, आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर एकला आलं. आज जीडीपी असेल, परदेशी गुंतवणूक असेल, उद्योग असेल या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आहे.

महिलांनी शक्ती दिल्यास, या योजनेतल्या रकमेत दुप्पट वाढ करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या ठिकाणी जमलेल्या भगिनींचा उत्साह पाहून, आपण घेतलेला निर्णय सार्थकी लागल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील, एकही बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी मुख्यमंत्र्यांना ओवाळून राख्या बांधल्या.

****

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून, काल त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं, तसंच नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरच त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२ तारखेपासून साजरा होत असलेल्या संविधान महोत्सवाचा आज समारोप करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

केंद्र शासनाच्या 'पीएम विश्वकर्मा' योजनेतून कुशल कारागिरांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून, या योजनेचा वर्षपूर्ती सोहळा येत्या २० सप्टेंबर रोजी वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. अमरावती इथल्या पीएम मेगा टेक्सटाईल पार्कची पायाभरणीही यावेळी आभासी पद्धतीनं होणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल नियोजित सभास्थळाची पाहणी करून संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.

पंतप्रधानांच्या या दौऱ्यात राज्यातल्या एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्येआचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ३३ महाविद्यालयांचा समावेश आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी ही माहिती दिली.

****

खाद्यतेलाच्या आयातीवर २० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादकांना अधिक किंमत मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे. रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलावर आयात शुल्क साडे बारा टक्क्यांवरून साडे ३२ टक्के करण्याच्या निर्णयाचंही पटेल यांनी स्वागत केलं.

****

कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवल्यानं तसंच निर्यात शुल्क निम्म्यानं कमी केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या घाऊक बाजारात काल कांद्याचे दर प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी वधारले. लासलगाव बाजारात चांगल्या प्रतिच्या कांद्याला सरासरी हजार ६०० रुपये दर मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 

शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठीची मुदत १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असं आवाहन शासनानं केलं आहे.

****

परदेशात गणेशोत्सव कसा साजरा होतो, याबाबत आपण दररोज माहिती घेत आहोत. स्वीडनमधल्या स्टॉकहोममध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत अनुजा कुलकर्णी यांनी माहिती दिली..

मूर्तीची प्राणप्रतिष्‍ठा पौरोहित्य येणारे मराठी किंवा अमराठी भारतीय करतात. तर पूजा साहित्य तसंच प्रसाद हे सगळं विकणारी काही कुटुंबे या गोष्‍टींचा पुरवठा करतात. यानिमित्ताने भारतीय बांधवांनी सुरू केलेल्या छोट्या छोट्या व्यवसायांनाही मदत केली जाते. हिंदू स्वयंसेवक संघातर्फे २०१७ सालापासून गणेश मूर्ती घडवण्याची मोफत कार्यशाळा आयोजित केली जाते. २० सभासदांपासून सुरू झालेली ही कार्यशाळा आता सहाशेच्या घरात गेली असून आता गॉथनबर्गमध्येही सुरू झाली आहे. या मूर्ती साध्या मातीच्या असल्यामुळे त्यांचं विसर्जन घरच्या घरी अगदी सहज करता येतं. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्ती भारतातून मागवलेल्या असल्यामुळे त्यांचे प्रतिकात्मक विसर्जन करून त्या पुढच्या वर्षासाठी सांभाळून ठेवल्या जातात. महाराष्‍ट्र मंडळाच्या विसर्जनाच्या वेळी इथल्या हॉलमध्येच ढोल वाजवून छोटीशी मिरवणूक काढली जाते.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या कवडी इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव उत्सव साजरा केला. फुले, शंख- शिंपले, वेगवेगळ्या झाडांची पाने, रंगीत दगड, शेंगांची टरफले अशा मोफत आणि सहज उपलब्ध होणाऱ्या साधनांचा वापर करून गणेशाचे विविध भाव दर्शवणारं कोलाज साकारण्यात आलं आहे.

****

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फी अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 'सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभागाची' घोषणा केली आहे. तरुण चित्रपट निर्मात्यांची सर्जनशील दृष्टी आणि अनोखा कथा मांडणी दाखवणारे कमाल पाच चित्रपट या विभागात दाखवले जातील. या व्यतिरिक्त, सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कार देखील यावेळी प्रदान केला जाईल. गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हा ५५ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे.

****

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर - अशी मात करत, या स्पर्धेतलं आपलं विजयी अभियान अबाधित ठेवलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत काल झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रितसिंहने दोन्ही गोल केले. यंदाच्या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला भारत याआधीच उपांत्य फेरीत दाखल झालेला आहे. उद्या १६ सप्टेंबरला उपांत्य सामने होणार आहेत. 

****

तापमान वाढ रोखण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजना प्रभवी ठरेल, असं माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार भागवत कराड यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल कराड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्याला सातत्यानं निसर्गाच्या  असमतोलतेचा अधिक फटका बसला आहे, या परिषदेच्या माध्यमातून निसर्ग आणि पायाभूत सुविधेचा समतोल राखण्यास सहाय्य होईल, अशी अपेक्षा कराड यांनी याप्रसंगी व्यक्त केली. शाश्वत विकास, पर्यावरण आणि समाज कल्याणासंबिधत प्रश्न आणि आव्हाने या विषयावरील या दोन दिवसीय परिषदेमध्ये ६० हूनअधिक संशोधक उपस्थित आहेत.  

****

कलाकारांनी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी दिला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन च्या सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सचिन सुप्रिया यांनी दिलखुलास उत्तरं दिली. सचिन यांच्या गाण्यानं कार्यक्रमाचा समारोप झाला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवार १६ सप्टेंबर रोजी ईद - -मिलाद निमित्तची सुटी कायम करण्यात आली आहे. ही सुटी १६ किंवा १८ तारखेला घेण्याबाबत स्थानिक पातळीपर निर्णय घेण्यास सांगगण्यात आलं होतं, त्यानुसार काल जिल्हाधिकारी तसंच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी, महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पाहणी करुन अहवाल द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

****

नांदेड पोलिसांनी काल नवीन नांदेड भागात दोघा जणांकडून तीन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसं जप्त केली. या कारवाईत ६४ हजाराचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

****

No comments:

Post a Comment