Tuesday, 1 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 October 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा सुमारे २५८ मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९९४ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा या कालावधीत एक हजार २५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी पाऊस अद्यापही देशातून परतलेला नाही. येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या ४० जागांसाठी आज मतदान होत आहे. ३९ लाखांहून अधिक मतदार ४१५ उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत. या राज्यात तिन्ही टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या आठ तारखेला होणार आहे.

****

भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात अठ्ठेचाळीस रूपये पन्नास पैसे इतकी वाढ केली आहे. या सिलिंडरची किंमत आता एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे इतकी झाली आहे. तर पाच किलो एलपीजी सिलिंडरच्या दरातही १२ रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून हे दर लागू होत आहेत. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

****

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावानं निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. पेनाची निब हे या पक्षाचे चिन्ह असणार आहे.

****

प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्री अचानक पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्यांना चेन्नईतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

प्रसिद्ध अभिनेते तथा माजी खासदार गोविंदा हे रिव्हॉल्वरची गोळी लागून जखमी झाले आहेत. आज पहाटे मुंबईत राहत्या घरी ही घटना घडली. रिव्हॉल्वर हातातून निसटून खाली पडल्याने, त्यातून गोळी सुटली, ही गोळी गोविंदा यांच्या पायात लागल्यानं, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून गोळी काढली असून, गोविंदा यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.  

****

लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात तिरू नदीवर उभारण्यात आलेल्या सात बंधाऱ्यांचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या बंधाऱ्यांमुळे सुमारे ४९६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा निर्माण होऊन भूजल पातळीत वाढ होत असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं. याचबरोबर जळकोट इथंल्या नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीचं लोकार्पणही पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी काल नांदेड इथं महाराष्ट्रातल्या खासदारांशी सवांद साधला. मुंबई -जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत सुरू करावी, त्यासोबतच नांदेड - हैदराबाद या मार्गावर नवी वंदे भारत रेल्वे सुरू करावी अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. विभागांतर्गत गेल्या पाच वर्षात १ हजार १६६ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, २६ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. नांदेड - बीदर, नांदेड - लातूर आणि बोधन - लातूर या मार्गाचे सर्व्हेक्षण सुरू असल्याचंही जैन यांनी सांगितलं.

****

उद्या गांधी जयंतीला नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या गावात स्वच्छ भारत दिवस साजरा केला जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी ही माहिती दिली. गावस्‍तरावर घेण्‍यात आलेल्‍या स्‍वच्‍छ माझे अंगण स्‍पर्धेतल्या पात्र कुटुंबांचा उद्या सन्‍मान करण्‍यात येणार आहे.

****

यवतमाळ जिल्ह्यात उद्यापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून घरकुल तेथे शोषखड्डा हे अभियान राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी वैयक्तिक शोषखड्डा अभियानाचा लाभ घेऊन आपलं गाव जलयुक्त, आरोग्यदायी करावं, त्याकरता प्रती वैयक्तिक शोषखड्डा ३ हजार ३९२ रुपये इतका निधी मिळणार आहे.

****

अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता दौड, परिसर स्वच्छता, स्वच्छता रॅली यांसारखे विविध उपक्रम राबवले जात आहेत. मोर्शी नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये काल संस्कार स्वच्छता या संकल्पनेवर भिंती रंगवण्याची स्पर्धा घेण्यात आली. यासह शाळेत, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं.

****

कानपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला सामना जिंकण्यासाठी ९५ धावांची आवश्यकता आहे. आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी बांग्लादेशचा दुसरा डाव १४६ धावांवर संपुष्टात आला.

****

No comments:

Post a Comment