Tuesday, 17 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.09.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 September 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      आठव्या भारतीय जल सप्ताहाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते नवी दिल्लीत उद्घाटन

·      हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन सर्वत्र साजरा-मराठवाड्याच्या विकासाची २९ हजार कोटी रुपयांची कामं पूर्णत्वाकडे-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      दहा दिवसीय गणेशोत्सवाची सांगता-ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुकींना प्रारंभ

आणि

·      आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताला पाचवं अजिंक्यपद

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं आठव्या भारतीय जल सप्ताहाचं उद्घाटन केलं. भारतीय प्राचीन धर्मग्रंथांनी हजारो वर्षांपूर्वी जलसंधारणाचा उल्लेख केला असल्याचं मुर्मू यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली आणि अनेक जलकुंभांचं पुनरुज्जीवन करण्यात आल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात चाळीस देशांतल्या दोनशे प्रतिनिधींसह सुमारे चार हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात, जलक्षेत्रात काम करणारे शंभरहून अधिक स्टार्टअप्स आपापल्या संकल्पना मांडतील.

****

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज सर्वत्र साजरा झाला. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. निजाम आणि रझाकारांच्या अत्याचारांवर मात करत, एकजुटीनं लढलेल्या मराठवाड्यातील जनतेच्या संघर्षाचं स्मरण आपण आज करतो, असं शाह यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम आज दिवसभर पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झालं. मराठवाड्याच्या विकासाची २९ हजार कोटी रुपयांची कामं पूर्णत्वाकडे चालली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले

गेल्या वर्षी आम्ही राज्य मंत्रीमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरला घेतली. आणि ४५ हजार कोटी पेक्षा जास्त काम आणि प्रकल्प सुरू केले. १६ सष्टेंबर २०२३ ला २९ निर्णय व २६ घोषणा करण्यात आल्या. यापैकी २९ हजार कोटीची कामे पूर्णत्वाकडे चालली आहेत. उरर्वरित काम प्रगती पथावर आहेत. हे फक्त कागदावर ठेवलेल नाही, तर यांची अंमल बजावणी सुरू झाली आहे.

 

मराठवाड्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या दाव्याला विधान परिषदेतले विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आव्हान दिलं आहे. पूर्ण झालेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर करावी असं, दानवे यांनी म्हटलं आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाची गती पाहता, पुढील १० वर्ष मराठवाड्याला पाणी देण्याचा सरकारचा मनोदय दिसत नसल्याची, गंभीर टीका दानवे यांनी केली.

****

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध विकासयोजनांच्या कामांचं भूमीपूजन केलं. त्यानंतर शिंदे यांनी शासकीय रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी विभागाची पाहणी करुन डॉक्टरांशी संवाद साधला.

****

जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी पालकमंत्री सावे आणि मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.

बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. शेतकऱ्यांना आणि नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुंडे यांनी नमूद केलं. हुतात्मा चौक इथंल्या स्मारकास २१ तोफांची सलामी देण्यात आली.

परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यानिमित्त जिल्ह्यातल्या पेडगांव इथं मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात सत्तार यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला

राज्याचे शासन विविध महत्वाकांक्षी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, अनेक अशा माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्याची राज्य शासनाचा प्रयत्न आहे.

****

नांदेड इथं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यानिमित्त जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. राज्यशासन अनेक सामाजिक लाभाच्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगाराच्या क्षेत्रातील संपन्न राज्याकडं वाटचाल करत असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं.

लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.

****

धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सावंत यांनी हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

****

दहा दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. ठिकठिकाणी दुपारपर्यंत घरगुती गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं. दुपारनंतर आता सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला आहे.

पुण्यात मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. मुंबईत लालबागचा राजा आणि इतर सर्वच मोठ्या मंडळांच्या गणपती मिरवणुका विसर्जनासाठी समुद्राकडे मार्गक्रमण करत आहेत. महापालिकेनं गणेश मूर्ती विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलावही तयार केले आहेत.

 

छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीपाठोपाठ शहरातल्या मोठ्या गणपतींनी विसर्जनासाठी प्रस्थान ठेवलं आहे. शहरात आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत लहान मोठ्या वाहनांवर आरूढ होऊन आलेल्या गणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप दिला जात आहे. निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून अर्धा किलो सेंद्रीय खताचं पाकीट भेट म्हणून दिलं जाणार आहे. नांदेड, जालना, बीड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात श्री गणेश विसर्जन सोहळा उत्साहात सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात आज सुमारे एक हजार गणेश मूर्तींचे विसर्जन होत आहे.

****

श्रोते हो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत. अमेरिकेत वॉशिंग्टन प्रांतात रेडमण्ड इथं वॉशिंग्टनच्या राजाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गेली दहा वर्ष तिथं राहणारे निशांत बिंदू यांनी याबाबत अधिक माहिती दिली

लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांनीच ही मूर्ती घडवली आणि ती मूर्ती समुद्रामार्गाने अमेरिकेत आणण्यात आली असं आम्हाला सांगण्यात आलं. अतिशय सुंदर आणि भव्य अशा या मूर्तीची रेडमंड इथं अतिशय उत्साहात स्थापना करण्यात आली. शेकडोंच्या संख्येने पारंपारिक वेशभूषेत भारतीय अतिशय उत्साहात आरती केली याचं सुंदर दृश्य मी पाहिलं. ढोल ताशांच्या गजरात, लेझीम, फुगड्या असे पारंपारिक कलाप्रकारही इथं सादर करण्यात आले. या अतिशय भव्य उत्सवात सामील होताना आपला भारत देश इथंही आपल्यात वसत असल्याची भावना निर्माण झाली.

****

आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी यांची दिल्ली विधानसभेत पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दोन दिवसांपूर्वी जामिनावर सुटका झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार त्यांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना भेटून राजीनामा सादर केला.

****

आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला आहे. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या आज दुपारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारतानं चीनचा एक शून्य असा पराभव केला. जुगराजसिंह याने या सामन्यातला एकमेव गोल करत, भारताला विजय मिळवून दिला. भारतानं हे अजिंक्यपद सलग दुसऱ्या वर्षी तर एकूण पाचव्या वेळेस जिंकलं आहे.

****

हिंगोली जिल्हा दिव्यांगमुक्त करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देशातील आकांक्षित तालुके अंतर्गत अपंगांना साहित्य वाटप केलं जात आहे, या अंतर्गत आज हिंगोली इथं झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी गोयल बोलत होते.

****

अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल येत्या चार दिवसांत शासनाकडं सादर करण्याच्या सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं नुकसानीबाबत आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला निश्चितपणे जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असं ते यावेळी म्हणाले.

****

 

नांदेड इथं आज स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती नीति सरकार यांनी गोदावरी बाग-क्रिकेट स्टेडियम, रेल्वे विभागीय कार्यालय इथं रेल्वे अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सामूहिक वृक्षारोपण करण्यात आलं.

****

गुंटूर औरंगाबाद एक्सप्रेस ही गाडी उद्यापासून २१ सप्टेंबरपर्यंत तर औरंगाबाद गुंटूर ही गाडी परवा १९ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गुंटूर विभागातील गिद्दलूर आणि दिगऊमेटा दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment