Wednesday, 13 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.11.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 13 November 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधल्या बारा हजार एकशे कोटी रुपयांच्या पंचवीस विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण तसंच पायाभरणी करण्यात आली. यामध्ये रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्रातल्या विविध योजनांचा समावेश आहे. दरभंगा इथल्या नियोजित, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सची कोनशीलाही पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात आली. बिहारमधल्या विविध रेल्वेस्थानकांबरोबरच देशातल्या १८ रेल्वेस्थानकांवरील जनऔषधी केंद्रांचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. आपलं सरकार जनतेच्या सेवेसाठी प्रतिबद्ध असल्याचं प्रतिपादन करत, भारत विकसित होण्याच्या दिशेनं वेगानं प्रगति करत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

****

नागरिकांची संपत्ती उध्वस्त करून त्यांच्यावरचे आरोप ठरवण्याचा अधिकार प्रशासनाला नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आरोपी व्यक्तींविरोधात होणा-या बुलडोझर कारवाईविरोधात दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की नोटिस न बजावता होणा-या अशा प्रकारच्या कार्यवाहीला मनमानीपणा समजलं जाईल. देशभरातल्या अशा प्रकारच्या संपत्तींच्या अनधिकृत विध्वंसाला रोखण्यासाठी न्यायालयानं मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

****

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा ठळक उल्लेख करण्याबाबत अजित पवार गटाला न्यायालयानं गेल्या आठवड्यात सूचना केल्या आहेत.

****

झारखंड राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २९ पूर्णांक ३१ टक्के मतदान झाल्याचं, निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

केरळमध्ये वायनाड लोकसभा मतदार संघ आणि १० राज्यातल्या विधानसभांच्या काही जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळेआधीच नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्येही विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचं मतदान सुरळीत सुरु आहे. सर्व मतदानकेंद्रावर वेबकास्टींग करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली आहे. १५ नोव्हेंबर पर्यंत गृह मतदान पथक कार्यरत राहणार आहे. ४२५ मतदार गृहमतदान सुविधेच्या माध्यमातून मतदान करणार आहेत. यात ७७ दिव्यांग आणि उर्वरीत ८५ पेक्षा जास्त वयाचे मतदार आहे.

जळगाव जिल्ह्यातही सर्व ११ मतदार संघात आज गृहमतदान सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं वेग घेतला आहे. भाजपनेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोंडाईचा इथं सभा सुरु आहे. त्यानंतर शहा यांची जळगाव आणि परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं सभा होणार आहे.

भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चंद्रपूर आणि नागपूर इथं सभा होत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भाजपनेते योगी आदित्यनाथ वाशिम आणि ठाणे इथं प्रचारसभा घेणार आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आज लातूर इथं सभा होणार आहे. तर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात सभा होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

****

रत्नागिरी जिल्ह्यात अवैध रीतीनं राहणाऱ्या तेरा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नाखरे काळाकोंड तालुक्यात चिरेखानी भागात गेल्या सहा महिन्यांपासून राहणा-या या घुसखोरांना दहशतवाद विरोधी पथकानं काल ताब्यात घेतलं. या तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या राघवपुरम ते रामगुंडम मार्गावर मालवाहू रेल्वे रुळावरुन  घसरली आहे. त्यामुळं या मार्गावरील बहुतांश रेल्वे आज रद्द करण्यात आल्या आहेत. सिकंदराबाद-तिरुपती, तिरुपती-सिकंदराबाद, अदिलाबाद-परळी, अकोला -पूर्णा, अदिलाबाद-नांदेड या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

****

पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धेच्या मुख्य फेऱ्यांना आजपासून प्रारंभ होत आहे.  यामध्ये पॅरिस पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती अवनी लेकरा हिचा दहा मीटर एअर रायफल आणि दहा मीटर मिश्र एअर रायफल या प्रकारातील खेळ पाहायला मिळणार आहे.

****

 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सेंच्युरियन इथं खेळवला जाणार आहे. मालिकेत दोन्हीही संघ एकेक सामना जिंकून बरोबरीत आहेत.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीच्या सामन्यात पी व्ही सिंधूनं राऊंड सिक्सटीमध्ये प्रवेश केला आहे. तिनं थायलंडच्या खेळाडूवर  अवघ्या 38 मिनिटांत 21-12, 21-8 असा विजय मिळवला. आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात लक्ष्य सेनचा मुकाबला मलेशियाच्या खेळाडूशी होणार आहे.

****

No comments:

Post a Comment