Saturday, 26 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.10.2024 रोजीचे सकाळी:11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 26 October 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ ऑक्टोबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेचा हा एकशे पंधरावा भाग असेल.

या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणी तसंच दूरदर्शनवर करण्यात येईल. आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्युज ऑन ए आय आर या ॲपवर देखील हा कार्यक्रम उपलब्ध असेल. पंतप्रधान कार्यालय तसंच सूचना प्रसारण मंत्रालयाच्या यु ट्युब चॅनलवर मन की बात चं थेट प्रसारण केलं जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही याचं प्रसारण केलं जाणार आहे.

****

राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ प्राद्यापिका डॉक्टर रोहिणी गोडबोले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रोहिणी गोडबोले यांनी विज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं, त्यांचं हे महत्वपूर्ण योगदान प्रशंसनीय असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर रोहिणी गोडबोले यांचं काल निधन झालं, त्या ७२ वर्षांच्या होत्या. मुळच्या पुण्याच्या रहिवासी असलेल्या डॉक्टर गोडबोले बंगळुरू इथल्या भारतीय विज्ञान संस्थेत संशोधन विभागात कार्यरत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विज्ञानजगतात महिलांचं स्थान सक्षम  करण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं, त्यांचं कार्य पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील, असं पंतप्रधान मोदी यांनी आपले शोकसंदेशात म्हटलं आहे.

****

इस्रायलने इराणच्या लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी तेहरानमध्ये अनेक मोठे स्फोट झाले आहेत. इस्त्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, इराणने एक ऑक्टोबर रोजी केलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर इराण आणि इराकने सर्व उड्डाणे स्थगित केल्याचे स्थानिक अहवालात म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणवरील हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

****

नाशिक शहर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला असला, तरी यंदा पक्षाची मदार अन्य पक्षातील नाराज आणि बंडखोरांवर आहे. यंदा नाशिक पश्चिममधून मनसेने भाजपचे बंडखोर दिनकर पाटील यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे पक्षाचे माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  दिलीप दातीर यांनी २०१९ मध्ये  शिवसेनेचा राजीनामा देऊन मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, नाशिक शहरात काँग्रेस पक्षाला एकही विधानसभा मतदार संघ सुटला नसल्याने मित्र पक्षांच्या विरोधात मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्यास संधी द्यावी, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित मेळाव्यात काल करण्यात आली.

****

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत सात इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रासाठी आतापर्यंत चार दिवसात ४४ इच्छुकांचे एकूण ५५ अर्ज दाखल झाले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी काल १८ इच्छुकांनी ३२ नामनिर्देशनपत्रं प्राप्त केली. आतापर्यंत ७४ इच्छुकांनी १३१ नामनिर्देशनपत्रांची उचल केली आहे.

****

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरात नाकाबंदी दरम्यान अमित ओमप्रकाश हेडा यांच्या वाहनात १ कोटी २६ लाख ८८ हजार ५२० रुपये तर कळमनुरी इथल्या गजानन माणिक काळे यांच्या वाहनात १३ लाख ५० हजार रुपये आढळले. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली असून यासंदर्भात तपास सुरु आहे.

****


नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यात कालही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड जिल्ह्यात काल दुपारी भूकंपसदृश्य दोन सौम्य हादरे जाणवले, मुखेड तालुक्यात अंबुलगा इथं जाणवलेल्या या हादऱ्यांची तीव्रता रिक्टर स्केलवर अनुक्रमे एक पूर्णांक पाच आणि शुन्य पूर्णांक सात अशी नोंदवण्यात आली.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात पांगरा शिंदेसह काही गावात काल रात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही.

****

कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळी निमित्त सोमवारी २८ ऑक्टोबर ते शनिवारी दोन नोव्हेंबरपर्यंत सलग सहा दिवस बंद राहणार आहे, बाजार समितीच्या प्रशासनानं यासंदर्भात कळवलं आहे. दरम्यान काल या बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल २ हजार २०२ रुपये सरासरी भाव मिळाला.

****

No comments:

Post a Comment