Saturday, 21 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 21 September 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २१ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार-पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      राज्य सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

·      जालना जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा प्रवासी ठार-२३ जखमी

·      नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

आणि

·      बांगलादेश विरूद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला ३०८ धावांची आघाडी

 

सविस्तर बातम्या

पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त काल वर्धा इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या कार्यक्रमासाठी वर्ध्याच्या पवित्र धरतीची निवड केल्याचं सांगत, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं स्मरण केलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री जयंत चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना ही फक्त सरकारी योजना नसून, विकसित भारतासाठीचा रोडमॅप असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले...

विश्वकर्मा योजना केवल सरकारी प्रोग्रामभर नही है। ये योजना भारत के हजारो वर्ष पुराने कौशल को विकसित भारत के लिये इस्तमाल करने का एक रोड मॅप है। आप याद करीयें हमें इतिहास में भारत की समृद्धी के कितने ही गौरवशाली अध्याय देखने को मिलते है। इस समृध्दी का बडा आधार क्या था? इसका आधार था हमारा पारंपारिक कौशल।

विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना, ओळखपत्रं आणि प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसंच या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात आलं. ७५ हजार विश्वकर्म्यांना यावेळी कर्ज मंजूर करण्यात आलं, यापैकी देशभरातून आलेल्या १८ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्जाचे धनादेश पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या सर्व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराची प्रतिकृती देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. अमरावती इथं, पीएम मित्रपार्क या समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. या ठिकाणी भरवलेल्या प्रदर्शनात विविध कारागीरांच्या कक्षांना भेट देऊन, त्यांनी घडवलेल्या वस्तूंची पंतप्रधानांनी पाहणी केली. हे प्रदर्शन आज आणि उद्या सर्वांसाठी खुलं आहे.

****

महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचं तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते काल करण्यात आलं. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३, नांदेड २८, लातूर १९, धाराशिव १८ तर परभणी जिल्ह्यातल्या १४ केंद्रांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात, नांदेड इथं महात्मा गांधी मिशनचं अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी जिल्ह्यात धर्मापुरी इथं ब्लेसिंग कॉलेज ऑफ नर्सिंग, तर धाराशिव इथं बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. 

****

तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्या प्रकरणी केंद्र सरकारने आंध्रप्रदेश सरकारकडून तत्काळ अहवाल मागवला आहे. या लाडूंसाठी वापरण्यात आलेल्या तुपात प्राण्यांच्या चरबीचे अंश आढळल्याचं, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान, तिरुपती तिरुमला देवस्थाननं संबंधित पुरवठादाराचं कंत्राट रद्द केलं असून, त्याला काळ्या यादीत टाकलं आहे.

****

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

****

जालना जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जणांचा मृत्यू झाला. जालना-वडीगोद्री महामार्गावर काल सकाळी ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये बसच्या वाहकासह तीन महिला प्रवासी आणि ट्रकमधील चालक आणि त्याच्या सहायकाचा समावेश आहे. अपघातात बसमधील २३ प्रवासी जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

****

नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

****

भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. काल सकाळी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला, रविचंद्रन अश्विनने ११३ धावा केल्या.बांगलादेशचा संघही पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, भारतानं दुसऱ्या डावात २३ षटकांत ३ गडी बाद ८१ धावा केल्या आहेत.

****

धनगर आरक्षण प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या सुधाकर शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत ही माहिती दिली.सकल धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काल त्यांची नियमीत तपासणी केली, परंतू उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला.

दरम्यान ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्री इथे कालपासून आमरण उपोषण सुरू केलं, याच मागणीसाठी विधिज्ञ मंगेश ससाणे आणि सहकाऱ्यांनी १८ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी इथेच आमरण उपोषण पुकारलं आहे.

****

स्वच्छता ही सेवा या मोहिमंअंतर्गत नांदेड महानगरपालिकेतर्फे काल रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी लोकसहभागातून सुमारे तीन टन कचरा संकलित करण्यात आला. दरम्यान, रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांच्या हस्ते काल एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.

****


लातूर महानगरपालिकेनं नागरिकांसाठी दंतोपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुण्याच्या माईर्स इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च आणि महापालिकेचा आरोग्य विभाग यांच्यात यासाठीचा सांमजस्य करार करण्यात आला. येत्या सोमवारपासून महापालिकेच्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यल्प दरात दंतोपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत.

****

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त परभणी जिल्ह्यात काल विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. ईदच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन असल्यामुळे या मिरवणुका काल काढण्यात आल्या. ईदगाह मैदानावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

****

धाराशिव जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामांसाठी २८ कोटी रुपये निधी द्यावा, अशी मागणी, छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी राज्याच्या क्रीडामंत्र्यांकडे सादर केलं आहे.

****

आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं विविध पथकांची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काल सर्व पथक प्रमुखांची आढावा बैठक घेऊन समन्वयानं काम करण्याचे निर्देश दिले

****

रेल्वे लाईन च्या देखभाल आणि दुरुस्ती च्या कामांमुळे नांदेड ते रायचूर एक्सप्रेस येत्या १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत  तांडूर ते रायचूर दरम्यान अंशतः  रद्द करण्यात आली आहे तर  रायचूर ते नांदेड एक्सप्रेस २ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत रायचूर ते तांडूर दरम्यान अंशतः  रद्द करण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment