Regional Marathi Text
Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 November
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ नोव्हेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या १०५ हुतात्म्यांना आज अभिवादन
· विधानसभा निवडणूक प्रक्रियेत परवा मतमोजणी-छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज
· सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी पासून सुरु होणार
आणि
· जागतिक वारसा स्थळांचं संवर्धन आणि मार्केटिंगकडे सरकारने लक्ष देण्याची गरज पद्मश्री
के के मोहम्मद यांच्याकडून व्यक्त
****
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य
पत्करलेल्या १०५ हुतात्म्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी आज मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी
मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित
होते.
राष्ट्रवादी शरद्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार यांनीही हुताम्यांना आदरांजली वाहिली आहे. आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमधून
त्यांनी सर्व हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करत
असल्याचं म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा
निवडणूक विभाग परवा होणाऱ्या मतमोजणीसाठी सज्ज झाला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. सर्व नऊ मतदार संघात २०८ टेबलद्वारे
मतमोजणी होणार आहे,
यासाठी नियुक्त ८५२ कर्मचाऱ्यांना उद्या प्रशिक्षण दिलं जाणार
आहे. मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी तीन हजाराहून पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात केल्याची
माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
वोटींग मशिन्सच्या मोजणीसाठी
१२६ टेबल, पोस्टल बॅलटच्या मोजणीसाठी ७० टेबल आणि एटीबीपीएस च्या मोजणीसाठी १२ टेबल्स
असे एकूण २०८ टेबल्स पूर्ण नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये लावलेत. यासाठी ८५२ काऊंटींग
स्टाफ आपण डिप्लॉय केलेला आहे. मायक्रो ऑब्जरवर २४२ लावलेले आहेत. आणि या मतमोजणी केंद्राच्या
सुरक्षिततेसाठी जवळजवळ तीन हजार पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्या ठिकाणी
राहणार आहेत. एकंदरीतच पूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जो मॅन पावर आपण लावलेला आहे,
एकूण ५७७८ इतका मॅन पावर काऊंटींगच्या कामासाठी लावलेला आहे.
दरम्यान, विधानसभेसाठी काल झालेल्या
मतदानाची अंतिम आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६९ पूर्णांक
६४ टक्के मतदान झालं. जिल्ह्यात सिल्लोड मतदार संघात सर्वाधिक ८० टक्के मतदानाची नोंद
झाली. त्या खालोखाल पैठणला ७७ पूर्णांक ५३ टक्के, वैजापूर सुमारे ७६ टक्के, गंगापूर
७४ टक्के, फुलंब्री ७२ टक्के,
कन्नड ६९ टक्के तर औरंगाबाद मध्य, पूर्व
आणि पश्चिम मतदार संघात प्रत्येकी सुमारे ६० टक्के मतदानाची नोंद झाली.
गेल्या विधानसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या
तुलनेने ही टक्केवारी पाच टक्क्यांने वाढली आहे. मतदानाच्या दिवशी आठ हजार ३२४ मतदारांनी
तसेच एक हजार १५५ अधिकारी कर्मचारी यांनी मतदान केंद्रावर उभारण्यात आलेल्या आरोग्य
सेवेचा लाभ घेतला आहे.
****
जालना जिल्ह्यात एकूण ७२ पुर्णांक ६७ टक्के
मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ७७ पुर्णांक ३६ टक्के मतदान भोकरदन विधानसभा मतदार
संघात झालं आहे. त्याखालोखाल घनसावंगी मतदार संघ ७७ पुर्णांक १६, बदनापूर
७४ पुर्णांक ७२,
परतूर ७० पुर्णांक ७२ तर जालना विधानसभा मतदार संघात ६४ पुर्णांक
३९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेसाठी ६९ पुर्णांक
४५ टक्के मतदान झालं आहे. यामध्ये सर्वाधिक ७६ पूर्णांक ३३ टक्के मतदान भोकर मतदार
संघात झालं. त्या खालोखाल नायगाव मतदारसंघात ७४ टक्के, मुखेड
मतदारसंघात ७० पूर्णांक १४ टक्के, किनवट मतदारसंघात सुमारे ७२ टक्के, हदगाव
मतदारसंघात ७१ पूर्णांक ७७ टक्के, नांदेड उत्तर मतदार संघात ६० टक्के, नांदेड
दक्षिण मतदारसंघात ६४ टक्के, लोहा मतदारसंघात ७५ टक्के आणि देगलूर मतदारसंघात
६३ पूर्णांक २२ टक्के मतदान झालं आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही ६७ पूर्णांक ६१
टक्के मतदान झालं असून,
लोकसभेसाठी १२ लाख ९४ हजार १५९ मतदारांनी मतदान केल्याची माहिती, जिल्हा
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
****
धुळे शहरात मतदान यंत्र घेवून जाणारं वाहन
अडवून विभागीय अधिकाऱ्याला धमकावत वाहनावर दगडफेक केल्याप्रकरणी ५० जणांविरुध्द गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. काल २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी धुळे शहरातील अभय कॉलेजजवळ ही
घटना घडली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम
विधानसभा मतदार संघात काल मतदानावेळी झालेल्या गदारोळ प्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार
राजू शिंदे यांच्यासह सुमारे ५० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बजाजनगर भागात एका
शाळेतल्या मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला होता, यावेळी
पोलिसांच्या सूचनेचं पालन न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
भारताचे नवे कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षक
म्हणून के. संजय मूर्ती यांनी आज पदाची शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं
आयोजित औपचारिक समारंभात,
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, मूर्ती
यांना शपथ दिली.
