Thursday, 24 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.10.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 October 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला वेग-राज्यभरात अनेक दिग्गजांकडून अर्ज दाखल

·      गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

·      विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रम

आणि

·      पुणे क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या सर्वबाद २५९ धावा-वॉशिंग्टन सुंदरचे सात बळी

****

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे आणि जयकुमार रावल यांच्यासह जवळपास सर्व पक्षांच्या अनेक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.

बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ प्रीतम मुंडे यावेळी उपस्थित होत्या.

हिंगोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी दोन उमेदवारी अर्ज तर भाऊ पाटील गोरेगावकर यांनी एक अर्ज दाखल केला. वसमत विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार श्री गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज यांनी, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. हिंगोली जिल्ह्यात आज २८ जणांनी ५८ अर्जांची उचल केली.

परभणी जिल्ह्यात पाथरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निर्मला विटेकर यांचा अर्ज त्यांचे पुत्र आमदार राजेश विटेकर यांनी दाखल केला.

जालना विधानसभा मतदार संघासाठी आज महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, त्यांच्या पत्नी संगीता कैलास गोरंट्याल, तर भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जालना विधासनभेसाठी ११ उमेदवारांसाठी २१ नामनिर्देशन पत्राची उचल झाली. घनसावंगी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बदनापूर विधानसभा मतदार संघासाठी भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बबलू चौधरी यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद मध्य मतदार संघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अभय टाकसाळ तसंच बहुजन समाज पार्टीचे विष्णू तुकाराम वाघमारे यांनी, औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून बहुजन समाज पार्टीचे कुणाल सुरेश दांडगे यांनी, गंगापूर मतदार संघातून महायुतीकडून भाजपचे प्रशांत बंब, यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

धाराशिव जिल्ह्यात भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज दोन उमेदवारी अर्ज दाखल केले तर दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचे सुभाष गायकवाड यांनी, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, यांच्यासह बहुजन समाज पक्षाचे वतीनं दोन तर एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला.

नांदेड लोकसभा मतदारसंघात आज काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य एका इच्छुकाचा अर्ज दाखल झाला असून लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. ८ विधानसभा मतदारसंघासाठी १६ इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी १३ उमेदवारांनी २३ अर्ज घेतले आहेत.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून, तर नगर शहर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप यांनी अर्ज दाखल केला. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपकडून तर डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पारनेर विधानसभा मतदार संघातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी तर राहुरी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

****

येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, कोथरुड मधून भाजपचे चंद्रकांत पाटील, आंबेगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, शिर्डी इथून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, इंदापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज अर्ज दाखल केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आज विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंबईत मलबार हिल्स इथून भाजपचे मंगलप्रभात लोढा, तर कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर यांनी अर्ज दाखल केला. विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार पराग अळवणी यांनी, ठाणे विधानसभा मतदार संघातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार अमित साटम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय महाविकास आघाडीकडून कळवा -मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे, तर इस्लामपूर मतदातसंघातून जयंत पाटील यांनी अर्ज दाखल केला.

रायगड जिल्ह्यात अलिबाग विधानसभा मतदार संघातील शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.

 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदार संघातून भाजपचे काशिराम पावरा यांनी तर धुळे शहर विधानसभा मतदार संघातून अनुप अग्रवाल यांनी, सिंदखेडा मतदारसंघातून भाजपाचे जयकुमार रावल यांनी, साक्री विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या मंजुळा गावीत यांनी अर्ज दाखल केले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा- तळोदा मतदारसंघतून भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार, जेष्ठ नेते डॉ विजयकुमार गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड मतदार संघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आज प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. आघाडीने या मतदार संघात शिवसेनेचे विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

****

श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.

****

राज्यात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात मतदान प्रशिक्षण, मतदानाची शपथ आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक, यासोबतच सृजनशील लेखन, वक्तृत्व, रांगोळी, भित्ती चित्र स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे

बाईट - प्रशांत दामले

****

छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय महाविद्यालयात आज मतदार जनजागृती कार्यक्रम तसंच युवा संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

नांदेड विधानसभा तसंच लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हा परिषद कार्यालयात स्वीपकक्ष, उमेद आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी केली.

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पुणे इथं सुरु असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघानं सर्वबाद २५९ धावा केल्या. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रविचंद्रन अश्विनने तीन तर वॉशिंग्टन सुंदरने सात गडी बाद केले. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एक गडी गमावत १६ धावा झाल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला, यशस्वी जैस्वाल सहा आणि शुभमन गील दहा धावांवर खेळत आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज अहमदाबाद इथं सुरु आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत, ४४ षटकांत सर्वबाद २२७ धावा केल्या. भारताच्या दिप्ती शर्माने ४१ आणि मेली केर हिनं ४२ धावा केल्या.

****

No comments:

Post a Comment