Monday, 16 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.09.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 September 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध - पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      देशभरात स्वच्छता ही सेवाअभियानाला उद्यापासून प्रारंभ-गांधी जयंतीला समारोप

·      मराठवाड्यासाठी वर्षभरापूर्वी जाहीर योजनांबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याचा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आरोप

·      उद्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन-दहा दिवसीय गणेशोत्सवाचीही उद्या सांगता

आणि

·      आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियावर मात करत भारत अंतिम फेरीत दाखल

****

ग्रीन फ्युचर आणि नेट झीरो अर्थात हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषदेत बोलत होते. हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज असून याचाच भाग म्हणून २० हजार कोटी रुपयांच्या ग्रीन हायड्रोजन मिशनला सुरुवात केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांच्या आधारावर देशाचं भविष्य घडवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, त्यांनी सांगितलं. पीएम सूर्यघर योजनेच्या यशाबद्दल कौतुक करत, योजनेमुळे भविष्यात देशातलं प्रत्येक घर ऊर्जा निर्मिती केंद्र होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २१ व्या शतकाच्या इतिहासात भारताच्या सौर क्रांतीचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातल्या तीन वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये नागपूर-सिकंदराबाद, पुणे-हुबळी आणि कोल्हापूर-पुणे या गाड्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर रेल्वे स्थानकावर या कार्यक्रमात सहभागी झाले. कोल्हापूर स्थानकावर यावेळी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. कोल्हापूर-पुणे वन्दे भारत एक्स्प्रेसच्या शुभारंभाच्या या गाडीतून प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मिरज स्थानकापर्यंत मोफत प्रवास, अल्पोपहार आणि टोप्या रेल्वेकडून देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आठव्या ‘भारत जल सप्ताहाला उद्यापासून सुरुवात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या नवी दिल्लीत भारत मंडपम इथे या सप्ताहाचं उद्घाटन करणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात चाळीस देशांतल्या दोनशे प्रतिनिधींसह सुमारे चार हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात, जलक्षेत्रात काम करणारे शंभरहून अधिक स्टार्टअप्स आपापल्या संकल्पना मांडतील.

****

देशभरात उद्यापासून स्वच्छता ही सेवाअभियानाला सुरूवात होत आहे. हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छताही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे. या अभियानात लोकसहभागातून पर्यटन स्थळं, सार्वजनिक इमारती, व्यावसायिक परिसर, जलाशय, प्राणीसंग्रहालयं, अभयारण्यं आणि सार्वजनिक स्वच्छतागृहं यासारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवण्यात येणार आहेत.

मराठवाड्यातही बहुतांश ग्रामपंचायतींमध्‍ये हे अभियान राबवण्‍यात येणार असून, उद्या सगळ्या गावांमधून शुभारंभ करुन स्‍वच्‍छता प्रतिज्ञा घेतली जाणार आहे, नांदेड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी ही माहिती दिली.

****

मराठवाड्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी राज्य सरकारनं एक वर्षापूर्वी जाहीर केलेल्या योजनांबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या वर्षी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासकामांच्या शंभरहून अधिक घोषणा करण्यात आल्या मात्र कोणत्याही योजनेचं काम सुरू झालं नसल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला.

****

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे वकिलांचं काम अधिक तंत्रस्नेही होईल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवीदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथे झाला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जनसामान्यांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वृद्धिंगत करण्यात वकिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचं मत, न्यायमूर्ती खन्ना यांनी व्यक्त केलं. या समारंभात एकशे तेरा स्नातकांना विधी पदवी आणि पदव्युत्तर पदव्यांचं तर सुवर्णपदक विजेत्यांना सुवर्णपदकांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.

****

दृष्टीहीन आणि कर्णबधिर प्रेक्षकांनाही चित्रपटांचा आनंद घेता यावा, यासाठी चित्रपटगृहांमध्ये विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटगृहांमध्ये आता अशा सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळानं जाहीर केलं आहे.

****

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. या निमित्त मराठवाड्यातला मुख्य ध्वजारोहण समारंभ उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथल्या सिध्दार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता होणार आहे. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणीही करणार आहेत.

परभणी इथं राजगोपालाचारी उद्यानात पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर नांदेड इथं माता गुजरीजी विसावा उद्यानात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण केलं जाणार आहे.

****

दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची उद्या, अनंत चतुर्दशीला सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्याची सोय महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. या सगळ्या ठिकाणी आरोग्य पथकांसह महापलिकेचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. मागच्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी मूर्ती दानाचा उपक्रम महापालिका राबवणार असून, यासाठी शहरात ४६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत.

कचरा प्रक्रिया केंद्रावर निर्माल्य दान करणाऱ्यां नागरिकांना अर्धा किलो खताचं पाकीट भेट म्हणून दिलं जाणार असल्याचं महापालिकेनं कळवलं आहे.

नांदेडमध्येही श्री गणेशाचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. शहरात सव्वीस ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रं उभारण्यात आली आहेत.

जालना इथंही महापालिका प्रशासनासह पोलीस प्रशासनानं आवश्यक नियोजन केलं आहे. घरगुती गणेश मूर्तींचं पर्यावरण पूरक विसर्जन करण्यासाठी मोती तलाव चौपाटीवर कृत्रिम हौद तयार कण्यात आला आहे, तर सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्तींचं मोती तलावात विसर्जन केलं जाणार आहे. शहरातल्या मुक्तेश्वर तलाव आणि घाणेवाडी तलावात गणेशमूर्ती विसर्जनास मनाई असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

धाराशिव जिल्ह्यात आज चारशे दहा गणेश मूर्तींचे विसर्जन झालं, तर उद्या अनंत चतुर्दशीला सुमारे एक हजार गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात ईद-ए-मिलादचा जुलूस धाराशिव, नळदुर्ग, लोहारा आणि कळंब इथं १९ सप्टेंबर रोजी तर परंडा इथं परवा १८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

****

चीन मध्ये सुरु असलेल्या आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज उपान्त्य फेरीत भारतानं दक्षिण कोरियाला चार एकनं पराभूत केलं. या विजयासोबतच भारतीय संघ या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचला आहे. कर्णधार हरमनप्रितसिंहने दोन, तर जर्मनप्रितसिंह आणि उत्तमसिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. उद्या भारत आणि चीन संघात अंतिम सामना होणार आहे.

****

लातूर जिल्ह्यात उद्या ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड केली जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे. झाड लावल्यानंतर त्या झाडासोबतचं आपलं छायाचित्र merilife.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहनही प्रशासनानं केलं आहे.

****

No comments:

Post a Comment