Friday, 25 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.10.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 October 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      विधानसभा निवडणुकीसाठी आजही राज्यभरातून अनेक दिग्गज नेत्यांसह इच्छुक उमेदवारांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल

·      नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश-लोहा मतदार संघातून उमेदवारी जाहीर

·      देशाचे नवे सरन्यायधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती

·      आणि

·      पुणे कसोटीतही भारतीय फलंदाजांकडून निराशा-न्यूझीलंड संघाला दुसऱ्या डावात ३०१ धावांची आघाडी 

****

विधानसभा निवडणुकीसाठी आजही राज्यभरातून अनेक दिग्गज नेत्यांसह इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण- पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत जामखेड इथं महायुतीकडून भाजपचे राम शिंदे, कोपरगावचे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आशुतोष काळे, शिर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा, अकोला पूर्वचे महायुतीचे उमेदवार भाजपचे रणधीर सावरकर, वाशिमच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मेघा किरण राव डोंगरे, वांद्रे पश्चिमचे महायुतीचे उमेदवार भाजपचे आशिष शेलार, शिवडीचे मनसे उमेदवार बाळा नांदगावकर, तसंच रत्नागिरीचे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी तसंच औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे अतुल सावे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मनीषा उर्फ मंदा उत्तम खरात यांनी औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर औरंगाबाद मध्य मतदार संघातून हिंदुस्थान जनता पार्टीचे बबनगीर उत्तमगीर गोसावी यांनी अर्ज दाखल केला.

दरम्यान, एमआयएम पक्षाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून नासेर सिद्दिकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

 

जालना विधानसभा मतदार संघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी २१ उमेदवारांनी ३९ अर्जांची उचल केली. बदनापूर इथून महाविकास आघाडीचे बबलू चौधरी यांनी,  भोकरदन इथून महाविकास आघाडीचे चंद्रकांत दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. घनसावंगी मतदार संघातही आज ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

 

हिंगोली जिल्ह्यात ४५ इच्छुकांनी ९२ अर्जांची उचल केली, तर १७ जणांनी नामनिर्देशनपत्रं दाखल केली आहेत. यामध्ये कळमनुरीतून बसपाचे विजय माणिका बलखंडे, वंचित बहुजन आघाडीचे दिलीप तातेराव मस्के यांचा, तर हिंगोलीतून तान्हाजी मुटकुळे यांच्यासह आठ जणांच्या अकरा अर्जांचा समावेश आहे.

धाराशिव जिल्ह्यात आज उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात पाच तर परंडा विधानसभा मतदारसंघात चार अर्ज दाखल झाले आहेत.

****

सांगलीचे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार संजय पाटील आणि इस्लामपूरचे पदाधिकारी निशिकांत पाटील यांनी आज मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात संजय पाटील तर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात निशिकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज  भरणार आहेत.

नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सात उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर, मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दिकी, अणुशक्तीनगर मतदारसंघातून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक, इस्लामपूर मधून निशिकांत पाटील, तासगाव - कवठे महांकाळमधून संजय पाटील, वडगाव शेरी मधून सुनिल टिंगरे, तर शिरुर मतदारसंघातून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

राज्यात आचारसंहितेच्या काळात विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. धनशक्तीचा वापर करुन मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आयकर विभागही सज्ज झाला आहे. निवडणुकांच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने प्राप्तीकर विभागाने मुंबई इथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.

दरम्यान, हिंगोली शहरात बसस्थानक परिसरात आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू असताना दोन वाहनांत १ कोटी ४० लाख रूपयांची रोकड आढळून आली, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

****

श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचाहा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.

****

देशाचे नवे सरन्यायधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या अकरा नोव्हेंबरला ते पदभार स्वीकारतील. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून आज पाच नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश डी. के. उपाध्याय यांनी निवेदिता प्रकाश मेहता, प्रफुल्ल सुरेंद्रकुमार खुबालकर, अश्विन दामोदर भोबे, रोहित वासुदेव जोशी आणि अद्वैत महेंद्र सेठना यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या अतिरिक्त न्यायाधीशांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.

****

पुणे इथं सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर न्युझीलंडच्या पाच ९८ धावा झाल्या आहेत. कर्णधार टॉम लॅथन ८६ धावा काढून बाद झाला. तर वॉशिंग्टन सुंदरनं चार बळी घेतले. दरम्यान, भारतीय फलंदाजांनी आजही निराशा केली, भारताचा पहिला डाव अवघ्या १५६ धावांत संपुष्टात आला. रविंद्र जडेजानं सर्वाधिक ३८ तर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलनं प्रत्येकी तीस धावा केल्या. न्यूझीलंडच्या मिचेल सँटेनरनं सर्वाधिक सात गडी बाद केले. न्यूझीलंडनं या कसोटीत आतापर्यंत एकूण ३०१ धावांची आघाडी घेतली आहे.

****

राज्य सरकारने येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सुटी जाहीर केली आहे. सर्व खासगी तसंच औद्योगिक आस्थापनांनी या दिवशी कामगारांना पगारी सुटी जाहीर करावी, अपवादात्मक परिस्थितीत सुटी देणं शक्य नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन किमान दोन तास उशिरा येण्याची किंवा लवकर जाण्याची सवलत कर्मचाऱ्यांना द्यावी, असं यासंबंधी जारी पत्रकात म्हटलं आहे. या तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

****

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलं आहे.

बाईट - अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ

****

विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी तसंच आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याविषयी जनजागृतीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर शहर तसंच तालुक्यात केंद्रीय सशस्त्र दलाच्या जवानांसह, स्थानिक पोलीसांनी आज पथसंचलन केलं. गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आज प्रभातफेरी काढून मतदान विषयक जनजागृती केली.

****

आदर्श आचारसंहितेच्या योग्य अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने राजकीय प्रचारातील प्रत्येक इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचं पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार सर्व राजकीय जाहिरातींचं पूर्व प्रमाणीकरण करण्याचं आवाहन, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना केलं आहे. या जाहिरातींचा खर्च संबंधित पक्ष किंवा उमेदवाराच्या खर्चात धरला जातो, असं कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष नोडल अधिकारी, सचिन अडसूळ यांनी सांगितलं आहे.

****

मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी प्रशासनातर्फे वेगवेगळे प्रयोग केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरात मतदार जागृतीसाठी दयानंद महाविद्यालयात 'कॉफी विथ कलेक्टर' हा कार्यक्रम घेण्यात आला, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी या कार्यक्रमात युवकांशी संवाद साधला, जिल्हाधिकाऱ्यांनी युवावर्गाला मतदान करण्याचं तसंच इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचं आवाहन केलं.

****

No comments:

Post a Comment