Wednesday, 2 October 2024

TEXT- आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.

                                                        आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, पंतप्रधानांच्या हस्ते नऊ हजार ६०० कोटी रुपये खर्चाच्या विविध योजनांचं उद्घाटन

·      पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला एक हजार ४९२ कोटी रुपयांचा निधी

·      लाडकी बहिण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन, लाभार्थी महिलांच्या खात्यातून विधि सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकावर कारवाईचा सरकारचा इशारा

·      एसटी महामंडळाच्या ३४३ बस स्थानकांवरआनंद आरोग्य केंद्र’, महिला बचतगटांना उपलब्ध होणार स्टॉल्स

आणि

·      कानपूर कसोटी जिंकत भारताचा बांगलादेशविरुद्ध दोन - शून्य असा मालिकाविजय 

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी महात्मा गांधीजींचं समाधीस्थळ राजघाट इथं सर्व धर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजघाट इथं महात्मा गांधीजींना अभिवादन केलं.

१७ सप्टेंबरपासून देशभर राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाचाही आज समारोप होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत स्वच्छ भारत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते नऊ हजार ६०० कोटी रुपये किमतीच्या स्वच्छतेशी संबंधित अनेक योजनांचं उद्घाटन होणार आहे.

****

पूरग्रस्त १४ राज्यांना पाच हजार ८५८ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारनं जारी केला आहे. त्यापैकी सर्वाधिक हिस्सा महाराष्ट्राला एक हजार ४९२ कोटी रुपये मिळणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळं या राज्यांमध्ये नुकसान झालं होतं. यावर्षी आतापर्यंत २१ राज्यांना एकूण १४ हजार ९५८ कोटी रुपयांचा निधी वितरीत झाला आहे.

****

लाडकी बहीण योजनेत महिलांना दिल्या जात असलेल्या रकमेमुळे राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते काल सांगली इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचं स्वप्न लाडक्या बहिणी पूर्ण करतील, आणि त्यांना लखपती केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यातून विधि सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकावर कारवाईचा इशारा, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे.

****

एसटी महामंडळाच्या ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ हे दवाखाने सुरू होणार आहेत. याठिकाणी सर्व नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यासह कमी दरात विविध चाचण्या आणि औषधं मिळणार आहेत. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय प्रत्येक स्थानकावर महिला बचत गटांना नाममात्र दरात दुकानं उपलब्ध करून देणं, नवीन अडीच हजार बसची खरेदी, १०० डिझेल बसचं इलेक्ट्रिक बसमध्ये रुपांतर तसंच मुंबई-पुणे मार्गावरच्या ईलेक्ट्रिक शिवनेरीमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी शिवनेरी सुंदरी नेमण्याचा निर्णयही महामंडळानं घेतला आहे.

****

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत येईल, असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. मुंबईत काल भाजपा कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं. प्रदेश भाजपा निवडणुकीसाठी जी योजना बनवेल ती योग्यरितीनं कार्यान्वित करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत शाह यांची चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

****

जालना तसंच बुलडाण्यासह राज्यातल्या नव्यानं मान्यताप्राप्त आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये याच शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचं, केंद्रीय आरोग्य तसंच आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. ते काल बुलडाणा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. खामगाव - जालना रेल्वे मार्गाला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, असं जाधव यांनी सांगितलं. मलकापूर-सिल्लोड-छत्रपती संभाजीनगर या नवीन प्रस्तावित रेल्वे मार्गाची मागणी आल्यास, त्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

****

कानपूर क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशावर सात गडी राखून विजय मिळवत दोन सामन्यांची ही मालिका दोन शून्यने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटीत काल अखेरच्या दिवशी भारताला सामना जिंकण्यासाठी ९५ धावांची आवश्यकता होती. भारतीय संघानं सतरा षटकं आणि दोन चेंडूत तीन गडी गमावत ९८ धावा केल्या. रविचंद्रन अश्विन मालिकावीर तर यशस्वी जैस्वाल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. रवींद्र जडेजाने या सामन्यात तीन हजार धावा आणि तीनशे बळींचा टप्पा पार केला. सर्वात कमी म्हणजे ७४ कसोटी सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा जडेजा हा इंग्लंडच्या इयान बोथम याच्यानंतर दुसरा खेळाडू ठरला आहे.

****

 

लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात तिरू नदीवर उभारण्यात आलेल्या सात बंधाऱ्याचं काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. तिरू नदीवर बेलसांगवी, बोरगाव, तिरुका, सुल्लाळी, गव्हाण याठिकाणी प्रत्येकी एक आणि डोंगरगाव इथल्या दोन बंधाऱ्यांची साखळी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे ४९६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. जळकोट इथं उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारत, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय तसंच शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. 

****

जालना इथं काल जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती - दिशा चे अध्यक्ष तथा खासदार डॉ.कल्याण काळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. विविध योजनेंतर्गत मंजूर असणाऱ्या लोकहितांच्या विकास कामांची सत्यता तपासून पाहा, तसंच ती कामं कोणाच्याही दबावाला बळी न पडता समन्वय ठेवून तत्परतेने पार पाडा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

नांदेड जिल्ह्यात एक ते तीन सप्टेंबर या कालावधीत ६२ मंडळात झालेल्या अतिवृष्टीने पाच लाख ९६ हजार ५१७ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून, शेतकऱ्यांना अनुदान वाटपासाठी ८१२ कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.

****

नवरात्रोत्सव उद्यापासून सुरु होत आहे. अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवीच्या मंदीरात उद्या सकाळी दहा वाजता तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापनेनं या उत्सवाला प्रारंभ होईल. मंदिर परिसरात सलग नऊ दिवस भजन, कीर्तन, प्रवचन तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

नांदेडलगतच्या वाडी ग्राम पंचायतच्या सरपंच पुजा हणवंते आणि सदस्य शितल पावडे यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना पुढील कालावधीसाठी अपात्र ठरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. जानेवारी २०२१ मध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत नऊ जुलै २०२४ रोजी संपली आहे.

****

मजूर महिलेकडून २५ दिवसांचे खाडे न टाकण्यासाठी दोन हजार रुपये लाच घेणाऱ्या नांदेड महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

धाराशिव इथल्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातला मुख्य लिपिक दयानंद चव्हाण याला २५ हजाराची लाच घेताना काल अटक करण्यात आली. कळंब इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरक्षा रक्षक नेमण्याची मंजुरी मिळण्याकरता सभापतीच्या सहीने दाखल केलेला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.

****

हवामान

येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment