▼

Friday, 22 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 22.11.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 22 November 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.

****

मानवता प्रथम, लोकशाही प्रथम, हा आजच्या संकटग्रस्त जगात पुढे जाण्याचा मंत्र असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गयाना संसदेच्या विशेष सत्राला संबोधित करताना ते काल बोलत होते. लोकशाही आपल्या अंत:करणात, आपल्या दृष्टीकोनात आणि आपल्या आचरणात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताने कधीच विस्तारवादी विचार केला नाही, भारत नेहमीच जागतिक विकास आणि शांततेच्या बाजुने असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे यासह अनेक जागतिक आव्हानांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं. जगात कोणत्याही देशातल्या कोणत्याही संकटात, प्रथम प्रतिसाद देणारा आणि मदतीसाठी पोहोचण्याचा भारताचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांना गयाना देशातला सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ काल प्रदान करण्यात आला. गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांच्या हस्ते मोदी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा सन्मान दोन्ही देशातल्या नागरिकांमध्ये रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित करत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

शाश्वत आर्थिक विकास, वाढती क्रयशक्ती आणि गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणाच्या उद्देशानं स्थिर चलनवाढ आवश्यक असल्याचं, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. ग्लोबल साऊथच्या उच्चस्तरीय बैठकीत ते काल बोलत होते. किंमत स्थिरतेमुळे बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते आणि अर्थव्यवस्था आणि जनता दोघांनाही लाभ होतो, असं दास म्हणाले. विकास आणि चलनवाढ यांच्यातला समतोल साधण्यासाठी वित्तीय आणि आर्थिक समन्वय महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्र अर्थात आय फोर सी नं दूरसंवाद विभागाच्या सहकार्यानं १७ हजार व्हॉटसऍप खाती प्रतिबंधित केली आहेत. ही सर्व खाती अग्नेय आशियात कार्यरत असणाऱ्या सायबर गुन्हेगारीशी संबंधित आहेत. परकीय भूमीवरुन काम करणारं गुन्हेगारी विश्व नष्ट करणं आणि भारताची डिजिटल सुरक्षा मजबूत करणं हा या मोहीमेचा उद्देश असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाच्या कामगिरीसाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत क्रीडा विधेयक आणणार असल्याची माहिती, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली. ते काल पाटण्यात आयोजित एका कार्यक्रमात खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींना संबोधित करत होते. देशाला क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट करण्यासाठी हे धोरण आखण्यात येणार असल्याचंही मांडवीय यांनी सांगितलं.

****

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या चौथ्या क्रिएटिव्ह माइंड्स टुमारो कार्यक्रमाचं काल उद्घाटन झालं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून १३ प्रकारच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या १०० तरुण चित्रकर्मींची निवड करण्यात आल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजु यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, इफ्फीमध्ये दाखवण्यात येणार्या विविध विषयांवरच्या ४० चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांचा समावेश आहे. इफ्फीमधल्या इंडियन पॅनोरमा दालनातही २५ फिचर फिल्म आणि २० नॉन फिचर फिल्म दाखवण्यात येत आहेत. जगभरातले मान्यवर चित्रपटकर्मी त्यांच्या मास्टरक्लासच्या माध्यमातून, तरुणांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहेत. इफ्फीमधल्या फिल्म बाजारचं हे १८ वं वर्ष असून, चित्रपट निर्मितीत येणाऱ्या तरुणांना नामांकित व्यावसायिकांबरोबर संपर्क साधण्याची संधीही मिळाली आहे.

****

नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर काल कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे याला मारहाण केल्याची तक्रार मोरे यांनी केली होती, त्यावरून कदम यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

****

धुळे शहरात मतदान यंत्र घेऊन जाणारे वाहन अडवून निवडणूक अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या तरुणासह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळ्यातल्या अभय कॉलेजजवळ काल ही घटना घडली होती.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना पर्थ इथं सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पाच बाद ६६ धावा झाल्या होत्या.

****

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना आज डेन्मार्कच्या अँडर्स अँन्टोसेन याच्याशी होणार आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीतला सामना देखील आज होणार आहे. 

****

रेल्वे विभागातल्या कर्मचारी भरतीच्या परीक्षेसाठी येत्या २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी नांदेड - तिरुपती नांदेड ही विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.

****

No comments:

Post a Comment