Sunday, 15 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.09.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 September 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      भारतीय राज्यघटनेचा गाभा आपण समजून घेणं गरजेचं - उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यात ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण

·      येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

·      केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी असल्याची खासदार शरद पवार यांची टीका

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन

****

भारतीय राज्यघटना सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून, राज्यघटनेचा गाभा आपण समजून घेणे गरजेचं असल्याचं, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. राज्यभरातल्या ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातल्या कार्यक्रमात दूरदृश्य पद्धतीनं केल्यानंतर ते आज बोलत होते. राज्यघटना हा लोकशाहीचा आत्मा, तर संसद म्हणजे राज्यघटनेचा रक्षणकर्ता आहे, राज्यघटना ही मिरवण्यासाठी नसून वाचून, समजून घेण्यासाठी आणि आदर करण्यासाठी असल्याचं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी या संविधान मंदिराचं उद्घाटन करण्याचा हा क्षण अविस्मरणीय आहे, या मंदिरामुळे राज्यघटनेबद्दल जागृती वाढेल, असा विश्वास धनखड यांनी व्यक्त केला. युवा पीढीनं सर्वत्र राष्ट्राचा गौरव वाढवावा असं आवाहन त्यांनी केलं.

राज्यघटनेनं दिलेल्या आरक्षणाला काही लोक विरोध करत आहेत, मात्र आरक्षण हा भारताचा, राज्यघटनेचा आत्मा आहे. आजच्या युवांनी राज्यघटनेचा अनादर करणाऱ्यांविरुद्ध लढण्याची तयारी ठेवावी, सर्वांनी स्वहिताच्या आधी देशहिताचा विचार करावा, असं आवाहनही उपराष्ट्रपतींनी यावेळी केलं.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते.

 

छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र आणि औद्योगिक शाळा इथं संविधान मंदिराच्या लोकार्पणानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी प्राचार्य मिलिंद बनसोडे यांनी यावेळी संविधानाचं महत्व आणि संविधानाबाबत सविस्तर माहिती दिली.

 

त्यानंतर उपराष्ट्रपती धनखड यांनी आज नागपूरमध्ये रामदेवबाबा अभिमत विद्यापीठात डिजिटल टॉवरचं उद्घाटन केलं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यावेळी उपस्थित होते. १२ मजली डिजिटल टॉवरमध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या डिजिटल वर्गांचा समावेश आहे.

यावेळी उपराष्ट्रपतींनी त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्यासमवेत विद्यापीठ परिसरात एक पेड मां के नामअभियानांतर्गत वृक्षारोपण केलं.

****

सबका साथ सबका विश्वास या मंत्रानं देशात विचारधारा आणि प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल केला असून, गरीब, आदिवासी, दलित, वंचित, मागासवर्गीय, महिला, युवावर्ग आणि शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. झारखंड दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज पंतप्रधानांनी सहा वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात ६६० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पणही करण्यात आलं.

केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनाअंतर्गत बांधण्यात आलेल्या देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा शुभारंभ आणि ४६ हजार लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळा देखील या कार्यक्रमात पार पडला. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण ३२ हजार कोटी रुपयांचा थेट मदतीचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीणच्या २० हजार लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते आवास मंजुरी पत्रांचं वाटपही करण्यात आलं.

****

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दोन दिवसापूर्वी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तिहार कारागृहातून बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत आम आदमी पार्टीच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन त्यात नव्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित केलं जाईल, असं केजरीवाल यांनी सांगितलं.

****

केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. धुळे जिल्ह्याल्या शिंदखेडा इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते आज बोलत होते. सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही त्याचप्रमाणे राज्यात महिला सुरक्षित नाहीत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हे सरकार हटवून आपल्या विचारांचं सरकार आणणं ही जनतेची जबाबदारी आहे, असं पवार यावेळी म्हणाले.

****

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचं पूजन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारीया पुस्तकाची प्रत आणि श्री गणेशाची मूर्ती राज्यपालांना भेट म्हणून दिली.

****

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना माय जी ओ व्ही ओपन फोरमवर, नमो ॲप वर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या क्रमांकावर पाठवाव्यात किंवा एक नऊ दोन दोन या क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा संघर्ष, त्याग आणि बलिदानाचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे पोहोचवावा, असं आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात भरवण्यात आलेल्या, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन आज सावे यांच्यासह खासदार भागवत कराड तसंच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं, त्यावेळी सावे बोलत होते.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी बोलताना, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाविषयी माहिती दिली तसंच, तरुणांनी या मुक्तिसंग्रामाची गाथा जाणून घेऊन त्यापासून प्रेरणा घ्यावी, असं आवाहन केलं. १७ तारखेपर्यंत हे प्रदर्शन सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे.

****

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार असून, ‘पर्यटन आणि शांतताअशी यंदाची या दिनाची संकल्पना आहे. महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांतर्फे या विषयाच्या अनुषंगाने परिसंवाद, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती, महामंडळाचे व्यवस्थापक मनोजकुमार सुर्यवंशी यांनी दिली.

****

ईद-ए-मिलाद निमित्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी उद्याची १६ तारखेची सार्वजनिक सुटी कायम ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे.

तर बीड जिल्ह्यात येत्या बुधवारी १८ तारखेला ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातलं पत्रक आज जारी केलं.

****

लातूर शहरात येत्या सतरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणपती विसर्जनाच्या अनुषंगानं, जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं शहरातल्या विसर्जन मार्गावर वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. विसर्जनाच्या दिवशी सकाळी दहा ते रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही पर्यायी मार्गाची व्यवस्था असेल, असं प्रशासनानं कळवलं आहे.

****

धुळे जिल्ह्यात शिंदखेडा इथं दसवेल फाट्याजवळ आज सकाळी खासगी प्रवासी वाहन आणि व्हॅन यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. शिंदखेडा तालुक्यातल्या वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून हे भाविक शिंदखेडा इथं परतत असतांना हा अपघात झाला. खासगी प्रवासी वाहनाचा चालक मद्यधुंद असल्याचं प्रथमदर्शी निदर्शनास आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बॅडमिंटनपटू अनमोल खरब हिनं लुवेन इथं बेल्जियम इंटरनॅशनल स्पर्धेत महिला एकेरीचं पहिलं आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावलं आहे. १७ वर्षीय अनमोलनं अंतिम फेरीत डेन्मार्कच्या अमाली शुल्झचा २४-२२, १२-२१, २१-१० असा पराभव केला.

****

No comments:

Post a Comment