Tuesday, 1 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 October 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      केंद्र सरकारच्या सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्याचा ११३ कोटी ९० लाख रुपये निधी वितरित

·      लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन 

·      जालना तसंच बुलडाण्यासह राज्यात नव्यानं मान्यताप्राप्त आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये याच शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू होणार

आणि

·      कानपूर क्रिकेट कसोटीत बांगलादेशला पराभूत करत दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा निर्भेळ विजय

****

केंद्र सरकारच्या प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये जवळपास ३२ लाख हेक्टर क्षेत्राला लाभ देण्यात आला आहे. तसंच या योजनेचा २०२४-२५ यावर्षातील पहिल्या हप्त्याचा ११३ कोटी ९० लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के तर इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देण्यात येतं.

****

दरम्यान, सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत गेल्या खरीप हंगाम झालेल्या नुकसान भरपाई पोटी राज्यातल्या सहा जिल्ह्यांना एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची उर्वरित रक्कम लवकरच वितरीत करण्यात येणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर या सहा जिल्ह्यांचा यात समावेश आहे. याआधी विमा कंपनी मार्फत पाच हजार ४६९ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

****

ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते आज मुंबई, ठाणे आणि कोकण विभागातले भाजप आमदार, खासदार तसंच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत शाह यांची बैठक होणार आहे.

****

लाडकी बहीण योजनेत महिलांना दिल्या जात असलेल्या रकमेमुळे राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज सांगली इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी केलेल्या योजनांचा आढावा घेताना, मुख्यमंत्र्यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचं स्वप्न लाडक्या बहिणी पूर्ण करतील, आणि त्यांना लखपती केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले

एक माझी लाडकी बहीण आली होती गणपतीत. खास सांगायला तिनं गणपतीमध्ये आरतीला घुंगरू लागतात ते घेतले दीड हजार रूपयांमध्ये आणि दहा हजारांत विकले. माझ्या लाडक्या बहिणी अर्थव्यवस्था कशी वाढवतात, हेच पैसे मार्केटमध्ये येणार. अर्थव्यवस्था मोठी होणार. आणि याचा फायदा राज्याला आणि देशाला होणार. मोदी साहेबांचं पाच ट्रीलियन डॉलर्सचं स्वप्न आपल्या राज्याचं वन ट्रीलियन डॉलर्सचं स्वप्न माझ्या लाडक्या बहिणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. फक्त दीड हजार, अकरा हजारांवर आम्ही थांबत नाही. माझ्‍या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही.

****

माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यातून विधि सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकावर कारवाईचा इशारा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे. या योजनेसंदर्भात आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी तटकरे बोलत होत्या. बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात अंगणवाडी सेविका तसंच मदतनीस यांच्या मदतीने ७ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवण्याची सूचनाही तटकरे यांनी केली.

****

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातल्या विमानतळांच्या विकासकामांसंदर्भात बैठक घेतली. यात त्यांनी नागपूर विमानतळ अद्यावतीकरण सवलत करारावर स्वाक्षरी केली. शिर्डी विमानतळ अद्यावतीकरण, अमरावती विमानतळ टर्मिनलच्या उद्‌घाटनाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

****

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. रुग्णालयाच्या अधिष्ठातांची बदली तसंच याबाबत विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश त्यांनी दिले. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी दिल्या.

****

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वाडीबंदर इथं रेल्वेच्या प्रशिक्षण आगाराची पाहणी केली. प्रवाशांची सुरक्षा, स्वच्छता आणि सेवा यावर भर देत आगारातील पायाभूत सुविधा, तांत्रिक प्रगती आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेतला. वंदे भारत एक्स्प्रेसच्या १४ मिनिटांत साफसफाई करणाऱ्या अद्ययावत स्वच्छता उपकरणांचं त्यांनी निरीक्षण केलं. प्रवाशांच्या तक्रार निवारण विभागाशीही रेल्वेमंत्र्यांनी संवाद साधला.

****

जालना तसंच बुलडाण्यासह राज्यातल्या नव्यानं मान्यताप्राप्त आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये याच शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचं, केंद्रीय आरोग्य तसंच आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं आहे. ते आज बुलडाणा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभरात वैद्यकीय अभ्यासक्रमात पदव्युत्तरच्या जागांमध्ये गेल्या दहा वर्षात सुमारे ६० हजार ८०० जागा वाढल्या असल्याचं जाधव यांनी सांगितलं. खामगाव जालना रेल्वे मार्गाची संचिका सध्या नीती आयोगाच्या मंजुरीसाठी गेलेली असून लवकरच या मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, असं जाधव यांनी सांगितलं. मलकापूर-सिल्लोड-छत्रपती संभाजीनगर या नवीन प्रस्तावित रेल्वे मार्गाची मागणी आल्यास, त्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्याचं आश्वासजाधव यांनी दिलं.

****

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावानं भारतीय निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. पेनाची निब हे या पक्षाचे चिन्ह असणार आहे. आगामी निवडणुकीत ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावानं निवडणूक लढवणार असल्याचं संभाजी राजे यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात तिरू नदीवर उभारण्यात आलेल्या सात बंधाऱ्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं. तिरू नदीवर बेलसांगवी, बोरगाव, तिरुका, सुल्लाळी, गव्हाण याठिकाणी प्रत्येकी एक आणि डोंगरगाव इथल्या दोन बंधाऱ्यांची साखळी तयार करण्यात आली असून २ पूर्णांक २४ दश लक्ष घन मीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे सुमारे ४९६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा निर्माण होऊन भूजल पातळीत वाढ होत असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान पवार यांच्या जनसन्मान यात्रेचं आज परळी इथं आगमन झालं, यात्रेदरम्यान पवार यांनी जनतेला संबोधित करत, सरकारच्या योजनांची माहिती दिली.

****

कानपूर क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशावर सात गडी राखून विजय मिळवत दोन सामन्यांची ही मालिका दोन शून्यने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटीत आज अखेरच्या दिवशी भारताला सामना जिंकण्यासाठी ९५ धावांची आवश्यकता होती. भारतीय संघानं सतरा षटकं आणि दोन चेंडूत तीन गडी गमावत ९८ धावा केल्या. रवींद्र जडेजाने या सामन्यात तीन हजार धावा आणि तीनशे बळींचा टप्पा पार केला. सर्वात कमी म्हणजेच ७४ कसोटी सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा जडेजा हा इंग्लंडच्या इयान बोथम याच्यानंतर दुसरा खेळाडू ठरला आहे. रविचंद्रन अश्विन मालिकावीर तर यशस्वी जैस्वाल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत आज आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रात सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शंभर टक्के सफाई कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला.

****

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण माह निमित्त कुपोषण वाढ नियंत्रण, पूरक आहार, पोषण भी पढाई भी आदी उपक्रम राबवण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी ही माहिती दिली. नो शुगर ओन्ली प्रोटीनया संकल्पनेवर चर्चासत्र, आहार आणि पाककृतींचं सादरीकरण करण्यात आलं.

****

अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव परवापासून सुरू होत आहे. परवा तीन तारखेला सकाळी दहा वाजता तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापनेनं या उत्सवाला प्रारंभ होईल. मंदिर परिसरात सलग नऊ दिवस भजन, कीर्तन, प्रवचन तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे आणि सचिव अशोक लोमटे यांनी ही माहिती दिली. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रथमोपचार तसंच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

****

मजूर महिलेकडून २५ दिवसांचे खाडे न टाकण्यासाठी दोन हजार रुपये लाच घेणाऱ्या नांदेड महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्याच्याविरुद्ध विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment