Wednesday, 23 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.10.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 October 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड असू शकत नाहीत-ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

·      विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

·      नामनिर्देशन प्रक्रियेत आज छत्रपती संभाजीनगर इथं चार, परभणी जिल्ह्यातून नऊ, नांदेड तसंच लातूर जिल्ह्यातून प्रत्येकी दोन, जालना जिल्ह्यातून तीन तर बीड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक अर्ज दाखल

आणि

·      दिव्यांग तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदान व्यवस्थेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू

****

दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड असू शकत नाहीत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रशियात कझान इथं सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेला पंतप्रधान मोदी यांनी आज संबोधित केलं. ब्रिक्स देशांनी एकत्र येऊन दहशतवाद आणि दहशतवादाला आर्थिक रसद पुरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

मागील दोन दशकांत ब्रिक्सनं अनेक महत्वपूर्ण लक्ष्यं गाठली असून, भविष्यातही ही संघटना जागतिक प्रश्न सोडवण्यात भरीव काम करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. युनिफाईड पेमेंट सिस्टीम अर्थात यूपीआय ही भारताची मोठी यशोगाथा असून, अनेक देशांनी या प्रणालीचा अवलंब केली आहे, याबाबतीत इच्छुक देशांना सहकार्य करायला भारत तयार असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं.

****

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात केली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगाव इथून आणि हसन मुश्रीफ यांना कागलमधून उमेदवारी दिली आहे. माजलगाव मतदारसंघातून प्रकाश सोळंके यांना, तर परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरीतून, धर्मराव आत्राम यांना अहेरीतून, राजकुमार बडोले यांना अर्जुनी मोरगावातून तर अदिती तटकरे यांना श्रीवर्धन इथून राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली आहे. उर्वरित उमेदवारांची यादी उद्या प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली.

****

विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या तीनही मोठ्या घटक पक्षांनी आपापल्या पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात असून चित्र लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शेतकरी कामगार पक्षानंही पाच जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे.

****

शिवसेना नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज येत्या सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी भरणार आहेत. खासदार नरेश म्हस्के यांनी ही माहिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पांचपाखाडी विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री शिंदे अर्ज भरणार आहेत.

****

नामनिर्देशन प्रक्रियेच्या आज दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण १७५ जणांनी ३८५ अर्ज घेतले, तर आज चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. यामध्ये औरंगाबाद पूर्व मतदार संघातून दोन तर गंगापूर मतदार संघातल्या दोन अर्जांचा समावेश आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदार संघातून तसंच नांदेड उत्तर मतदारसंघातून प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला. जिल्ह्यातल्या सर्व मतदार संघातून आज विधानसभेसाठी २७८ तर लोकसभेसाठी २८ अर्ज घेतले.

 

लातूर जिल्ह्यात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या उदगीर या विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

****

हिंगोली जिल्ह्यात ५६ इच्छुकांनी १२३ अर्जांची उचल केली आहे. तर वसमत विधानसभा मतदारसंघात जगन्नाथ लिंबाजी अडकिने यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केलं. दोन दिवसात हिंगोली जिल्ह्यात २७६ अर्जांची विक्री झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

परभणी जिल्ह्यात चार मतदार संघातून नऊ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रं आज दाखल केले. यामध्ये जिंतूर मतदार संघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्यासह पाच अपक्ष, गंगाखेडमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी, तर पाथरी मतदार संघातून दोन अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.

 

धाराशिव जिल्ह्यात आज एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केला नाही, मात्र ७६ जणांनी १७३ अर्ज खरेदी केले.

****

भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जालना जिल्ह्यात आज बदनापूर मतदार संघातून दोन अपक्ष तर घनसावंगी मतदार संघातून एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

रत्नागिरीचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेंद्र तथा बाळ माने यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीनिवासस्थानी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं.

अमरावती शहरातल्या कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी आज आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केलं.

****

श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज पालघर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.

****

भारत ब्रँड चणा डाळीची दुसऱ्या टप्प्यातली विक्री केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सुरू केली.राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- नाफेड-च्या माध्यमातून ही विक्री केली जात आहे. भारत चणा डाळ सत्तर रुपये तर हरबरा अठ्ठावन्न रुपये किलो दरानं उपलब्ध होईल, अशी माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी दिली. याशिवाय भारत मूगडाळ एकशे सात रुपये किलो आणि मसूर डाळ एकोणनव्वद रुपये किलो या दरानं मिळत आहे.

****

हॉटेल चालक जया शेट्टीच्या हत्येप्रकरणात मुंबईतल्या विशेष न्यायालयानं दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याला या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला असून, त्याच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला छोटा राजन यानं उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

****

भारत निवडणूक आयोगानं दिव्यांग तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदानाची व्यवस्था केली आहे. यासाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी बूथ स्तरावरचे अधिकारी घरोघरी पोहचणार आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या अशा व्यक्तींनी या प्रक्रियेत सहभागी व्हावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अक्षय भागवत आणि अकबर पटेल या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

निवडणूक विषयक सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून कामकाज करण्याची सूचना, हिंगोली जिल्हा निवडणूक निरीक्षक अर्जुन प्रधान यांनी केली आहे. ते आज पथक प्रमुखांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

****

नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेचे तामिळनाडू कॅडरचे अधिकारी ए. गोविंदराज आणि गुजरात कॅडरचे अधिकारी मयंक पांडे यांची नियुक्ती झाली आहे. हे दोन्ही अधिकारी नांदेड इथं दाखल झाले आहेत. गोविंद राज यांच्याकडे नायगाव, देगलूर, मुखेड आणि लोहा मतदारसंघांची तर पांडे यांच्याकडे किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या मतदारसंघांच्या निरीक्षकपदाची जबाबदारी आहे.

****

नांदेड जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचं दिसून आल्यास नागरिकांनी सी-व्हीजील अॅपवर किंवा १९५० या या नि:शुल्क क्रमांकावर तक्रार करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधाही सी-व्हीजील अॅपवर उपलब्ध असून, नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****

No comments:

Post a Comment