Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 October 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारत आणि जर्मनीनं काल ग्रीन हायड्रोजन, तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अनेक सामंजस्य करारांवर
स्वाक्षरी केली. नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. गोपनीय
माहितीची देवाणघेवाण आणि संरक्षण याबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. इंडो-जर्मन
ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाला दिशा देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं दोन्ही देशांनी यावेळी
सांगितलं. यावेळी कौशल्य विकास, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्यासाठीदेखील
सामंजस्य करार करण्यात आले.
यावेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी रशिया-युक्रेन आणि पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर
भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसनं २३ तर शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाने १५ जणांची आपली दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या
दुसऱ्या यादीत जालना मतदारसंघातून कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व मतदारसंगातून मधुकर देशमुख, निलंगा मतदारसंघातून अभयकुमार पाटील, सावनेर मतदारसंघातून अनुजा केदार, राळेगाव मतदारसंघातून प्राध्यापक वसंत पुरके यांना उमेदवारी
देण्यात आली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दुसऱ्या यादीत हिंगोली
मतदारसंघातून रुपाली पाटील, परतूर मतदारसंघातून आसाराम बोराडे, धुळे शहर मतदारसंघातून अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली
आहे. काँग्रेसनं यापूर्वी पहिल्या यादीद्वारे ४८ उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यापुर्वी ६५ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षानं ४५ उमेदवार जाहीर केले आहेत.
****
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष
वापर किंवा प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातींसाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि
सनियंत्रण समितीची परवानगी घेणं आवश्यक आहे, असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा
माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती नेमण्यात आल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं
म्हटलं आहे. मुद्रित माध्यमांमध्ये मतदानाच्या आधीच्या तसंच मतदानाच्या दिवशी प्रकाशित
केल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींसाठीही राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ती यांनी पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे.
****
जळगाव जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा मतदारसंघांपैकी चोपडा
विधानसभा मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. जळगाव शहर मतदारसंघात
कालपर्यंत चार, रावेरमध्ये एक तर पाचोरामध्ये सर्वाधिक
सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. जिल्ह्यात कालपर्यंत एकूण ३३ जणांनी उमेदवारी अर्ज
दाखल केले आहेत.
****
परभणी,नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील ५२ महाराष्ट्र बटालियन नांदेड अंतर्गत परभणी इथं
राष्ट्रीय छात्र सेनेचं प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीरात ड्रिल, फायरींग, शस्त्र ओळख तसंच प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, गस्त घालणं, घात लावणं आदींचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शिबीरात ४६९
एन.सी.सी. कॅडेट्स सहभागी झाले असल्याची माहिती कर्नल एम. रंगा राव यांनी दिली.
****
भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान पुण्यात सुरू असलेल्या
कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी न्युझीलंडचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला. न्यूझीलंडनं पहिल्या डावातल्या १०३ धावांच्या आघाडीसह
भारताला ३५९ धावांचं विजयासाठी आव्हान दिलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या
दुसऱ्या डावात तीन गडी बाद १२७ धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव १५६
धावांमध्येच संपुष्टात आला होता.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा इथल्या पद्मश्री डॉक्टर
प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी नागपूर विभागीय शालेय
मल्लखांब आणि रोप मल्लखांब स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. खो-खो स्पर्धेतही लोकबिरादरीचा
चमू विजेता ठरला.
१४ वर्षे वयोगटातील मल्लखांब आणि रोप मल्लखांब ही स्पर्धा
चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा इथं घेण्यात आली. या स्पर्धेत लोकबिरादरी आश्रमशाळेच्या १३
खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
खो-खो ची १७ वर्षे वयोगटातील मुलींची विभागीय स्पर्धा
गडचिरोली इथं झाली. या स्पर्धेतही लोकबिरादरीच्या विद्यार्थिनींनी विजेतेपद पटकावल्याने
त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदाकिनी आमटे, अनिकेत आमटे यांनी विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
****
No comments:
Post a Comment