Wednesday, 18 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 18 September 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १८ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून सुरुवात

·      पर्यावरण रक्षणासाठी राज्याच्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल, मुख्यमंत्र्यांचा वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमकडून आज सन्मान

·      मराठवाड्याच्या विकासाची २९ हजार कोटी रुपयांची कामं पूर्णत्वाकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन

·      दहा दिवसीय गणेशोत्वाची सांगता, धुळे-नाशिक इथं दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू

आणि

·      आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताला पाचवं अजिंक्यपद

 

सविस्तर बातम्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. एनपीएस वात्सल्य च्या नवी दिल्ली येथील उद्‌घाटन सोहोळ्याअंतर्गत देशभरात जवळपास 75 ठिकाणी एकाच वेळी असा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही ठिकाणे सहभागी होतील आणि त्या ठिकाणी नवीन अल्पवयीन सदस्यांची पीआरएएन कार्ड देऊन नोंदणी केली जाईल.

****

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमच्या वीस देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

****

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन काल सर्वत्र साजरा झाला. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. निजाम आणि रझाकारांच्या अत्याचारांवर मात करत, एकजुटीनं लढलेल्या मराठवाड्यातील जनतेच्या संघर्षाचं स्मरण करत असल्याचं शाह यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम काल दिवसभर पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मराठवाड्याच्या विकासाची २९ हजार कोटी रुपयांची कामं पूर्णत्वाकडे चालली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले...

गेल्या वर्षी आम्ही राज्य मंत्रीमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरला घेतली. आणि ४५ हजार कोटी पेक्षा जास्त काम आणि प्रकल्प सुरू केले. १६ सष्टेंबर २०२३ ला २९ निर्णय व २६ घोषणा करण्यात आल्या. यापैकी २९ हजार कोटीची कामे पूर्णत्वाकडे चालली आहेत. उरर्वरित काम प्रगती पथावर आहेत. हे फक्त कागदावर ठेवलेल नाही, तर यांची अंमल बजावणी सुरू झाली आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विकासकामांच्या दाव्याला विधान परिषदेतले विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आव्हान दिलं आहे. पूर्ण झालेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर करावी असं, दानवे यांनी म्हटलं आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाची गती पाहता, पुढील १० वर्ष मराठवाड्याला पाणी देण्याचा सरकारचा मनोदय दिसत नसल्याची, गंभीर टीका दानवे यांनी केली.

****

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध विकासयोजनांच्या कामांचं भूमिपूजन केलं. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय- घाटीतील सुपर स्पेशालिटी विभागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करुन डॉक्टरांशी संवाद साधला. निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक सोयीसुविधा उभारणीसाठी पुरेसा निधी दिला जाईल,  सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 'चिठ्ठीमुक्त घाटी' या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी  रुग्णालय प्रशासनाचं कौतुक केलं.

****

जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पालकमंत्री सावे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.

****

बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.  हुतात्मा चौक इथंल्या स्मारकास २१ तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी केलेल्या भाषणात शेतकरी आणि नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुंडे यांनी नमूद केलं.

****

परभणी, हिंगोली,नांदेड, धाराशिव आणि लातूर इथं शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं..

****


केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या स्‍वच्‍छता ही सेवा पंधरवड्याला कालपासून प्रारंभ झाला. नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या प्रांगणात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते या मोहिमेचं काल उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. गावात स्वच्छता राखण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून, येत्या पंधरवड्यात या मोहिमेला गती देण्यासाठी गाव स्तरावर स्‍वच्‍छता विषयक विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्‍यात आलं आहे.

****

दहा दिवसीय गणेशोत्सवाची काल सांगता झाली. ठिकठिकाणी दुपारपर्यंत घरगुती गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं. दुपारनंतर सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला.

छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीपाठोपाठ शहरातल्या मोठ्या गणपतींनी विसर्जनासाठी प्रस्थान ठेवलं. शहरात आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं दिसून आलं. ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत लहान मोठ्या वाहनांवर आरूढ होऊन आलेल्या गणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

नांदेड, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात श्री गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. 

****

श्रोते हो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत. अमेरिकेत वॉशिंग्टन प्रांतात रेडमण्ड इथं वॉशिंग्टनच्या राजाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गेली दहा वर्ष तिथं राहणारे निशांत बिंदू यांनी याबाबत अधिक माहिती दिली...

 

लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांनीच ही मूर्ती घडवली आणि ती मूर्ती समुद्रामार्गाने अमेरिकेत आणण्यात आली असं आम्हाला सांगण्यात आलं. अतिशय सुंदर आणि भव्य अशा या मूर्तीची रेडमंड इथं अतिशय उत्साहात स्थापना करण्यात आली. शेकडोंच्या संख्येने पारंपारिक वेशभूषेत भारतीय अतिशय उत्साहात आरती केली याचं सुंदर दृश्य मी पाहिलं. ढोल ताशांच्या गजरात, लेझीम, फुगड्या असे पारंपारिक कलाप्रकारही इथं सादर करण्यात आले. या अतिशय भव्य उत्सवात सामील होताना आपला भारत देश इथंही आपल्यात वसत असल्याची भावना निर्माण झाली.

****

धुळे जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टर खाली आल्यानं तीन बालकांचा मृत्यू झाला. धुळे शहराजवळ असलेल्या चितोड गावात ही घटना घडली. इतर सहा जण या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

नाशिकजवळील पाथर्डी इथंही नदीमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला तर अन्य एका घटनेत चुंचाळे गावाजवळ एक जण डोहात बुडाला असून त्याचा शोध सुरु असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.

****

आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला आहे. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या काल दुपारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारतानं चीनचा एक शून्य असा पराभव केला. जुगराजसिंह याने या सामन्यातला एकमेव गोल करत, भारताला विजय मिळवून दिला. भारतानं हे अजिंक्यपद सलग दुसऱ्या वर्षी तर एकूण पाचव्या वेळेस जिंकलं आहे.

****

हिंगोली जिल्हा दिव्यांगमुक्त करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देशातील आकांक्षित तालुक्यात दिव्यांगांना साहित्य वाटप केलं जात आहे, या अंतर्गत काल हिंगोली इथं झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी गोयल बोलत होते.

****

अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा अहवाल येत्या चार दिवसांत शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीबाबत आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला निश्चितपणे जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असं ते यावेळी म्हणाले.

****


नांदेड इथं काल स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांनी  गोदावरी बाग-क्रिकेट स्टेडियम, रेल्वे विभागीय कार्यालय  इथं रेल्वे अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सामुहिक वृक्षारोपण करण्यात आलं.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या तेर इथल्या त्रिविक्रम मंदिराच्या जीर्णोद्धार कामाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल पाहणी केली. आपण सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कामासाठी दोन कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकला, अशी माहिती पाटील यांनी  दिली.

****

 

No comments:

Post a Comment