****
सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं
बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध
तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार, आरोपींनी ८० हजार बिटकॉईनच्या
माध्यमातून ६ हजार ६०६ कोटी रुपयांचा निधी, नऊ परदेशी कंपन्यांद्वारे परदेशात
मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवला. या प्रकरणी गौरव मेहता यालाही समन्स बजावण्यात आलं
आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी निवृत्त पोलीस अधिकारी रविंद्रनाथ पाटील यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेश काँग्रेसचे
अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर क्रिप्टोचलन फसवणूक प्रकरणात गुंतल्याचा आरोप केल्यानंतर
हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
****
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी पासून सुरु होणार असल्याची घोषणा
आज सीबीएसईनं केली. दहावी बोर्डाच्या परीक्षा १८ मार्चपर्यंत तर बारावीच्या परीक्षा
४ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. सीबीएसईनं यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेच्या ८६ दिवस आधीच
वेळापत्रक जाहीर केलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी
यासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या सुमित पंडित या तरुणाने काल बोटावर शाई असलेल्या मतदारांची
मोफत दाढी कटींग उपक्रम राबवला. काल मतदानाच्या दिवशी
पंडित यांनी आपल्या माणुसकी केशकर्तनालयात अनेक मतदात्यांना सलून सेवा मोफत पुरवली
तर मतदान केलेल्या अनेक महिलांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केल्याचं, पंडित
यांनी आकाशवाणीला सांगितलं.
माझं जटवाडा रोडला सलूनचं
दुकान आहे, माणुसकी सलून. तिथे मी भरपूर योजना राबवतो. ज्या दिवशी मतदान होतं एक अनोखी
योजना राबवली होती की जो दाता मतदान करून येईल, बोटावरची शाई दाखवेल, त्याची आपल्या
सलूनमध्ये मोफत दाढी आणि कटींग करून देण्यात येईल. त्यामध्ये आम्हाला जवळपास अठरा लोकांनी
प्रतिसाद दिला त्या योजनेला. जवळपास २३ महिलांचा शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन
महिलांचा देखील सन्मान केला.
****
भारतातील जागतिक वारसा स्थळांचं संवर्धन
आणि या स्थळांची सुयोग्य मार्केटिंग करण्यात आपण कमी पडत असून, याकडे
केंद्र सरकारने अधिक लक्ष द्यावं, असं निरीक्षण पुरातत्व वास्तू तज्ज्ञ पद्मश्री
के के मोहम्मद यांनी नोंदवलं आहे. ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीने तिसऱ्या पद्म फेस्टिव्हला
आज पासून छत्रपती संभाजीनगर इथं सुरुवात झाली. या कार्यक्रमातल्या दुसऱ्या सत्रात झालेल्या
प्रकट मुलाखतीत मोहम्मद यांनी हे मत नोंदवलं. दरम्यान, या
कार्यक्रमात आज पहिल्या सत्रात पद्मभूषण राम नाईक यांची उद्योजक राम भोगले यांनी मुलाखत
घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या सांस्कृतिक सभागृहात होत असलेला
हा फेस्टिवस २३ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. यामध्ये बारा संवाद सत्र तसंच दोन सांस्कृतिक
कार्यक्रम होणार आहेत.
****
गोव्यात सुरू असलेल्या ५५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये विविध विषयांवरचे ४० चित्रपट दाखवण्यात येत आहेत. यामध्ये
उत्तमोत्तम हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांचा समावेश आहे. इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा
दालनातही २५ फिचर फिल्म आणि २० नॉन फिचर फिल्म दाखवण्यात येत आहेत.
****
राज्य परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या इलेक्ट्रीक
बस उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यात २३ ई-बस सुरु आहेत. बीड विभागात विविध मार्गावरच्या
प्रवाशांची या बससेवेला पसंती मिळत आहे. या सेवेच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्याच्या
कालावधीत सुमारे २ कोटी ७२ लाख ४४ हजार रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती, बीड
विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी राजकुमार दिवटे यांनी दिली आहे.
****
रेल्वे विभागातल्या कर्मचारी भरतीच्या परीक्षेसाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून येत्या २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी नांदेड–तिरुपती-नांदेड ही विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
No comments:
Post a Comment