Monday, 16 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.09.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 16 September 2024

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १६ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

राज्यातल्या तीन नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण होणार आहे. यामध्ये पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुण्यातून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे-हुबळी आणि कोल्हापूर-पुणे या दोन्ही गाड्या आठवड्यातून प्रत्येकी तीन दिवस धावणार आहेत.

पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर असून, भुज ते अहमदाबाद या देशातल्या पहिल्या वंदे भारत मेट्रोला ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आठ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. 

****

देशभरात आज ईद - - मिलाद - उन - नबी उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषि मोहम्मद पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनांना बळ देण्यासाठी प्रेरित केलं, त्यांनी समाजात दया, मानवतेचा प्रसार केला असं सांगून राष्ट्रपतींनी मुस्लीम समुदायाला पवित्र कुराणातली शिकवण आत्मसात करण्याचं आवाहन केलं.

दरम्यान, ईद निमित्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी आज, तर बीड जिल्ह्यात येत्या बुधवारी १८ तारखेला सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.

****

संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला पाठबळ द्यावं लागेल, असं आग्रही मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. राष्ट्रीय अभियंता दिनानिमितत काल सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सीओईपी अभिमान पुरस्कार वितरण समारंभात ते काल बोलत होते. यंदाचा सीओईपी जीवनगौरव पुरस्कार अहमदाबादमधल्या भगवती स्फेरोकास्टचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक ज्येष्ठ उद्योगपती पी.एन. भगवती यांना देण्यात आला.

****

केंद्राच्या सहकार विभागाने आणलेल्या नवीन कायद्यानुसार सहकारी संस्थांना १५१ प्रकारचे विविध व्यवसाय करण्याला परवानगी दिली आहे. संस्थांच्या अध्यक्षांनी आणि संबंधितांनी या योजनांची माहिती घेऊन योजना राबवण्याचं आवाहन, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. ते काल पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातल्या अवसरी इथल्या शासकीय  तंत्रनिकेतन महाविद्यालयात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने आयोजित सहकार परिषद आणि बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

****

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तीन हजार ६५३ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचं आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता  पवनकुमार कछोट  यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरालगत हर्सूल इथल्या हरसिद्धी माता मंदिरात भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याकरता २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून देऊ, असं आश्वासन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. हरसिद्धी माता मंदिरात भव्य महाप्रसाद कार्यक्रमात ते काल बोलत होते. सत्तार यांनी यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधला आणि मंदिर परिसराची पाहणी केली.

****

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं उपोषण करत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केलं आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काल त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याचं घोषित केलं. उंबरे यांचं गेल्या १४ दिवसांपासून क्रांती चौकात उपोषण सुरु होतं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात गणेशपूर - पाटणा रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रिकेश मोरे असं या मुलाचं नाव असून, तो गणेशपूर पिंप्री इथला रहीवासी होता. अन्य एका घटनेत गौताळा अभयारण्यातल्या औट्रम घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जखमी झाला आहे. वन्यजीव पथकाने या परिसरात शोधमोहिम सुरु केली आहे. जखमी बिबट्या धोकादायक ठरु शकतो, त्यामुळे घाटातून प्रवास करणार्यांनी सावधानता बाळगावी, असं आवहान वन विभागाने केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणात सध्या अडीच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

****

No comments:

Post a Comment